अर्थसंकल्प नव्हे, हे तर जाहीर सभेतलं भाषण… फडणवीस

अर्थसंकल्पावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सडकून टीका केली.

राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सडकून टीका केली. “अर्थसंकल्पाच्या नावाखाली अजित पवार यांनी जाहीर सभेतील भाषण केलं. अर्थसंकल्पीय भाषणामध्ये कुठलीही आकडेवारी नव्हती केवळ भाषण होतं. आर्थिक स्थितीचं विश्लेषण नव्हतं” असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

“ओपनिग, क्लोजिग बॅलेन्स किती असेल? किती तूट राहील? यातील कुठलीही गोष्ट अर्थसंकल्पामध्ये नव्हती. या अर्थसंकल्पामुळे तूट वाढणार आहे. अर्थसंकल्पामध्ये कुठलही संतुलन नाहीय” अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली. “अर्थमंत्र्यांना या सरकारला, विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राचा विसर पडला आहे. कोकणाचे नाव घेतले असले तरी, कोकणाच्या तोंडालाही पान पुसण्यात आली आहेत” असे फडणवीस म्हणाले

“मराठवाडा वॉटर ग्रीड हा २० हजार कोटींचा प्रकल्प आहे. पण फक्त २०० कोटी देण्यात आले आहेत. कोकणातील वाहून जाणारे १६८ टीएमसी पाणी गोदावरी खोऱ्यात आणून मराठवाडयाला दुष्काळ मुक्त करायची आमची योजना होती. पण त्याचा साधा उल्लेखही अर्थसंकल्पात केलेला नाही” अशी टीका फडणवीस यांनी केली.

“शेतकऱ्यांच्या तोंडालाही पान पुसण्यात आली आहेत. कर्जमाफी जाहीर केली असली तरी, मुदत कर्जासंबंधी कुठलीही नवीन घोषणा केलेली नाही. दोन लाखांच्यावर कर्ज असलेल्या शेतकऱ्यांसाठी ५० हजार रुपये प्रोत्साहनपर भत्ता देण्यात येणार आहे. आम्ही दीड लाखाच्यावर कर्ज असलेल्या शेतकऱ्यांसाठी अशाच प्रकारची घोषणा केली. त्यावेळी आमच्यावर प्रचंड टीका करण्यात आली. पण आता हीच घोषणा सरकारने केली आहे. उद्धव ठाकरे यांनी बांधावर जाऊन हेक्टरी २५ हजार, ५० हजार रुपये देण्याची घोषणा केली होती. सरकारला सत्तेच वचन लक्षात आहे पण शेतकऱ्यांना विसरले” अशी टीका फडणवीस यांनी केली.

“शेतकऱ्यांसाठी कुठल्याही नव्या घोषणा केलेल्या नाहीत. पायाभूत सुविधांवर आम्ही मोठया प्रमाणात खर्च केला पण या सरकारने तोंडाला पाने पुसली. हे सरकार १० लाख तरुणांना रोजगार देणार नाही तर फक्त ११ महिन्यांचा अॅप्रेंट्रीस प्रशिक्षण देणार आहे. हे सरकार दिशाभूल करत आहे” असे फडणवीस म्हणाले.

 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Maharashtra opposition leader devendra fadnavis slam govt over budget dmp