मुंबई: राज्यातील सर्व पाणंद रस्त्यांना लवकरच स्वतंत्र ओळख मिळणार आहे. राज्यात पाणंद रस्ते अतिक्रमण मुक्त करण्यासाठी सरकारने मोहीम हाती घेतली आहे. त्यानुसार भूमी अभिलेख विभागाने पाणंद रस्ते नकाशावर दिसत असल्यास त्याची नोंद सात बारा उताऱ्यावर करण्यात येणार आहे.

या मोहिमे बाबत रणधीर सावरकर यांनी मांडला होता त्यावर श्वेता महाले, प्रशांत बंब, समीर कुणावर , विश्वजित कदम यांनी उपप्रश्न विचारले. नोंदणी नंतर स्वतंत्र क्रमांक देण्यात येणार असून, याची माहिती संबंधित गावाच्या ग्रामसभेत उपलब्ध करून देण्यात येईल आणि मुख्यमंत्री बळीराजा पाणंद रस्त्यांची स्वतंत्र वेबसाईट सुरू करून त्यावरही माहिती टाकली जाईल असं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज विधानसभेत जाहीर केलं.

सध्या या रस्त्यांच्या मोजणीसाठी भूमापक कमी पडत असल्याने आता खासगी भूमापक नेमून ती करण्याची योजना आखली आहे, यासाठी आवश्यक आदर्श कार्यपद्धती तयार करण्यात आली आहे, खासगी भूमापकानी केलेली मोजणी शासन प्रमाणित करेल अशी माहिती देखील मंत्री बावनकुळे यांनी दिली. जे पाणंद रस्ते ज्या स्थितीत उपलब्ध आहेत त्यांना लांबी, रुंदी चे बंधन घालण्यात येणार नाही, असे किती रस्ते वर्षभरात तयार करावेत यासाठी आमदारांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीला कोणतीही मर्यादा घातली जाणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं. या रस्त्यांच्या बाबत वाद आहेत त्यांचा निपटारा तीन महिन्यात पूर्ण करण्यात यावा अशा सूचना सर्व तहसीलदार आणि उपविभागीय अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत अशी माहिती देखील मंत्री बावनकुळे यांनी दिली.