पुणे : पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक भरती प्रक्रियेत ‘मुलाखतीसह निवड’ हा पर्याय स्वीकारलेल्या संस्थांमध्ये वस्तुनिष्ठपणे मूल्यांकन करून उमेदवार निवड होत नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे आता उच्च गुणवत्ताधारक उमेदवारांच्या निवडीसाठी गुणांकन प्रक्रिया सुधारण्यात आली आहे. त्यामुळे शैक्षणिक पात्रता अधिक असणाऱ्या उमेदवारांना शिक्षक भरतीमध्ये जास्त संधी असल्याचे दिसून येते.
शालेय शिक्षण विभागाने याबाबतचा शासन निर्णय प्रसिद्ध केला. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा, खासगी व्यवस्थापनांच्या अनुदानित, अंशतः अनुदानित, विनाअनुदानित शाळांमधील शिक्षक पदभरती शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी या परीक्षेतील गुणांच्या आधारे पवित्र संकेतस्थळामार्फत करण्याचा निर्णय शासनाने सन २०१७ मध्ये उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार घेतला. शैक्षणिक गुणवत्ता आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण हितासाठी उच्च गुणवत्ताधारक उमेदवारांची पारदर्शक पद्धतीने शिक्षक पदावर निवड होणे आवश्यक असल्याचे निरीक्षण उच्च न्यायालयाने नोंदवले होते.
सद्य:स्थितीत खासगी व्यवस्थापनाच्या अनुदानित, अंशतः अनुदानित, विनाअनुदानित शाळांमधील शिक्षक पदभरतीसाठी संबंधित व्यवस्थापनांना मुलाखतीशिवाय व मुलाखतीसह या दोन विकल्पांपैकी एक विकल्प स्वीकारण्याची मुभा आहे. ‘मुलाखतीसह’ हा विकल्प स्वीकारणाऱ्या संस्थांना १:३ या प्रमाणात उमेदवार उपलब्ध करून देण्यात येतात. ६ ऑगस्ट २०२४ रोजी निश्चित करण्यात आलेल्या मानक कार्यपद्धतीच्या गुणांकनानुसार उपलब्ध करून देण्यात आलेल्या उमेदवारांपैकी सुयोग्य उमेदवारांची निवड संस्थेमार्फत केली जाणे अपेक्षित आहे. मात्र, सर्व उमेदवारांच्या संपादणुकीचे, पात्रतेचे योग्य मूल्यमापन या गुणांकन पद्धतीतून होत नसल्याचे निदर्शनास आले आहे.
कोणत्याही हस्तक्षेपाशिवाय वस्तुनिष्ठ पद्धतीने मूल्यमापन झाल्यास सर्वाधिक पात्र उमेदवारांची निवड खात्रीशीरपणे होऊ शकते. त्यामुळे ‘मुलाखतीसह निवड’ हा विकल्प स्वीकारणाऱ्या शैक्षणिक संस्थांना शिक्षक पदावरील नियुक्तीसाठी त्यांना उपलब्ध करून दिलेल्या उमेदवारांपैकी सर्वांत योग्य उमेदवारांची निवड करता येण्यासाठी गुणदानाची प्रक्रिया निश्चित करणारी सुधारित मानक कार्यपद्धती लागू करण्याबाबतचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता.
या पार्श्वभूमीवर, शिक्षण विभागाने ६ ऑगस्ट २०२४ रोजीचे शासन पत्र अधिक्रमित करून नवी कार्यपद्धती लागू केली आहे. उच्च गुणवत्ताधारक उमेदवारांची शिक्षक पदावर निवड व नियुक्ती अधिक पारदर्शकपणे करता येण्याकरिता शिक्षक पदभरती प्रक्रियेची विश्वासार्हता वाढण्यासाठी ‘मुलाखतीसह’ हा विकल्प स्वीकारणाऱ्या शैक्षणिक संस्थांनी त्यांना उपलब्ध करून देण्यात आलेल्या उमेदवारांपैकी सर्वाधिक योग्य उमेदवाराची निवड करण्यासाठी सुधारित गुणांकन प्रक्रिया अवलंबणे आवश्यक असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
सुधारित गुणांकन प्रक्रियेनुसार, एकूण १०० गुणांपैकी सर्वाधिक गुण प्राप्त करणाऱ्या उमेदवाराची निवड करून त्यास नियुक्ती देणे क्रमप्राप्त राहील. उमेदवारांना समसमान गुण मिळाल्यास ज्या उमेदवाराचे वय अधिक आहे, अशा उमेदवाराची निवड करून त्यास नियुक्ती द्यावी लागेल. उमेदवारांचे वय समान असल्यास इयत्ता बारावीचे गुण विचारात घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
संबंधित शिक्षणाधिकारी, शिक्षण उपसंचालक यांनी संबंधित संस्थेस उपलब्ध करून दिलेल्या सर्व उमेदवारांचे गुणांकन निश्चित केलेल्या पद्धतीनुसार झाल्याची खातरजमा करूनच उमेदवाराच्या निवड, नियुक्तीस मान्यता द्यावी. शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी-सन २०२५ या परीक्षेतील आणि या पुढे होणाऱ्या परीक्षेतील गुणांच्या आधारे शिक्षक पदभरतीसाठी गुणांकन प्रक्रिया लागू राहील, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
गुणांकनाची रचना
- शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणीत मिळालेल्या गुणांसाठी ७५ पैकी गुण.
- व्यावसायिक अर्हतेसाठी ८ पैकी गुण.
- शैक्षणिक अर्हतेसाठी ७ पैकी गुण.
- मुलाखत आणि अध्यापन कौशल्यासाठी १० पैकी गुण.
प्राधान्यक्रम नोंदविण्यातही बदल
शिक्षक भरतीसाठी उमेदवारांना नोंदवाव्या लागणाऱ्या प्राधान्यक्रमातही बदल करण्यात आला आहे. त्यानुसार उमेदवारांना त्यांच्या अर्हतेनुसार ‘मुलाखतीशिवाय’ व ‘मुलाखतीसह’ या निवडीच्या दोन्ही प्रकारांसाठी जाहिरातीतील पात्र असलेले सर्व प्राधान्यक्रम उपलब्ध होतील. मात्र, ‘मुलाखतीशिवाय निवड’ प्रकारासाठी उमेदवारास त्याच्या सोयीनुसार त्यापैकी एकूण कमाल १०० प्राधान्यक्रम, तसेच ‘मुलाखतीसह निवड’ प्रकारासाठी कमाल एकूण ५० प्राधान्यक्रम लॉक करता येतील, असा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे.
नवी गुणांकन पद्धती पारदर्शकेच्या दृष्टीने महत्त्वाची आहे. उच्च गुणवत्ताधारक उमेदवारांच्या निवडीसाठी ती उपयुक्त ठरणार आहे. तसेच, प्राधान्यक्रम नोंदविण्याबाबतचा निर्णयही स्वागतार्ह आहे.
-विठ्ठल सरगर, शिक्षक भरती उमेदवार
