मुंबई : राज्याच्या अर्थविषयक व्यवस्थापनात गेली पाच दशके महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या नियोजन विभागाच्या आर्थिक अधिकारांना आता मर्यादा घालण्यात आल्या आहेत. राज्याचा वार्षिक अर्थविषयक कार्यक्रम आखण्यापासून त्यासाठीच्या निधीचे नियोजन, वितरण आणि अर्थसंकल्पीय प्रक्रिया याकरिता नियोजन विभाग बजावत असलेल्या भूमिकेला कात्री लावून त्या वित्त विभागाकडे वर्ग करण्यात आल्या आहेत. त्यामुळे यापुढे या सर्व बाबी वित्त विभागाच्या अखत्यारित केंद्रीभूत होणार आहेत.
महाराष्ट्रात स्वतंत्र नियोजन विभागाची निर्मिती १ सप्टेंबर १९७२ रोजी करण्यात आली. राज्याच्या वार्षिक कार्यक्रमांमध्ये समाविष्ट योजनांच्या अंमलबजावणीवर प्रभावी नियंत्रण ठेवणे आणि नियोजन आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार राज्य व जिल्हास्तरावरील वार्षिक कार्यक्रम तयार करणे ही या विभागाची प्रमुख कामे होती. राज्य नियोजन मंडळ, जिल्हा नियोजन, विकास मंडळे, केंद्रसहाय्यित योजना, आर्थिक व सांख्यिकी संचालनालय यांसारख्या महत्त्वाच्या यंत्रणाही नियोजन विभागाच्या कक्षेत येतात.
२०१५नंतर बदलांना सुरूवात
भाजपप्रणित केंद्र सरकारच्या काळात २०१५मध्ये नियोजन आयोगाच्या जागी नीती आयोग आल्यानंतर राज्याराज्यांमधील नियोजन विभागाच्या अस्तित्त्वावर प्रश्न निर्माण झाला. महाराष्ट्रात स्वतंत्र नियोजन विभाग कायम असला तरी २०१७-१८ पासून ‘योजनांतर्गत’ आणि ‘योजनेतर’ खर्चाची विभागणी रद्द करून ‘अनिवार्य खर्च’ आणि ‘कार्यक्रमावरील खर्च’ अशी नवी वर्गवारी करण्यात आली. यातील ‘कार्यक्रमावरील खर्चा’चे समन्वयन करण्याची जबाबदारी नियोजन विभागाकडे ठेवण्यात आली होती.
नियोजन विभागातील २८ पदेही वित्तकडे
या पार्श्वभूमीवर नियोजन विभागाकडील वार्षिक कार्यक्रम आणि त्यासंबंधित अर्थसंकल्पीय कामकाजही वित्त विभागाकडे वर्ग करण्यात आले आहे. १८ ऑगस्टच्या मंत्रिमंडळ बैठकीत वित्त व नियोजन विभागांच्या पुनर्रचनेला मान्यता देण्यात आली. वित्त व नियोजन विभागांची कार्यक्षमता वाढविण्याच्या उद्देशाने दोन्ही विभागांची पुनर्रचना करण्यात येत आहे. त्याअंतर्गत २५ ऑगस्टला नियोजन विभागातील २८ पदेही वित्त विभागाकडे वर्ग करण्यात आली.
आता नव्या निर्णयानुसार प्रशासकीय मान्यता आणि सुधारित प्रशासकीय मान्यतेचे प्रस्ताव नियोजन विभागाकडे अभिप्रायासाठी पाठविण्याची पद्धत बंद करण्यात आली आहे. हे प्रस्ताव थेट वित्त विभागाकडे पाठवावे लागतील. सचिव समितीच्या मान्यतेसाठीचे प्रस्तावही थेट वित्त विभागाकडे सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
वार्षिक कार्यक्रमाची आखणी, केंद्र पुरस्कृत योजनांचा समन्वय, विकास मंडळांशी संबंधित निधी विवरण, निधी वितरण, पुनर्विनियोजन आणि पुरवणी मागण्या यांसारखी कामे वित्त विभागाकडे गेली आहेत. त्यामुळे नियोजन विभागाकडे धोरणे, योजना व कार्यक्रमांच्या अंमलबजावणीचे संनियंत्रण आणि मूल्यमापन, जिल्हा वार्षिक योजनांचे प्राधान्यक्रम निश्चित करणे, विकास आराखड्यांची छाननी आणि आर्थिक-सांख्यिकी माहितीचे संकलन अशीच कामे राहणार आहेत.
निधीविषयक अधिकार वित्तकडे
केंद्राप्रमाणे महाराष्ट्रात नियोजन विभाग बरखास्त करण्याचा निर्णय झालेला नसला तरी वार्षिक कार्यक्रम आणि निधीशी संबंधित प्रमुख अधिकार वित्त विभागाकडे गेल्याने नियोजन यंत्रणेचे स्वरूप मूलतः बदलणार आहे. आर्थिक नियोजनातील ‘नियोजन’ आणि ‘निधी’ या दोन बाजूंपैकी निधी व अर्थसंकल्पीय निर्णयांची बाजू वित्त विभागाकडे अधिक केंद्रीत झाली आहे.
