मुंबई : राज्यात प्लास्टिकवर बंदी असली तरी शेतकऱ्यांचा फूलबाजार प्लास्टिक फुलांनी काबीज केला आहे. त्यामुळे प्लास्टिक फुलांवर बंदीसंदर्भात अधिसूचनाकाढली जाईल. अशा प्लास्टिक फुलांवरील कारवाईचे अधिकार सर्व महापालिकांना देण्यात येतील. प्लास्टिक फुलांचा वापर करणारे सजावटकार तसेच संमारंभ हॉल, सभागृहांना नोटिसा दिल्या जातील, नियमांचे उल्लंघन केल्यास दंडात्मक कारवाई केली जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत जाहीर केले.
राज्यात सण-उत्सव, लग्नसमारंभात प्लास्टिकच्या फुलांचा वापर सर्रास होत असून यामुळे शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ येत असल्याकडे तारांकित प्रश्नाद्वारे प्रवीण दरेकर, शशिकांत शिंदे यांनी लक्ष वेधले. प्लास्टिकच्या फुलांमुळे पर्यावरणाची हानी तर होतेच याशिवाय नैसर्गिक फुले विकली जातात. बंदी असतानाही बाजारात प्लास्टिकची फुले येतात कशी, मुंबईतील लोहार चाळ परिसरात फ्लास्टिकची फुले सर्रास दिसत असल्याचे शिंदे म्हणाले.
आमदार ॲड. अनिल परब, अमित गोरखे, अमोल मिटकरी यांनीही यावेळी चर्चेत सहभाग घेतला. प्लास्टिक फुलांच्या वापरामुळे निसर्गचक्रावरही गंभीर परिणाम होत असून मागील पावसाळी अधिवेशनात प्लास्टिक फुलांवर बंदी करण्याची घोषणा करण्यात आली मात्र त्याबाबतचे आदेश निर्गमित करण्यात आले नसल्याची बाब श्रीकांत भारतीय यांनी निदर्शनास आणली. यावर उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्लास्टिक फुलांवर बंदीसंदर्भात अधिसूचना काढण्यात येईल असे जाहीर केले.
३,३९० आस्थापनांवर कारवाई
राज्यात प्लास्टिक आणि थर्माकोलवर पूर्णतः बंदी आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने २९ ऑगस्ट २०२५ रोजी सण-उत्सव काळात कृत्रिम फुलांचा वापर टाळण्याबाबत परिपत्रक जारी केले आहे. एप्रिल २०२५ ते जानेवारी २०२६ या कालावधीत १,२४,७८३ आस्थापनांची तपासणी करण्यात आली, यापैकी ३,३९० आस्थापनांवर कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून १.५५ कोटी दंड वसूल करण्यात आला तसेच ६७.५४ मेट्रिक टन एकल वापर प्लास्टिक जप्त करण्यात आल्याची माहिती पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे यांनी दिली.
