scorecardresearch

ठाकरे सरकारकडून ४० पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या, विश्वास नांगरे पाटील यांची मुंबईत बदली

पुणे आणि ठाण्याच्या पोलीस आयुक्तांची बदली नाही

ठाकरे सरकारकडून ४० पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या, विश्वास नांगरे पाटील यांची मुंबईत बदली

राज्य सरकारकडून पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा आदेश काढण्यात आला आहे. महाविकास आघाडीकडून राज्याच्या पोलीस विभागात मोठे बदल करण्यासंबंधी चर्चा सुरु होती. गणेशोत्सव पार पडेपर्यंत पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करू नयेत, अशी भूमिका पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल यांनी घेतल्याने राज्य सरकारने बदल्यांसाठी ५ सप्टेंबपर्यंत मुदतवाढ दिली होती. त्यामुळे पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या बदल्या लांबणीवर गेल्या होत्या. मात्र आता गणेशोत्सव संपल्यानंतर बदल्यांचा आदेश काढण्यात आला आहे.

आदेशानुसार, नाशिकचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांची मुंबईच्या कायदा व सुव्यवस्था तर मिलिंद भारंबे यांची गुन्हे सहआयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. बिपीन कुमार सिंह यांची नवी मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे. तर संदीप कर्णिक यांची पश्चिम विभागाचे अतिरिक्त आयुक्त म्हणून नियुक्ती झाली आहे.

पुण्याचे पोलिस आयुक्त म्हणून के. व्यंकटेशम आणि ठाण्याचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांची बदली कऱण्यात आलेली नाही. पिंपरी-चिंचवडच्या पोलीस आयुक्तपदी कृष्णप्रकाश यांची नियुक्ती झाली आहे. तर विश्वास नांगरे पाटील यांच्या बदलीमुळे रिक्त झालेल्या नाशिकच्या पोलीस आयुक्तपदी दीपक पांडे यांना नियुक्त करण्यात आलं आहे.

कोल्हापूर महानिरीक्षकपदी मनोजकुमार लोहिया यांना नियुक्त करण्यात आलं आहे. अमरावतीच्या आयुक्तपदाची जबाबदारी नाशिकच्या अधीक्षक आरतीसिंह यांना देण्यात आली आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या