डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येच्या प्रभावी तपासासाठी केंद्रीय अन्वेषण विभागाला (सीबीआय) सहाय्य करण्यासाठी राज्याने पोलीस दलातील अधिकाऱ्यांची नियुक्ती केल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी दिली.
दाभोलकर यांच्या हत्येच्या तपासकार्यात पूर्वी काम केलेल्या पोलीस अधिकाऱ्यांच्या सहाय्याची मागणी सीबीआयने राज्याच्या पोलीस विभागाकडे नुकतीच केली होती. त्याला राज्य सरकारने तातडीने प्रतिसाद दिला आहे. त्यानुसार तपासाचा वेग वाढून गुन्हेगारांना लवकर अटक व्हावी यादृष्टीने फडणवीस यांनी त्यास मान्यता दिली आहे. हे अधिकारी तीन महिन्यांच्या कालावधीसाठी किंवा तपास पूर्ण होईपर्यंत सीबीआयला सहाय्य करणार आहेत.
यामध्ये पुण्याचे सहाय्यक पोलीस आयुक्त जी.एस. मडगुळकर, नागपूरचे पोलीस निरीक्षक सतीश देवरे, यवतमाळचे पोलीस निरीक्षक चंद्रकांत घोडके, पुण्याचे पोलीस निरीक्षक दिनकर कदम आणि सहायक पोलीस निरीक्षक सुभाष चव्हाण आदींचा समावेश आहे.