Maharashtra News Updates, 24 May : हिंदमाता परिसरात पाणी साचू नये म्हणून पालिकेने झेविअर्स मैदानात बांधलेल्या भूमिगत टाक्यांचे काम पूर्ण झाले असून त्यामुळे यंदा पावसाळ्यात या परिसरातला पाणी साचण्यापासून मुक्ती मिळणार का हे समजू शकणार आहे. पालिकेने कोटय़वधी रुपये खर्चून बांधलेल्या या प्रकल्पाची यंदाच्या पावसाळ्यात कसोटी लागणार आहे. तर दावोस आर्थिक परिषदेदरम्यान विविध देशांतील २३ कंपन्यांनी महाराष्ट्र सरकारशी सुमारे ३० हजार कोटी रुपयांचे सामंजस्य करार केले. त्यात आयटी क्षेत्रात आघाडीच्या मायक्रोसॉफ्ट कंपनीच्या ३२०० कोटींच्या गुंतवणूक कराराचा समावेश आहे. ही कंपनी पुण्यात विदा केंद्र उभारणार आहे.
दरम्यान, महाविकास आघाडी सरकार हे पाणी विरोधी सरकार आहे. त्यांनी मराठवाडा वॉटर ग्रीड गुंडाळली, कोकणातून मराठवाड्याला पाणी देणाऱ्या योजनेचा शासन निर्णय रद्द केला. औरंगाबादसारख्या शहरला पाणी देता आलेले नाही, त्यामुळे हे सरकार पाणी विरोधी सरकार असल्याचा आरोप विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केला. औरंगाबाद येथे जलआक्रोश मोर्चाचे नेतृत्व त्यांनी केले. या वेळी बोलताना त्यांनी सरकार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर आरोप केले. केवळ मुंबई व उपनगरीय भागा पलीकडे त्यांना महाराष्ट्र माहीत नसल्याचेही ते म्हणाले.
अशा अनेक महत्वाच्या घडामोडी राज्य, देश, आंतरराष्ट्रीय स्तरावर तसंच इतर क्षेत्रात घडत आहेत. या सर्व घडामोडी तुम्ही आता एकाच ठिकाणी वाचू शकता.
Maharashtra Latest News Updates : राज्यासह देश आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रत्येक अपडेट!
दारू प्याल्यानंतर झालेल्या वादातून दोघांनी एकाचा गळा चिरून खून केल्याची घटना मंगळवारी (२४ मे) पुण्यातील जुन्या जिल्हा परिषदेच्या इमारतीसमोर घडली. या प्रकरणी दोघांना समर्थ पोलिसांनी अटक केली.
अलिबागमध्ये महिलेची हत्या केल्या प्रकरणी आरोपी गणेश शंकर म्हात्रे याला अलिबाग सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. याशिवाय न्यायालयाने दोषीला ११ हजार रुपयांचा आर्थिक दंडही ठोठावला.
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या काकांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याची घटना घडली आहे. चाकणकर यांनी फेसबुकवर पोस्ट करत याबाबत माहिती दिली.
अहमदनगरचे प्रसिद्ध किर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांची प्रकृती बिघडली असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे निवृत्ती महाराज इंदुरीकर यांचे ३० मे पर्यंतचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. निवृत्ती महाराज इंदुरीकर यांना डॉक्टरांनी सक्तीची विश्रांती घेण्यास सांगितले आहे.
ज्ञानवापी प्रकरणी वारणसीच्या जिल्हा कोर्टात सुनावणी पार पडली. या प्रकरणाची पुढील सुनावणी २६ मे रोजी पार पडणार आहे. मुस्लिम पक्षाच्या बाजूच्या याचिकेवर ७ -११ सीपीसी अंतर्गत याचिकांवर न्यायालय पुढील सुनावणी घेणार आहे.
राज्यसभेच्या सहाव्या जागेवरुन सुरु असलेल्या चर्चांना अखेर शिवसेनेने पूर्णविराम दिला आहे. शिवसेना छत्रपती संभाजीराजेंना उमेदवारी देणार की नाही यावर तर्क-वितर्क लढवले जात असताना अखेर संजय पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं आहे. शिवसेनेचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना ही माहिती दिली. यावेळी त्यांनी अद्याप अधिकृत घोषणा करणं बाकी असल्याचंही सांगितलं. तसंच मावळे असल्यानेच राजे असतात असं सांगत अप्रत्यक्षपणे संभाजीराजेंना टोलाही लगावला.
पंजाबचे आरोग्य मंत्री विजय सिंगला यांची भ्रष्टाचाराच्या आरोपावरून पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी हकालपट्टी केली होती. त्यानंतर काही वेळातच लाचलुचपत प्रतिबंधक शाखेने सिंगला यांना अटक केली आहे.
उदयपूर नवसंकल्प शिबिर घोषणापत्रातील एक व्यक्ती एक पद या घोषणेच्या अंमलबजावणीला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसमध्ये सुरुवात करण्यात आली आहे .या धोरणानुसार प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष, माजी मंत्री नसीम खान यांना मुंबई काँग्रेसच्या प्रचार समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला आहे.
राज ठाकरेंना विरोध करण्यासाठी बृजभूषण सिंह यांना शरद पवारांनीच रसद पुरवल्याचा आरोप मनसेकडून करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर मनसेकडून शेअर करण्यात आलेल्या फोटोंवरून राजकारण रंगलेलं असताना आता त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी मनसेला प्रत्युत्तर दिलं आहे.
केंद्र सरकारपाठोपाठ राज्यातील महाविकास आघाडी सरकारनेही रविवारी इंधन करकपात करून नागरिकांना दिलासा दिला. राज्य सरकारने पेट्रोलवरील मूल्यवर्धित करात २ रुपये ०८ पैसे, तर डिझेलवरील करात १ रुपया ४४ पैसे कपात केली. या निर्णयानंतर आता भाजपाने महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे. भाजपाच्या बैठकीत बोलताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. वाचा सविस्तर…
अभिनेत्री केतकी चितळेला आता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. २०२० मध्ये बौद्ध धर्माविषयी समाजमाध्यमावर आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी केतकीवर रबाळे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी न्यायालयाने तिला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती.
उत्तर प्रदेशमधील बदायू येथे एका १५ वर्षाच्या मुलाला मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा आक्षेपार्ह फोटो सोशल मीडियावर शेअर केल्यामुळे शिक्षा सुनावण्यात आली आहे. मुलाला प्रशासनाने अनोखी शिक्षा सुनावली असून १५ दिवसांसाठी गोशाळा स्वच्छ करण्यास सांगितलं आहे.
कल्याण डोंबिवली पालिकेच्या ऑनलाइन सुविधा घेताना गेल्या २० दिवसांपासून नागरिकांना अनेक तांत्रिक अडचणींना सामोरे जावे लागते. तांत्रिक अडचणी कशा सोडवायच्या याची मुद्देसुद उत्तरे पालिकेच्या संगणक विभाग, नागरी सुविधा केंद्रातून दिली जात नसल्याने नागरिक तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत. स्मार्ट सिटी कंपनीच्या माध्यमातून पालिकेच्या जुनाट संगणकीकृत (ई गव्हर्नन्स) ऑनलाईन प्रणालीचे उन्नत्तीकरण करण्यात आले आहे.
भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेत ठाकरे सरकावर पुन्हा एकदा अनेक गंभीर आरोप केले आहेत. उद्धव ठाकरेंच्या पार्टरनरचे कसाबशी संबंध असल्याचा गंभीर आरोप किरीट सोमय्या यांनी पुण्यात पत्रकार परिषदेत केला आहे. २६/११ हल्ल्यात अधिकाऱ्यांनी वापरलेले बुलेटप्रूफ जॅकेट बोगस असल्याचे म्हणत किरीट सोमय्या यांनी नवा आरोप केला आहे. याबाबत राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी मुंबईत पत्रकार परिषदेत प्रतिक्रिया दिली आहे. वाचा सविस्तर…
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपला अयोध्या दौरा स्थगित केला आहे. आपल्या अयोध्या दौऱ्याला विरोध करण्यासाठी महाराष्ट्रातून रसद पुरवली गेली असा आरोप राज ठाकरेंनी केला आहे. पुण्यातील सभेत बोलताना राज ठाकरे यांनी तूर्तास अयोध्य दौरा स्थगित करत असल्याचं सांगताना हा आरोप केला होता. दरम्यान राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला विरोध करणारे भाजपा खासदार बृजभूषण सिंह यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे भाजपानेच राज ठाकरेंविरोधात कट रचला होता का? अशी शंका उपस्थित होत आहे.
“कुठं फेडाल ही पापं? वर गेल्यानंतर तुम्हाला तर नरकातच जावं लागेल. लोकांनी पण म्हटलं पाहिजे की खरंच त्या सरकारच्या काळात हे काम एक नंबर झालं. नाहीतर आम्ही मुंबईला आमच्या घरी पोहोचेपर्यंत इथे काहीतरी तुटलेलं असायचं. काय त्याला करायचंय?” अशा शब्दांत अजित पवारांनी साताऱ्यात प्रशासकीय अधिकाऱ्यांना सुनावलं आहे.
संजय राऊतांना या फोटोंबद्दल विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, “बृजभूषण सिंह यांना आम्हीदेखील ओळखतो. आम्हीदेखील एकत्र बसतो, जेवतो. फोटो व्हायरल झाले म्हणजे काय झालं…संसदेचा अभ्यास करायला सांगा त्यांना. तिथे लोक एका सभागृहात बसतात, आजुबाजूला असतात. एकत्र चहापान करतात. योगींसोबत आम्हीदेखील चहापान करतो, म्हणून आम्ही काय योगींना त्यांना अडवण्यासाठी रसद पुरवली? हे अभ्यासात कच्चे आहेत”.
“मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी सविस्तर चर्चा झाली आहे. पुढे काय करायचं, ते सविस्तर ठरलेलं आहे. मला पूर्ण विश्वास आहे की ते त्याप्रमाणे करतील. मला हाही विश्वास आहे की ते छत्रपती घराण्याचा सन्मान करतील”, असं संभाजीराजे छत्रपती म्हणाले आहेत. या पार्श्वभूमीवर नेमकं या दोघांमध्ये काय ठरलंय, यावर चर्चा सुरू झाली आहे.
गोंदिया तालुक्याशेजारील मध्य प्रदेशमधील बालघाट तालुक्यामधील किरणापूर शहरात एका महिलेने बालाघाटच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात चार मुलांना जन्म दिला आहे. ही शस्त्रक्रिया २३ मे रोजी रात्री ११:३० वाजताच्या सुमारास पार पाडली. बालाघाटच्या रुग्णालयामध्ये झालेल्या शस्त्रक्रियाने जन्मलेली ही चारही बाळं निरोगी आणि पुर्णपणे स्वस्थ असल्याचे येथील डॉक्टरांनी सांगितले. येथे वाचा विस्तर वृत्त
सध्या देशात खास करुन बॉलिवूड तसेच दाक्षिणात्य कलाकारांमुळे राष्ट्रीय भाषा या विषयावरुन मतमतांतरे असल्याचं पहायला मिळत आहे. अजय देवगण, किच्चा सुदीपसारख्या लोकप्रिय कलाकारांनी या विषयावर व्यक्त केलेल्या मतांमुळे मोठा वाद निर्माण झालेला असतानाच आतार केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी या विषयावर शैक्षणिक दृष्टीकोनातून महत्वाचं वक्तव्य केलंय. येथे वाचा विस्तर वृत्त
कपडे न धुतल्यामुळे चिडलेल्या बापाने दहा वर्षाच्या मुलाचा गळा आवळून खून केला. त्यानंतर मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा बनाव केला. ही खळबळजनक घटना आज सोमवारी कोराडीत उघडकीस आली. गुलशन ऊर्फ गबरू संतलाल मडावी (१०, सुरादेवीगाव) असे खून झालेल्या मुलाचे नाव आहे. येथे वाचा विस्तर वृत्त
काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी दिल्यानंतर हार्दिक पटेल यांच्या पुढील राजकीय भूमिकेविषयी अनेक तर्क-वितर्क लढवले जात आहेत. यादरम्यान इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत गुजरात काँग्रेसचे माजी कार्याध्यक्ष हार्दिक पटेल यांनी पुढील पाऊल टाकण्याआधी दखल घेत असलेल्या अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं आहे.
हार्बर रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. पावसाच्या हलक्या सरींमुळे पेंटाग्राफमध्ये शॉर्ट सर्किट झाल्याने वाहतुकीचा खोळंबा झाल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान लोकल वाहतूक विस्कळीत झाल्याने सकाळी कामावर निघालेल्या प्रवाशांची तारांबळ उडाली आहे. हार्बर मार्गावरील लोकल सध्या २० ते २५ मिनिटे उशिराने धावत आहेत.
मनसेकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला विरोध करणारे भाजपा खासदार बृजभूषण सिंह यांचे फोटो शेअर करण्यात आले आहेत. या फोटोंच्या माध्यमातून मनसेने शरद पवारांवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधत रसद पुरवल्याचा आरोप केला आहे. राज ठाकरे यांनी आपल्या अयोध्या दौऱ्याला विरोध करण्यासाठी महाराष्ट्रातून रसद पुरवली गेली असा आरोप केला होता. दरम्यान मनसेने सोशल मीडियावर हे फोटो शेअर केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने यावर प्रतिक्रिया दिली आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या अयोध्या दौऱ्याला विरोध करण्यासाठी महाराष्ट्रातून रसद पुरवली गेली असा आरोप केला आहे. पुण्यातील सभेत बोलताना राज ठाकरे यांनी तूर्तास अयोध्य दौरा स्थगित करत असल्याचं सांगताना हा आरोप केला होता. यानंतर राज ठाकरेंचा रोख नेमका कोणाकडे होता याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. त्यातच आता मनसेकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला विरोध करणारे भाजपा खासदार बृजभूषण सिंह यांचे फोटो शेअर करण्यात आले आहेत. या ट्वीटच्या माध्यमातून मनसेने अप्रत्यक्षपणे शरद पवारांवर निशाणा साधत रसद पुरवल्याचा आरोप केला आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कुटुंबासह शिवसेना नेत्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करणाऱ्या किरीट सोमय्या यांनी यावेळी गंभीर आरोप केले आहेत. उद्धव ठाकरेंच्या पार्टरनरचे कसाबशी संबंध असल्याचा गंभीर आरोप किरीट सोमय्या यांनी पुण्यात पत्रकार परिषदेत केला आहे. २६/११ हल्ल्यात अधिकाऱ्यांनी वापरलेले बुलेटप्रूफ जॅकेट बोगस असल्याचे म्हणत किरीट सोमय्या यांनी नवा आरोप केला आहे. वाचा सविस्तर…
ठाणे शहरात नव्याने उभे राहिलेल्या गृहसंकुलांमुळे वाढलेल्या लोकसंख्येचा अभ्यास करून गर्दीच्या अशा सहा बस मार्गावर टीएमटीच्या बस फेऱ्या वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या मार्गांवर २८ बसगाड्यांच्या माध्यमातून ३२५ फेऱ्या होत असून याठिकाणी आता १५ बसगाड्या वाढविण्यात आल्याने १४० फेऱ्या वाढणार आहेत, अशी माहिती परिवहन समिती सभापती विलास जोशी यांनी दिली.
अनेक महत्वाच्या घडामोडी राज्यात, देशात, आंतरराष्ट्रीय स्तरावर तसंच इतर क्षेत्रात घडत आहेत. या सर्व घडामोडी तुम्हाला आता एकाच ठिकाणी वाचू शकता.