राज्यातील सत्तासंघर्षाचा मुद्दा सुप्रीम कोर्टात पोहोचला असून न्यायालय काय निर्णय देतं याकडे सर्वांचं लक्ष आहे. यादरम्यान एकनाथ शिंदे ट्विटरच्या माध्यमातून आपली भूमिका मांडत असून शिवसेना तसंच उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्याकडून होणाऱ्या आरोपांना प्रत्युत्तर देत आहेत. त्यातच त्यांनी आता शिवसेनेचे माजी आमदार सुभाष साबणे यांचा व्हिडीओ ट्वीट केला. या व्हिडीओच्या माध्यमातून एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलेले छगन भुजबळ यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काय आहे व्हिडीओत –

एकनाथ शिंदे यांनी हा व्हिडीओ ट्वीट करताना सांगितलं आहे की, “हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अटक करणाऱ्या छगन भुजबळ यांच्यासोबत मांडीला मांडी लावून मंत्रिमंडळात बसताना आपल्याला काहीच यातना होत नाहीत का? असा सवाल शिवसेनेचे माजी आमदार सुभाष साबणे यांनी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना विचारला आहे”.

Eknath Shinde Live : महाविकास आघाडी अल्पमतात, ३८ आमदारांनी पाठिंबा काढला; शिंदे गटाचा सुप्रीम कोर्टात दावा

व्हिडीओत सुभाष साबणे काय म्हणाले आहेत?

“उद्धव ठाकरेंनी मी बोबड्याच्या बाजूला मांडी घालून बसू का? अशी विचारणा केली. पण ज्यांनी शिवेसनाप्रमुखांना जेलमध्ये टाकलं, त्यांच्या मांडीला मांडी लावून मंत्रिमंडळात बसता…ते तुम्हाला चालतं,” अशी टीका सुभाष साबणे यांनी केली आहे.

“शिवसेनाप्रमुखांवरील प्रेमामुळे आम्ही एक वर्ष निलंबित होतो. आजही शिवसेनेबद्दल माझ्या मनात नितांत आदर आहे. एकनाथ शिंदे माझं दैवत आहे म्हणूनच त्यांच्या बंडाला पाठिंबा दिला. शिवसैनिकांनी एकनाथ शिंदेंच्या पाठिशी खंबीरपणे उभं राहावं तरच शिवसेना आणि महाराष्ट्र टिकेल,” असं आवाहनही त्यांनी केलं.

महाविकास आघाडी अल्पमतात, शिंदे गटाचा सुप्रीम कोर्टात दावा

महाविकास आघाडी अल्पमतात असल्याचा दावा एकनाथ शिंदे गटाने सुप्रीम कोर्टातील याचिकेत घेतला आहे. ३८ आमदारांनी पाठिंबा काढून घेतल्याचं याचिकेत नमूद करण्यात आलं आहे. शिवसेना नेत्यांच्या जिवाला धोका असल्याचंही याचिकेत सांगण्यात आलं आहे. संजय राऊत यांच्या वक्तव्याच्या व्हिडीओच्या लिंक सोबत देण्यात आल्या आहेत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra political crisis eknath shinde tweet subhash sabne ncp chhagan bhujbal sgy
First published on: 27-06-2022 at 12:23 IST