शिवसेनेने महाविकास आघाडीतून बाहेर पडावं, ही पक्षाच्या आमदारांची भूमिका असेल तर त्याचीही तयारी आहे. पण, त्यासाठी तुम्ही २४ तासांत मुंबईत येऊन शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी थेट चर्चा करावी, असा प्रस्ताव शिवसेना खासदार संजय राऊत यांनी गुरुवारी दिला होता. यावर एकनाथ शिंदे यांनी जनसत्ताशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे. एकनाथ शिंदे यांनी यावेळी आपल्यासोबत शिवसेनेचे ४० आणि अपक्ष १२ असे एकूण ५२ आमदार असल्याची माहिती दिली आहे.

संजय राऊत यांच्या प्रस्तावाबद्दल विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, “असा कोणताही प्रस्ताव आमच्याकडे आलेला नाही. याबद्दल आम्हाला काही माहितीदेखील नाही. आज होणाऱ्या बैठकीत अनेक मुद्द्यांवर चर्चा होणार असून त्यानंतर पुढील निर्णय घेतला जाईल”.

“तुम्ही या, आमची पूर्ण तयारी; रस्त्यावर जरी लढाई झाली…”, पवारांसोबतच्या बैठकीनंतर राऊतांचं एकनाथ शिंदेंना जाहीर आव्हान

“आम्ही बाळासाहेब ठाकरेंचे सैनिक आहोत. त्यांची हिंदुत्वाची, विकासाची विचारसरणी आम्ही पुढे घेऊन जाऊ इच्छित होते. याच मुद्द्यावर ४० आमदारांचं एकमत आहे,” असं संजय राऊतांनी सांगितलं. मी अद्याप पक्ष सोडलेला नाही. मी शिवसेनेत असून शिवसैनिक आहे असंही त्यांनी सांगितलं.

संजय राऊत यांनी प्रस्ताव दिल्यानंतर राजकीय वर्तुळात गोंधळ उडाला होता. बंडखोरांचा आग्रह मान्य करत पक्ष वाचवण्यासाठी एक पाऊल मागे घेत सत्तेवर पाणी सोडण्यास शिवसेना तयार झाल्याचे चित्र निर्माण झालं होतं.

Maharashtra Political Crisis Live : पोलीस आयुक्त संजय पांडे मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी मातोश्रीवर; वाचा प्रत्येक अपडेट…

‘वर्षा या मुख्यमंत्री निवासस्थानी गुरुवारी शिवसेना नेते आणि आमदारांची बैठक झाली. एकनाथ शिंदे यांच्या गटातून निघून पुन्हा मुंबईत कसे आलो, याची कथा शिवसेना आमदार कैलास पाटील आणि नितीन देशमुख यांनी यावेळी सांगितली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला.

गुवाहाटीमध्ये असलेल्या शिवसेना आमदारांनी हिंदूत्वाचा मुद्दा उपस्थित केला आहे. महाविकास आघाडीतून शिवसेनेने बाहेर पडले पाहिजे, असे या आमदारांना वाटत असेल तर त्याची तयारी आहे. पण, या आमदारांनी आधी २४ तासांत मुंबईत येण्याचे धाडस दाखवून शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर आपली भूमिका मांडावी, असं आवाहन संजय राऊत यांनी केलं होतं. आमदारांनी गुवाहाटीत बसून पत्रव्यवहार करू नय़े मोबाइल, व्हॉट्सअ‍ॅप, ट्विटरवर पत्रव्यवहार करू नका, असे आवाहन राऊत यांनी केलं होतं.