Maharashtra Political News: राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. यामध्ये पहिल्यांदा नगरपंचायत आणि नगरपरिषदांच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे. यानंतर पंचायत समिती, जिल्हा परिषद आणि महानगरपालिकेच्या निवडणुका होणार आहेत.
दरम्यान, नगरपंचायत आणि नगरपरिषदांच्या निवडणुकीमध्ये आता रंगत आल्याचे पाहायला मिळत असून राजकीय नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैऱ्या झडत आहेत. याच पार्श्वभूमीवर आज दिवसभरातील ५ चर्चेत असलेल्या राजकीय विधानांचा आढावा घेऊया.
“यांना मुंबई नाव खटकतं कारण…”
केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्य मंत्री जितेंद्र सिंह यांनी ‘आयआयटी बॉम्बे’च्या नावाबद्दल केलेल्या वक्तव्यावरून महाराष्ट्र नवनिर्मान सेनेने आक्रमक भूमिका घेतल्याचे पाहायला मिळत आहे. मंत्री सिंह यांनी आयआयटीच्या नावातील ‘बॉम्बे’ तसेच ठेवले ते ‘मुंबई’ केले नाही ही चांगली गोष्ट असल्याचे म्हटले होते.
यावर प्रतिक्रिया देताना राज ठाकरे म्हणाले की, “केंद्रीय विज्ञान-तंत्रज्ञान मंत्री डॉ. जितेंद्र सिंग यांनी मुंबईत आयआयटीच्या कार्यक्रमात बोलताना, ‘आयआयटीच्या नावातील बॉम्बे तसेच ठेवले त्याचे मुंबई केले नाही, हे चांगले झाले असे विधान केले’. जितेंद्र सिंग यांचे विधान हे सरकारच्या मानसिकतेचे एक प्रतिक आहे असे स्पष्ट दिसतेय. ही मानसिकता काय आहे? तर मुंबई जी मराठी माणसाची होतीच, तिला महाराष्ट्रापासून पासून वेगळे करण्याचा डाव मराठी नेत्यांनी आणि जनतेने उधळून लावला. आणि आपली मराठी मुंबई महाराष्ट्रातच राहिली. त्याबद्दलची गेली अनेक दशके यांच्या पोटात साचलेली मळमळ पुन्हा एकदा बाहेर ओकायला सुरुवात केली आहे!”
“मी चुकीचा शब्द वापरला, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो”
“मी चुकीचा शब्द वापरला, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो”, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आंबेजोगाई येथील प्रचारसभेत केलेले वक्तव्य मागे घेतले आहे. अकोल्यातील प्रचारसभेत बोलताना अजित पवार म्हणाले, “काही नेत्यांची शहरे बकाल आहेत. ते सांगत असताना मी एक चुकीचा शब्द वापरला. मी तो शब्द वापरायला नको होता. त्याबद्दल मी सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो. कारण आपल्याला या सगळ्यात पडण्यापेक्षा विकास साधायचा आहे.”
“जातीवरून राजकारण करणाऱ्यांना मतदानातून उत्तर द्या”
“काही राजकारणी स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी आपल्यात फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत, त्याना निवडणुकीच्या वेळी मतदानातून उत्तर द्या”, असे आवाहन ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी केले आहे. नाना पाटेकर यांनी मंगळवारी (२५ नोव्हेंबर) छत्रपती संभाजीनगरमधील एका महाविद्यालयाला भेट दिली. यावेळी नानांनी उपस्थित विद्यार्थ्यांशी संवाद साधला. तसेच विद्यार्थांना आवाहन केले की “जातीपातीच्या मुद्दयांना केराची टोपली दाखवा. जातीवरून राजकारण करणाऱ्यांना मतदानातून उत्तर द्या.”
“अशोकराव भाकरी खातात की नोटा”
वादग्रस्त आणि बेधडक वक्तव्यांसाठी ओळखले जाणारे शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट यांनी भाजपा नेते खा.अशोक चव्हाण यांच्यावर त्यांच्या कर्मभूमीत तोफ डागली आहे. चव्हाण परिवाराकडे असलेल्या वेगवेगळ्या एजन्सींचा संदर्भ देत, अशोकराव भाकरी खातात की, नोटा असा सवाल शिरसाट यांनी भोकर येथील सभेमध्ये केला.
“नांदेड-भोकर प्रवासादरम्यान आमदार हेमंत पाटील यांनी खासदार अशोक चव्हाण यांच्या व्यवसायाची माहिती दिली. ही एजन्सी त्यांच्याकडे, ती एजन्सी त्यांच्याकडेच… असल्याचे ऐकल्यानंतर अशोकराव भाकरी खातात का, नोटा असा प्रश्न आपल्याला पडला. सर्वजण भाकरीच खातात. कोणाला एक लागते, कोणाला जास्त लागते. मग अशोकरावांना एवढा पैसा कशाला हवा”, असा सवाल शिरसाट यांनी केला.
२४ तासांत अजित पवारांचा राजीनामा घ्यावा
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीने आणि पार्थ पवारांनी खूप मोठा घोटाळा केला आहे. महाराष्ट्रात फक्त भ्रष्टाचार चालला आहे. महाराष्ट्राची संस्कृती नीट होणे गरजेचे आहे, असे म्हणत अंजली दमानिया यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. तसेच अजित पवारांचा राजीनामा झाला नाही तर अमित शाह यांची भेट घेणार आहे असेही अंजली दमानिया यांनी म्हटले आहे.
“माझी मागणी आहे की, देवेंद्र फडणवीस यांनी २४ तासांत अजित पवारांचा राजीनामा घ्यावा. तर माझी दुसरी मागणी आहे की, तातडीने एसआयटी बरखास्त केली गेली पाहिजे कारण त्यात सहा पैकी पाच लोक पुण्याचे अधिकारी आहेत. नवी एसआयटी स्थापन करा अशी मागणी दुसरी मागणी आहे. दहा दिवसांच्या आत या एसआयटीने अहवाल दिला पाहिजे. तसेच अजित पवारांचा राजीनामा झाला नाही तर मी अमित शाह यांची दिल्लीत जाऊन भेट घेणार आहे”, असे अंजली दमानिया म्हणाल्या.
