Maharashtra Political News: हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरूवात झाली आहे. या अधिवेशनात राज्यातील विविध महत्वाच्या विषयांवरून सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने येण्याची शक्यता आहे. यातच आज वेगवेगळ्या आरोपांनी राजकारण गाजलं आहे. शिंदेंच्या शिवसेनेचे २२ आमदार भाजपाच्या गळाला लागल्याचा दावा आदित्य ठाकरेंनी केला. तर शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार भाजपात घेऊन काय करायचं? असं मुख्यमंत्री फडणवीसांनी म्हटलं आहे. दुसरीकडे तुकाराम मुंढेंना निलंबित करून अटक करण्याची मागणी भाजपा आमदाराने केली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली. दरम्यान, यासह आज दिवसभरातील महत्वाची पाच राजकीय विधाने काय आहेत? जाणून घेऊयात.

२२ आमदार या पक्षात उडी मारणार : आदित्य ठाकरे

राज्यात एका नियमबाह्य बनलेल्या पक्षात दोन गट पडले आहे. त्यापैकी एका गटातील २२ आमदार एका पक्षात उडी मारण्याच्या तयारीत आहे, असा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला. नागपुरातील हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधान भवन परिसरात पत्रकारांशी ते बोलत होते. यावेळी आदित्य ठाकरे म्हणाले, राज्यात गद्दारी करून एक नियमबाह्य पक्ष बनला. या पक्षाचे आता दोन गट पडले आहे. त्यापैकी २२ जण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गळाला लागले आहे. मुख्यमंत्र्यांच्या सांगण्यावरून हे सर्व आमदार उठतात आणि बसतात. विधानसभा निवडणूकीत मुख्यमंत्र्यांनी त्याबाबत एक इशाराही दिला होता. हा इशारा कुणाला होता, असे सांगत आदित्य ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना चिमटा काढला.

शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार भाजपात घेऊन काय करायचं? : मुख्यमंत्री फडणवीस

‘एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे २२ आमदार भाजपाच्या गळाला लागले आहेत’, असं वक्तव्य आदित्य ठाकरे यांनी केलं. त्यांच्या या वक्तव्यावर बोलताना फडणवीस म्हणाले की, “आता उद्या असं कोणीही म्हणू शकेल की, आदित्य ठाकरे यांचे जे २० आमदार आहेत, तेही भाजपाच्या गळाला लागलेत. असं कोणाच्या म्हणण्याने थोडं काही होतं. शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार आमच्याकडे घेऊन काय करायचं? ते आमचेच आहेत. शिंदे शिवसेना ही आमचा मित्र पक्ष आहे. तिच खरी शिवसेना आहे. आमच्या मित्र पक्षाचे आमदार आमच्याकडे घेण्याचं अशा प्रकारचं राजकारण आम्ही कधीही करत नाहीत. उलट शिंदेंची शिवसेना आणखी मजबूत झाली पाहिजे, यासाठी आम्ही शिवसेनेच्या पाठिशी आहोत”, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

भाजपाकडून काँग्रेसने काय शिकावं? वडेट्टीवारांनी सांगितले चार मुद्दे

विजय वडेट्टीवार यांना एका मुलाखतीत काँग्रेस आणि महाविकास आघाडीबाबत एक प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर विजय वडेट्टीवार यांनी खोचकपणे भाष्य करत भारतीय जनता पक्षावर टीका केली. विजय वडेट्टीवार म्हणाले की, “आम्ही त्यांच्याकडून दोनच गोष्टी शिकल्या पाहिजेत. त्या म्हणजे आम्ही आमच्या भाषणाचे मुद्दे बदलले पाहिजेत. हिंदू-मुस्लिम करत राहिलं पाहिजे. आम्ही भारत-पाकिस्तान करत राहिलं पाहिजे. तसेच आणखी एक मुद्दा की आम्ही मशिद-मंदिराबाबत आमचं भाषण सुरू असलं पाहिजे, पण ते मंदिराच्या बाजूने. तरच आम्हाला यातून पुढे जाण्यासाठी स्कोप आहे”, असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं.

“धनंजय मुंडेंनी मला मारण्यासाठी अडीच कोटींची सुपारी दिली”, मनोज जरांगेंचा आरोप

“धनंजय मुंडेंनी माझ्या घातपातासाठी अडीच कोटी रुपयांची सुपारी दिली आहे”, असा गंभीर आरोप मराठा आरक्षणासाठी लढणारे आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. या प्रकरणातील आरोपींनी पोलीस चौकशीत सगळं काही सांगूनही जालन्याचे पोलीस अधीक्षक धनंजय मुंडे यांना ताब्यात का घेत नाहीत? असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला आहे. दुसऱ्या बाजूला मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या आरोपावर माजी मंत्री धनंजय मुंडे म्हणाले, “या प्रकरणी पोलीस तपास करत आहेत. त्यामुळे मी यावर काहीच बोलणार नाही.”

“तुकाराम मुंढेंना निलंबित करून अटक करा”, भाजपा आमदाराची मागणी

भारतीय जनता पार्टीचे दोन आमदार महाराष्ट्र विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात वरिष्ठ सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांच्याविरोधात विशेष लक्षवेधी सूचना मांडून त्यांना निलंबित करण्याची मागणी करणार आहेत.“मुंढे हे नागपूर महापालिकेचे आयुक्त असताना, त्यांनी अधिकार नसताना स्मार्ट सिटी प्रकल्पात ढवळाढवळ केली होती. त्यांच्याकडे स्मार्ट सिटी प्रकल्पाचं मुख्य कार्यकारी अधिकारी पद नसतानाही त्यांनी नियमबाह्य पद्धतीने एका कंत्राटदाराला २० कोटी रुपयांचा धनादेश दिला होता” असा आरोप भाजपा आमदार कृष्णा खोपडे यांनी केला.

“गेल्या महन्यात, २० ऑक्टोबर रोजी एक पत्रक आलं. यामध्ये म्हटलं आहे की तुकाराम मुंढे यांच्याकडे स्मार्ट सिटीच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदाचा अधिभार नव्हता, तशी मान्यताच नव्हती. आम्ही काल मंत्रालयात यासंदर्भात चौकशी केली, तेव्हा समजलं की अशी मान्यता देता येत नाही. हे बेकायदेशीर आहे. कोणाकडेही असा अधिभार द्यायचा असेल तर त्याला नगरविकास विभागाचे अप्पर मुख्य सचिव किंवा नगरविकास मंत्र्यांनी तसा आदेश देणं गरजेचं असतं. त्यामुळे मी व आमदार प्रवीण दटके यांनी विधानसभेत याप्रकरणी लक्षवेधी टाकली. त्यावर सभागृहात चर्चा होईल. आम्ही सभागृहात मागणी करणार आहोत की तुकाराम मुंढे यांना तातडीने निलंबित करून अटक करावी, असं आमदार कृष्णा खोपडे यांनी म्हटलं आहे.