Maharashtra Political News : मुंबई महापालिकेच्या महापौर पदावरून मोठ्या घडामोडी सरू आहेत. उपमुख्यमंत्री शिंदेंनी भाजपाकडे अडीच वर्षे महापौरपदासाठी प्रस्ताव ठेवल्याची चर्चा आहे. या घडामोडी सुरू असतानाच दोन्ही शिवसेना एकत्र येणार असल्याची चर्चा रंगली आहे. एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंना पाठिंबा देणार? अशाही चर्चा सुरू आहेत. या चर्चांचं कारण म्हणजे भास्कर जाधवांचं वक्तव्य. ‘मुंबईच्या महापौरपदासाठी शिंदेंनी उद्धव ठाकरेंना पाठिंबा द्यावा’, भास्कर जाधव यांनी म्हटलं. तर गुलाबराव पाटील यांनी दोन्ही शिवसेना एकत्र येण्याबाबत सूचक भाष्य करत राजकारणात कोणी कोणाबरोबर जाऊ शकतं असं म्हणत खळबळ उडून दिली. यातच शिवसेना (शिंदे) पक्षात खांदेपालटाची चर्चा सुरू असून गुलाबराव पाटलांचं मंत्रिपद जाणार असल्याची चर्चा आहे. दरम्यान, यासह आज दिवसभरातील महत्वाची पाच राजकीय विधाने काय आहेत? जाणून घेऊयात.
उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदे एकत्र येणार? गुलाबराव पाटलांचं मोठं वक्तव्य
शिवसेना (शिंदे) पक्षाचे नेते गुलाबराव पाटील यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे दोन्ही शिवसेना एकत्र येणार का? याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत. भविष्यात दोन्ही शिवसेना एकत्र येतील का? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. यावर बोलताना गुलाबराव पाटील म्हणाले की, “ते दोघे (राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे) एकत्र आले आहेत. प्रत्येकाचा विचार असतो. राजकारणात काहीच सांगता येत नाही. कोण कधी कुणाबरोबर जाईल हे सांगता येत नसतं. त्यामुळे भविष्यवाणी मी करत नाही. आपण आता पाहत आहोत की एमआयएम कुणाबरोबर युती करत आहे, त्यामुळे राजकारणात कोणी कोणाबरोबर जाऊ शकतं हे कन्फर्म सांगू शकत नाही”, असं ते म्हणाले. शिवसेना एकत्र येतील का? यावर बोलताना गुलाबराव पाटील म्हणाले की,“राजकारणात काहीही होऊ शकतं.”
‘मुंबईच्या महापौरपदासाठी शिंदेंनी ठाकरेंना पाठिंबा द्यावा’ : भास्कर जाधवांचं वक्तव्य
मुंबई महापालिकेच्या महापौर पदावरून राजकीय घडामोडी सुरू असतानाच भास्कर जाधव यांनी एक मोठं वक्तव्य केलं. भास्कर जाधव म्हणाले की, “उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी १०० टक्के उद्धव ठाकरे यांना पाठिंबा द्यायला पाहिजे. एकनाथ शिंदे यांचा पाठिंबा उद्धव ठाकरे हे घेतील की नाही? हा भाग नंतरचा. तुम्ही बाळासाहेब ठाकरे यांचे वारसदार म्हणून जर सांगत असाल तर तुम्ही तुमचा मान, सन्मान, गर्व, अहंकार, बाजूला ठेवत तुम्ही कमीपणा घेतला पाहिजे. माझं म्हणणं असं आहे की मुंबई महापालिकेत महापौर पदासाठी एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना पाठिंबा दिला पाहिजे.”
“कधीतरी थोडी लवचिक भूमिका घेतली तरी…”, राज ठाकरेंची पोस्ट चर्चेत
बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीनिमित्ताने राज ठाकरेंनी पोस्ट शेअर केली. पोस्टमध्ये त्यांनी काही सूचक उल्लेख केले आहेत. राज ठाकरे म्हणाले की, “बाळासाहेबांसारखी प्रतिभा परत कधी बघायला मिळणार नाही हे जितकं खरं आहे तितकंच बाळासाहेबांसारखं राजकारण करणं यापुढे कोणालाच जमणार नाही हे देखील खरं आहे. पण त्यांच्या प्रतिमेला कुठेही धक्का लागणार नाही आणि त्यांनी मराठी भाषेसाठी, मराठी माणसासाठी उभारलेला लढा हा मात्र धगधगत राहील, हे पाहाणं बाळासाहेबांच्या पुढच्या पिढ्यांच्या हातात आहे आणि ते आम्ही नेटाने करू हा आमचा मराठी माणसाला शब्द आहे. मी एक शब्द आज पुन्हा देतो की आरपार बदललेल्या राजकारणात कधीतरी थोडी लवचिक भूमिका घेतली तरी ती माझ्या व्यक्तिगत फायद्यासाठी किंवा स्वार्थसाठी कधीही नसेल.”
शिवसेना शिंदे गटात खांदेपालट होणार? गुलाबराव पाटलांचं मंत्रिपद जाणार?
राज्य मंत्रिमंडळात खांदेपालट होण्याचेही संकेत मिळत आहेत. काही मंत्र्यांच्या कामगिरीबाबत शिवसेना शिंदे गटाच्या पक्ष नेतृत्वाकडून नाराजी व्यक्त केली गेली. जिल्हा परिषदेसह पंचायत समित्यांच्या निवडणुकांपूर्वी मंत्रिमंडळात तातडीने फेरबदल करून नव्या चेहऱ्यांना संधी देण्याची शक्यता वर्तवली जात आहे. काही मंत्र्यांची खाती बदलली जाण्याची किंवा काही नव्या आमदारांना मंत्रिपद देण्याची चर्चा जोर धरू लागली. ज्यामध्ये राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांचा समावेश असल्याचं खात्रीलायक वृत्त आहे. याबाबत बोलताना गुलाबराव पाटील म्हणाले की, “ज्यांनी पक्षात मंत्री केलं त्यांनी मंत्रिपदावरून काढलं तरी मला काही फरक पडणार नाही. शेवटी ज्याने दिलं त्याला वाटलं की हा बरोबर नाही तर मला आनंद आहे. त्यांना वाटत असेल की गुलाबराव पाटील यांचा फरफॉर्मन्स किंवा स्ट्राईक रेट खराब आहे तर गुलाबराव पाटलावर विषय येईल. पण जळगाव महापालिका किंवा नगरपालिकांमध्ये धरणगाव वगळता आम्ही मजबुतीने पक्षाचं काम केलं”
भाजपाने MIM ला पाठिंबा का दिला? अचलपूरमधील युतीबाबत बावनकुळेंचं स्पष्टीकरण
अचलपूर नगरपालिकेत भारतीय जनता पक्ष आणि एमआयएम एकत्र आल्याची चर्चा आहे.या चर्चांवर भाजपाचे नेते चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, अचलपूरमध्ये वेगळी परिस्थिती आहे, तेथे भाजपाचे ९ नगरसेवक आहेत. बाकी सर्व काँग्रेस, शिवसेना (ठाकरे), एमआयएम निवडून आले आहेत. त्या सर्वांनी आपापले गट तयार केले आहेत. भाजपाच्या गटात कोणीही एमआयएम, काँग्रेस नाही. तेथे काँग्रेसने आपला एक गट तयार केला, स्थानिक विकास आघाडीने एक वेगळा गट तयार केला, त्यांनी बसून तेथे…आम्ही (भाजपा) अल्पमतात आहोत. एकूण ३६-३७ नगरसेवक आहेत, त्यांनी गट तयार करून त्यांनी सभापतीपद वाटून घेतले. भाजपाचा काही संबंध नाही. भाजपा एमआयएमला कधीच सोबत घेणार नाही. कालही आम्ही स्पष्ट केलं की अचलपूरमध्ये एमएमचा आम्हाला कोणताही पाठिंबा नाही आणि आमचा कुठलाही पाठिंबा एमआयएमला नाही.”
