Maharashtra Political News : भाजपा आणि शिंदे सेनेत मुंबई महापालिकेच्या महापौर पदावरून घडामोडी सरू आहेत. असं असतानाच खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेबाबत एक मोठा दावा केला. शिंदेंकडून धनुष्यबाण चिन्ह लवकरच जाणार असल्याचा दावा त्यांनी केला. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं. एवढंच नाही तर देशातल्या विशिष्ट खात्यांची सत्ता आली तर भारतीय जनता पार्टीचे १५ तुकडे करुन दाखवेन, असंही संजय राऊत यांनी म्हटलं. दरम्यान, यासह आज दिवसभरातील महत्वाची पाच राजकीय विधाने काय आहेत? जाणून घेऊयात.
“आम्ही त्यांच्या विरोधात…”, वसंत मोरेंच्या आरोपांवर प्रशांत जगतापांचं वक्तव्य
महापालिका निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर वसंत मोरे यांनी काँग्रेसचे नेते प्रशांत जगताप यांच्यावर गंभीर आरोप केले होते. माझा पराभव करण्यासाठी प्रशांत जगतापांनी भाजपाबरोबर हातमिळवणी केल्याचा आरोप वसंत मोरे यांनी केला होता. त्यांच्या आरोपांवर प्रशांत जगताप म्हणाले की, “वसंत मोरे यांच्या सारख्या एका आंतरराष्ट्रीय नेत्याने माझ्यावर टिप्पणी करावी एवढे वसंत मोरे मोठे नाहीत आणि मी देखील एवढा छोटा नाही. कारण वसंत मोरे आंतरराष्ट्रीय नेते आहेत, त्यांना ५ ते ६ लाख फॉलोअर्स आहेत. त्यांना २० हजार मते पडली आहेत आणि त्यांच्या मुलाचं डिपॉजिट जप्त झालं. त्यामुळे त्यांच्या सारख्या नेत्याने माझ्यावर बोलावं? याबाबत त्यांनी आत्मचिंतन करावं. त्यांच्या प्रभागातील एका भाजपाच्या नवख्या कार्यकर्त्याने वसंत मोरेंचा पराभव केला. मुळात ज्या दिवशी त्यांचा पराभव झाला त्या दिवशी मी त्यांच्याशी बोललो की भाजपाने मनी आणि मस्सल पॉवरचा वापर केला. मात्र, असं असताना वसंत मोरेंनी आमच्यावर का आरोप केले माहिती नाही. मी असेल किंवा अरविंद शिंदे असतील किंवा कॉग्रेस पक्ष असेल. आम्ही वसंत मोरेंच्या विरोधात उमेदवार उभा केला नाही”, असं प्रशांत जगताप यांनी म्हटलं.
“…तर भाजपाचे १५ तुकडे करेन”; संजय राऊत यांचं वक्तव्य
“कल्याण डोंबिवलीत आमचे जे नगरसेवक निवडून आले आहेत, ते हरवल्याची तक्रार आम्ही केली. मशाल या चिन्हावर तुम्ही निवडून येता आणि त्यानंतर २४ तासांत तुम्हाला वेगळे कोंब फुटतात तर ही बेईमानी आहे. माझ्यासारख्या माणसाच्या हातात या राज्याची किंवा देशातल्या विशिष्ट खात्यांची सत्ता आली तर भारतीय जनता पार्टीचे १५ तुकडे करुन दाखवेन. भाजपाचे देशभरात १५ तुकडे करेन. हे तुकडे कुठे गेले त्यांना कळणारही नाही. ईडी, सीबीआय आणि पोलीस यांच्या जोरावर सगळं चाललं आहे, स्वतःचं काय आहे? भाजपाचा पूर्ण काँग्रेस झाला. राष्ट्रवादीचे लोक त्यांच्यात आहेत. एकनाथ शिंदेंसारख्या विकृतीच्या लोकांचं अस्तित्व राहणार नाही आमच्या हातात सत्ता आल्यावर. हातात सत्ता असेल आणि अशा प्रकारे काहीही केलं जाऊ शकतं”, अशी टीका संजय राऊत यांनी केली.
“लोकसभा निवडणुकीपूर्वी शिवसेना पक्ष शिंदेंच्या हातात नसेल”, संजय राऊतांचा दावा
“पुढच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीपर्यंत एकनाथ शिंदे यांच्याकडे शिवसेना पक्ष राहणार नाही, हे मी खात्रीने सांगतो. येत्या काही दिवसांमध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर निवडणूक आयोगाकडून धनुष्यबाण हे चिन्ह गोठवले जाईल. याची भीती असल्यामुळेच सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी वारंवार पुढे ढकलली जात असून शिवसेना पक्ष व चिन्ह सुनावणीबाबत वारंवार तारखा दिल्या आहेत. एकनाथ शिंदेंना भाजपात विलीन व्हावं लागेल अशी स्थिती येईल. कारण सत्तेचा अमरपट्टा घेऊन कुणीही आलेलं नाही”, असं खासदार संजय राऊत यांनी एका मुलाखतीत बोलताना म्हटलं.
“हिंदुस्थान कुणाच्या बापाचा नाही, आम्ही भारतीय मुस्लीम आहोत!”, सहर शेख यांचं विधान
ठाणे महापालिका निवडणुकीत विजयी झालेल्या मुंब्य्रातील एआयएमआयएमच्या नगरसेविका सहर शेख या चर्चेत आहेत. सहर शेख यांनी काही दिवसांपूर्वी मुंब्य्रातील सभेत ‘कैसा हराया, अभी हम लोगो को मुंब्रा को पुरा हरा कर देना है’ हे वक्तव्य केले होते. त्यांचे हे वक्तव्य समाजमाध्यमांवर प्रचंड वायरल झाले. या वक्तव्यानंतर सर्वत्र खळबळ उडाली होती. आता पुन्हा एकदा त्यांनी माध्यमांसमोर प्रतिक्रिया दिली. त्यात, त्या म्हणाल्या आहेत की, ‘भारत कुणाच्या बापाचा नाही, आम्ही भारतीय मुस्लीम आहोत!’ या विधानामुळे पुन्हा त्या चर्चेत आल्या आहेत.
पुण्याच्या महापौरपदी कोणाची वर्णी लागणार? मुरलीधर मोहोळांचं भाष्य
पुण्याच्या महापौरपदी कोणाची वर्णी लागणार? याबाबत बोलताना मंत्री मुरलीधर मोहोळ म्हणाले की, “मतदानानंतर निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर महापौर निवडीसाठी एक प्रक्रिया असते. महापौर आणि उपमहापौर निवडीच्या आधी प्रशासनाला ७ दिवस एक नोटीस प्रसिद्ध करावी लागते. माझ्या माहितीनुसार, महापालिकेच्या नगरसचिवांनी ६ फेब्रुवारी ही तारीख निश्चित केली. आता आमचा गटनेता दोन दिवसांत निवडला जाईल. त्यानंतर महापौर पदाची निवडणूक ६ फेब्रुवारीला होईल. ३० जानेवारीला महापौर आणि उपमहापौर पदाचे आमचे उमेदवार जाहीर होतील आणि त्याच दिवशी महापौर पदाच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल केले जातील”, असं मुरलीधर मोहोळ यांनी म्हटलं.
