Maharashtra Politics : अमेरिका-इस्रायल आणि इराणमधील युद्धाचा जगातील अनेक देशांना मोठा फटका बसत आहे. एवढंच नाही तर संपूर्ण आखाती राष्ट्रांमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे. या पार्श्वभूमीवर बोलताना ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी भारताचे पंतप्रधान मोदी यांना एक पत्र लिहित जागतिक शांततेसाठी पुढाकार घेण्याचा सल्ला दिला आहे. तर दुसरीकडे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलेल्या एका वक्तव्याची राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे. दरम्यान, यासह आज दिवसभरातील राजकीय नेत्यांची पाच महत्वाची विधाने काय आहेत? जाणून घेऊयात.

जागतिक तणावात भारताने शांततेसाठी प्रयत्न करावे, अण्णा हजारे यांचं पंतप्रधानांना पत्र

सध्या जागतिक स्तरावर सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून भारताने जागतिक स्तरावर शांतता व संवाद वाढवण्यासाठी प्रयत्न करावेत, असं आवाहन केलं आहे. अण्णा हजारे यांनी पंतप्रधानांना पाठवलेल्या पत्रात सध्याची जागतिक परिस्थिती अतिशय चिंताजनक असल्याचं नमूद केलं. विविध देशांमधील वाढता तणाव व संघर्ष यामुळे सामान्य नागरिकांचं जीवन असुरक्षित होत चाललं आहे. या घटनांमधून निरपराध महिला, बालके, त्यांचं कुटुंबीय यांच्यावर होणारा परिणाम हा अतिशय दुःखदायक व वेदनादायी ठरत असल्याकडे लक्ष वेधलं. भारताची संस्कृती ही अहिंसा व शांततेची आहे. आपल्या देशाने नेहमीच जागतिक परस्पर संवाद व शांतता याचा मार्ग दाखवण्याचा प्रयत्न केला. भारतासारख्या मोठ्या लोकशाहीवादी देशाने मानवता व शांततेचा संदेश देणं अत्यंत आवश्यक असल्याचं अण्णा हजारे यांनी पत्रात नमूद केलं.

महिला दिनानिमित्त उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची मोठी घोषणा

मुंबईतील प्रभादेवी येथे महाराष्ट्र राज्य महिला आयोग आयोजित ‘जागतिक महिला दिन २०२६’च्या कार्यक्रमात आज उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार सहभागी झाल्या होत्या. यावेळी त्यांनी महिलांवरील अन्याय अत्याचार कमी व्हावेत, अत्याचारांविरोधात आवाज उठवता यावा याकरता महिलांसाठी एक ऑनलाईन व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याची घोषणा केली. सुनेत्रा पवार म्हणाल्या की, “उद्याच्या जागतिक महिला दिनानिमित्त महिलांना शुभेच्छा. महिला आयोगाच्या कार्यक्रमात महिला सन्मान पोर्टल अनावरण करण्यात आलंय. या पोर्टलमुळे महाराष्ट्रातील सगळीकडच्या महिलांना, मुलींना त्यांच्यावर अत्याचार किंवा सायबर गुन्हे झाले तर त्यावर तक्रार नोंदवू शकता. हे पोर्टल संबंध पोलीस यंत्रणेशी जोडलं गेलं आहे. त्यांची तक्रार लगेच नोंदवली जाईल. त्यातून तत्काळ न्याय मिळण्याची व्यवस्था यात आहे. तळागाळातील मुली किंवा ज्या तक्रार करायला घाबरतात त्यांना याचा फायदा होणार आहे.”

“मी दंडुका घेऊन बसतो…”, नितीन गडकरींचं वक्तव्य चर्चेत

देशाच्या ऊर्जा स्वावलंबनाच्या मार्गात पेट्रोलियम लॉबीचा दबाव आणि मोठा अडथळा असल्याचा गौप्यस्फोट केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी केला. मी दंडुका घेऊनच बसतो. मला मॅनेज करणारा अजून जन्माला आलेला नाही, असा थेट इशाराही त्यांनी दिला. पुण्यातील एका कार्यक्रमात बोलताना गडकरी म्हणाले की, ‘आजच्या आंतरराष्ट्रीय परिस्थितीत सुरू असलेल्या युद्धांमुळे ऊर्जा सुरक्षिततेचं महत्त्व अधिक वाढलं. भारत अजूनही मोठ्या प्रमाणावर ऊर्जा आयातीवर अवलंबून असून सुमारे ८६ टक्के ऊर्जा गरजा आयातीतून भागवल्या जातात. यासाठी दरवर्षी जवळपास २२ लाख कोटी रुपये देशाबाहेर जातात. त्यामुळे ऊर्जा क्षेत्रात स्वावलंबन मिळवणं ही काळाची गरज आहे. पर्यायी इंधनांच्या प्रसारात मोठ्या आर्थिक हितसंबंधांमुळे अडथळे येतात. पेट्रोलियम क्षेत्राशी संबंधित मोठी लॉबी या बदलाला सहजपणे स्वीकारणार नाही. देशातून दरवर्षी होणाऱ्या २२ लाख कोटी रुपयांच्या इंधन आयातीमुळे अनेकांचे आर्थिक हितसंबंध जोडलेले आहेत. त्यामुळे पर्यायी इंधनांचा प्रसार रोखण्याचा प्रयत्न होणं स्वाभाविक आहे. मात्र अशा दबावाला घाबरण्याचं कारण नाही”, असंही नितीन गडकरी म्हणाले.

“आता आपलं वय झालं, उर्वरित आयुष्य…”, रितेश देशमुख यांच्यासमोर गडकरी काय म्हणाले?

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी अनेकदा आपल्या भाषणातून चाहत्यांना कधी सुखद तर कधी आश्चर्याचा धक्का दिला. त्यामुळे त्यांच्या चाहत्यांचे त्यांच्या भाषणाकडे नेहमीच लक्ष असते. शनिवारीही त्यांनी एका कार्यक्रमात अभिनेता रितेश देशमुखच्या उपस्थितीत नव्या तरुणांच्या गळ्यात जबाबदारीची माळ घातली पाहिजे, असं सांगितलं. आता आपलं वय झालं. उर्वरित आयुष्य सामाजिक कार्यात घालावं, अशी इच्छा आहे. या कामात खूप आनंद आहे. पण मागे अनेक जबाबदाऱ्या आहेत, अशी खंत गडकरी यांनी व्यक्त केली.

“उन्मेश पाटील पुन्हा जळगावचे खासदार…”, उपमुख्यमंत्री शिंदेंचं विधान चर्चेत

शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते तथा माजी खासदार उन्मेश पाटील यांनी शुक्रवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटात अधिकृत प्रवेश केला. या वेळी बोलताना उपमुख्यमंत्री शिंदे यांनी “उन्मेश पाटील पुन्हा जळगावचे खासदार होतील,” असे विधान केले. त्यांच्या या वक्तव्यामुळे जळगाव जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, नव्या चर्चांना उधाण आले आहे.