Maharashtra Politics : नाशिकमधील अशोक खरात प्रकरणाची राज्यात मोठी चर्चा सुरू आहे. या अशोक खरातला बलात्काराच्या आरोपाखाली पोलिसांनी अटक केलं आहे. मात्र, याच अशोक खरातची पाद्यपूजा करताना महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांचे काही फोटो समोर आल्यामुळे विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे. तसेच रूपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याची मागणी रुपाली ठोंबरे यांच्यासह विरोधकांनी केली आहे. दरम्यान, याच अशोक खरात प्रकरणावर बोलताना खासदार संजय राऊतांनीही एक मोठं वक्तव्य केलं. ‘अशोक खरात प्रकरण एपस्टिन फाईल्सपेक्षा भयंकर’ असल्याचं राऊतांनी म्हटलं. दरम्यान, यासह आज दिवसभरातील राजकीय नेत्यांची पाच महत्वाची विधाने काय आहेत? जाणून घेऊयात.
“अशोक खरात प्रकरण एपस्टिन फाईल्सपेक्षा भयंकर”, खासदार संजय राऊतांचं वक्तव्य
अशोक खरात या स्वयंघोषित भोंदूबाबाला पोलिसांनी अटक केली. या प्रकरणावर बोलताना खासदार संजय राऊतांनी मोठं वक्तव्य केलं. राऊत म्हणाले की, “महाराष्ट्रातल्या राजकारण्यांचे अध्यात्मिक मार्गदर्शक अशोक खरात यांना बलात्काराच्या प्रकरणात अटक झाली. बलात्काराच्या प्रकरणातलं एक प्रकरण नाही, अनेक प्रकरणं समोर येत आहेत. ५८ व्हिडीओ जप्त करण्यात आले. महाराष्ट्रातल्या सामाजिक, राजकीय आणि इतर क्षेत्रातल्या अनेकांचे पुरावे पोलिसांनी जप्त केलेल्या मुद्देमालात आहेत. महाराष्ट्राने अंधश्रद्धा निर्मूलन कायदा मंजूर केला. मग महिला आयोगाच्या अध्यक्षा, मंत्री, आमदार हे सगळे अंधश्रद्धा कुरवाळत कुणी त्या बाबाचं पाद्यपूजन करत आहेत, कुणी पूजेला बसलं. कुणी जादूटोणा करतंय. ज्यांची छायाचित्रं आली आहेत त्या सगळ्यांवर फडणवीसांनी गुन्हे दाखल केले पाहिजे. चाकणकर या महिला आयोगाच्या अध्यक्षा आहेत. त्यांचं काम असतं की महिलांवर होणाऱ्या अत्याचाराला वाचा फोडणं. पण जर बलात्कार करणाऱ्या व्यक्तीचे पाय रुपाली चाकणकर धुत असतील, मंत्री त्यांच्या चरणाशी बसत असतील तर या सगळ्यांना पदावर कसं काय ठेवू शकतात?. अशोक खरातचं प्रकरण हे एपस्टिन फाईल्सपेक्षा भयंकर आहे”, असं संजय राऊतांनी म्हटलं आहे.
“चाकणकर पुरावे नष्ट करतील”, कॅप्टन खरात प्रकरणी रुपाली ठोंबरेंचे गंभीर आरोप
राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याची मागणी केली. चाकणकरांना सहआरोपी करुन याप्रकरणाशी निगडीत सर्वांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी रुपाली ठोंबरे पाटील यांनी केली. महिला आयोगाच्या अध्यक्षांचे असलेले पाठबळ यामुळे अशोक खरात या भोंदू बाबाची हिम्मत वाढल्याचा आरोप पाटील यांनी केला. “अशा पाठिंब्याशिवाय खरातच नव्हे कुठल्याच गुन्हेगाराची हिम्मत वाढणार नाही. शिवाय यात आणखी कोणाचे राजकीय हस्तक्षेप आहेत का? याचाही तपास करण्याची गरज आहे. वर्षभरापूर्वी प्रसिद्ध झालेल्या बातमीच्या आधारे अशोक खरातची राज्य महिला आयोगाने चौकशी करायला हवी होती. तसेच संबंधित महिलेची तक्रार घेऊन गुन्हा दाखल करायला हवा होता. यामुळे ५८ महिला या अत्याचाराला बळी पडल्या नसत्या. चाकणकर पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष असल्याने बदानामी होत आहे. बदनामी होऊ नये म्हणून त्यांनी राजीनामा मागितला होता. पण पक्षामध्ये पण काही नेते आहेत त्यांच्यावर देखील खरातच्या माध्यमातून वशीकरण करण्यात आलं असं वाटंत आणि म्हणून तो राजीनामा होत नाही. येत्या काळात राजीनामा होत नाही म्हणून प्रयत्न करणाऱ्या नेत्यांची नावे समोर येतील. कारवाई करु नये म्हणून पोलिसांना फोन करणाऱ्या नेत्यांची नावे देखील समोर आणणार”, असं रुपाली ठोंबरे पाटील म्हणाल्या आहेत.
गुढीपाडव्यानिमित्त एकनाथ शिंदेंचा मोठा संकल्प; म्हणाले, “सोनं महाग झालं…”
‘सोनं महाग झालं असलं तरी महाराष्ट्रातील जनतेच्या आयुष्यात सोन्याचे दिवस आणण्याचा संकल्प या नवीन वर्षाला आम्ही केला आहे’, असं वक्तव्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे. ते म्हणाले की, ‘सोन महाग झालं असलं तरी नवीन वर्षात महाराष्ट्रातील जनतेच्या आयुष्यात सोन्याचे दिवस आणण्याचा संकल्प आहे. या राज्याला विकासाकडे नेण्याचा संकल्प आहे. या राज्याला समृद्धीकडे नेण्याचा संकल्प आहे. महाराष्ट्र राज्याचा देशातून पहिला क्रमांक लागतो. त्यामुळे या राज्याचा विकास आणखी वेगाने करण्याचा आमचा संकल्प आहे’, अशी भावना उपमुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केली.
“कॅप्टन खरात प्रकरणात रुपाली चाकणकरांचा काही दोष नाही”; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांचं वक्तव्य
राज्यात सध्या नाशिकमधील कॅप्टन खरात प्रकरण चर्चेत आहे. राजकीय वर्तुळात वावरणारा अशोक खरात याला बलात्काराच्या आरोपाखाली पोलिसांनी अटक केलं. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. मात्र, महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी याच अशोक खरातची पाद्यपूजा केल्याचे काही फोटो समोर आले. यावरून विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. या आरोपांवर बोलताना कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी चाकणकर यांची पाठराखण केली. कृषीमंत्री भरणे म्हणाले की, “कॅप्टन खरात प्रकरणात रुपाली चाकणकरांचा काही दोष नाही. त्या स्वत: तिथं गेल्या नाहीत. कार्यक्रमाच्या निमित्ताने भेटल्या असतील, त्यात त्यांची चूक नाही”, असं मंत्री भरणे यांनी म्हटलं आहे.
“महाराष्ट्राला पुढे न्यायचं, हाच नव्या वर्षाचा संकल्प”, मुख्यमंत्री काय म्हणाले?
महाराष्ट्रात गुढीपाडव्याचा उत्साह मोठ्या प्रमाणावर दिसून येतो आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीस हे नागपूर येथील शोभायात्रेत सहभागी झाले होते. यावेळी माध्यमांशी बोलताना फडणवीस म्हणाले की, मी सर्व हिंदूंना नुतन वर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या मनापासून शुभेच्छा देतो. आजचा दिवस आपण सगळे साजरा करतो. नागपूरमध्ये अतिशय चांगली शोभायात्रा आयोजित करण्यात आली होती. प्रचंड उत्साह या ठिकाणी पाहण्यास मिळतो. पारंपारिक वेशभुषेत माता, भगिनी, मुलं पाहण्यास मिळतात. साहसी खेळ सादर केले जातात. एक मोठा आनंद साजरा झालेला पाहण्यास मिळतो. त्यामुळे मी दरवर्षी या शोभायात्रेत येत असतो. इथली भव्यता पाहण्यास मिळते. नागपूरचा सगळा भाग भगवा झालेला पाहण्यास मिळतो. मला शोभायात्रेत सहभागी होऊन आनंद झाला. विकास आणि विरासत हे मोदीजी कायम सांगत असतात. विरासत म्हणजे आपली संस्कृती. आधुनिकता जपत असताना संस्कृतीही सांभाळायची असते. नवीन वर्षाचा संकल्प हाच आहे की महाराष्ट्राला पुढे न्यायचं आहे आणि महाराष्ट्रातील प्रत्येकाच्या आयुष्यात परिवर्तन घडवायचं आहे.”
