Maharashtra Politics : नाशिकमधील अशोक खरात प्रकरणाची राज्यात मोठी चर्चा सुरू आहे. अशोक खरातला बलात्काराच्या आरोपाखाली अटक झाली असून पुढील चौकशी सुरू आहे. मात्र, याच अशोक खरात बरोबर राज्यातील अनेक नेत्यांचे फोटो समोर आले आहेत. त्यामुळे खळबळ उडाली आहे. या प्रकरणात रुपाली चाकणकरांना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला. याच अशोक खरात प्रकरणावर आता मुख्यमंत्री फडणवीसांनी मोठं भाष्य केलं. विरोधी पक्षातले कोण-कोण नेते खरातकडे जायचे याचे पुरावे असल्याचंही फडणवीसांनी म्हटलं. तर अशोक खरातच्या सेक्स रॅकेटच्या मुख्य सूत्रधार रुपाली चाकणकर असल्याचं वक्तव्य रुपाली ठोंबरे पाटील यांनी केलं. दरम्यान, यासह आज दिवसभरातील राजकीय नेत्यांची पाच महत्वाची विधाने काय आहेत? जाणून घेऊयात.
“अशोक खरातचा एन्काऊंटर होऊ शकतो”, तृप्ती देसाई यांचं मोठं वक्तव्य
अशोक खरात प्रकरणाची मोठी चर्चा सुरू असून या प्रकरणावर बोलताना तृप्ती देसाई यांनी मोठं वक्तव्य केलं. तृप्ती देसाई म्हणाल्या की, “अनेक बडे नेते अशोक खरातच्या संपर्कात होते. आर्थिक देवाण-घेवाण होत होती. आमदार, खासदार, आयएस अधिकारी वगैरे सगळ्यांचे संबंध होते. २४ तारखेला अशोक खरातची पोलीस कस्टडी संपणार आहे. त्यावेळी या नेत्यांची नावं पुढे येऊ नयेत म्हणून एकच मार्ग राहतो. तो म्हणजे अशोक खरातला संपवण्याचा. अशोक खरातचा एन्काऊंटर होऊ शकतो, त्यामुळे मी मुख्यमंत्री फडणवीसांना आवाहन केलं की हा डाव त्यांनी उधळून लावावा. हे रॅकेट उद्ध्वस्त करण्याची आवश्यकता आहे. जे कुणी अधिकारी, नेते आहेत त्यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई झाली पाहिजे अशी माझी मागणी आहे. अशोक खरातला कायद्याने शिक्षा झाली पाहिजे”, असं तृप्ती देसाई यांनी म्हटलं.
अशोक खरात प्रकरणी मुख्यमंत्री फडणवीसांचं मोठं भाष्य
अशोक खरात प्रकरणावर बोलताना मुख्यमंत्री फडणवीसांनी मोठं वक्तव्य केलं. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, “अशोक खरात प्रकरण गंभीर आहे. आम्ही इंटेलिजन्सच्या आधारे भांडाफोड केला. लाजेखातर किंवा सामाजिक दबावामुळे एकदम महिला पुढे येत नाहीत. त्या पीडितांना धीर देऊन आम्ही महिलांना समोर आणत आहोत. या संपूर्ण प्रकरणाची वरिष्ठ स्तरावर मॉनिटरिंग होतं आहे. नाशिक सीपी आणि एसआयटी मिळून हे काम पूर्ण करत आहेत. कुणालाच आम्ही सोडणार नाही. या प्रकरणाला जो राजकीय रंग देण्याचा प्रयत्न चालला आहे तो विनाकारण आहे. विरोधी पक्षातले कोण-कोण जायचे खरातांकडे याचे पुरावे माझ्याकडे आहेत. सर्वाधिक पुरावे तर माझ्याकडे आहेत. पण ते पोलिसांकडे आहेत. पोलिसांचं काम पोलीस करत आहेत. खरातांना भेटणाऱ्यांपैकी कुणाचा सहभाग असेल तर त्यावर नक्की कारवाई होईल. पण कुणी भेटलं आहे अशा माणसावर कारवाई करायला लागलो तर मग तुम्हाला माहीत आहे कोण कोण कसं काय करायचं ते तुम्हाला म्हणजेच माध्यमांना माहीत आहे. या प्रकरणात राजकारण करु नये, हा महिलांच्या प्रतिष्ठेचा प्रश्न आहे”, असं मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटलं आहे.
‘अशोक खरातकडे जाणाऱ्या मंत्र्यांना सहआरोपी करा’, संजय राऊतांची मागणी
‘अशोक खरातच्या दरबारात जे सत्ताधारी जात होते त्यांना सहआरोपी करा’ अशी मागणी संजय राऊतांनी केली आहे. राऊत म्हणाले की, “महाराष्ट्र हा खूप पूर्वीपासून पुरोगामी, सुधारणावादी विचारांचा महाराष्ट्र आहे. अशा महाराष्ट्रात बुवाबाजी आणि भोंदुगिरी फोफावत असेल तर भोंदूबाबाच्या दरबारात जाणाऱ्या मंत्र्यांना सहआरोपी केलं पाहिजे. मंत्र्यांना सहआरोपी करेपर्यंत भोंदुगिरी थांबणार नाही. जे कुणी यातून पळवाट काढत आहेत ते खोटं बोलत आहेत. या प्रकारचा पहिला गुन्हा अशोक खरातवर २००३ मधे दाखल झाला आहे”, असं संजय राऊत म्हणाले आहेत.
रुपाली चाकणकरांबाबत रुपाली ठोंबरेंचं मोठं वक्तव्य
अशोक खरात या स्वयंघोषित बाबाला पोलिसांनी अटक केली. मात्र, याच अशोक खरात आणि रुपाली चाकणकर यांचे फोटो व्हायरल झाले. या फोटोंमध्ये रुपाली चाकणकर या अशोक खरातसाठी छत्री धरताना दिसत आहेत. दुसऱ्या एका फोटोत त्याची पाद्यपूजा करताना दिसत आहेत. यावरुन गदारोळ माजल्यानंतर रुपाली चाकणकर यांना पदाचा राजीनामा द्यावा लागला. या सगळ्या गोष्टी घडल्यावर रुपाली ठोंबरे पाटील यांनी आक्रमक भूमिका मांडली. रुपाली ठोंबरे पाटील म्हणाल्या की, “मी पक्षातली आहे म्हणून आरोप करत नाही. मी वकील म्हणून हे सगळे आरोप करते आहे. कारण चाकणकर या भोंदूबाबा अशोक खरातच्या सेक्स रॅकेटच्या मुख्य सूत्रधार आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीसांनी कायद्यानुसार जो तपास समोर आला, त्यानुसार ही मागणी करत आहे. रुपाली चाकणकरांना अटक करावी. कारण चाकणकरांना सगळं माहीत असून त्यांनी दडपशाही केली. अत्यंत गंभीर आणि महाराष्ट्रातील खूप मोठं सेक्स स्कँडल आहे. रुपाली चाकणकर मुख्य आरोपीशी संगनमत साधून हे सगळं करत होत्या. त्यामुळे रुपाली चाकणकरांना तातडीने अटक करणं गरजेचं आहे”, असं रुपाली ठोंबरे यांनी म्हटलं आहे.
‘अशोक खरातच महिला आयोग चालवत होता’, रुपाली ठोंबरेंचा आरोप
“रुपाली चाकणकर यांनी छत्री धरल्याचा फोटो आहे, अशोक खरातची पाद्यपूजन करतानाचे फोटो आहेत. गुरुमाऊलीच्या विरोधात आलेला वर्षभरापूर्वीचा गुन्हा चाकणकर यांनी का दडपला? त्यांना अशोक खरातच्या सगळ्या गोष्टी माहीत होत्या. भोंदूबाबाला त्यांनी सांगितलं होतं की तू काहीही कर मी पदावर बसले आहे. त्यामुळेच भोंदूबाबाने महिलांवर अत्याचार केले. राज्य महिला आयोग चाकणकरांच्या काळात अशोक खरातच चालवत होता. नीट सगळ्या घटना पाहिल्या तर ही बाब लक्षात येईल”, असंही रुपाली ठोंबरे पाटील यांनी म्हटलं आहे.
