Maharashtra Politics : राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी घडत आहेत. राहुरी आणि बारामतीच्या पोटनिवडणुकीवरून सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. त्यामुळे बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध की नाही? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. तसेच दुसरीकडे अशोक खरात प्रकरणात आता ईडीची एन्ट्री होण्याची शक्यता आहे. या संदर्भातील संकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. दरम्यान, यासह आज दिवसभरातील राजकीय नेत्यांची पाच महत्वाची विधाने काय आहेत? जाणून घेऊयात.

अशोक खरात प्रकरणातील सीडीआर कोणी लीक केले? चौकशी होणार, फडणवीसांची घोषणा

अशोक खरातला कोणी किती कॉल केले? याबाबत अंजली दमानिया यांनी गंभीर आरोप केले होते. या पार्श्वभूमीवर बोलताना मुख्यमंत्री फडणवीसांनी मोठं भाष्य केलं. फडणवीस म्हणाले की, “अशोक खरात प्रकरणातील सीडीआर कोणालाही प्राप्त करून घेण्याचा अधिकार नाही. तो अधिकार फक्त ज्या तपास यंत्रणा आहेत त्यांनाच तो अधिकार आहे. मात्र, या प्रकरणातील सीडीआर लीक कसा झाला? तो सीडीआर कोणी लीक केला? या संदर्भातील चौकशी राज्य सरकार करणार आहे. मला असं वाटतं की अशा प्रकारच्या प्रकरणात फक्त आरोप-प्रत्यारोप करून चालत नाही. ज्यांच्या विरोधात सबळ पुरावा असेल त्यांच्यावर कारवाई होईलच. मात्र, कोण-कोणाशी बोललं या आधारावर आपली क्रिमिनल जस्टिस सिस्टम चालत नाही”, असं मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटलं आहे.

‘भोंदू अशोक खरातची ईडी चौकशी होणार’, मुख्यमंत्री फडणवीसांचं मोठं वक्तव्य

अशोक खरात प्रकरणाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना मोठं वक्तव्य केलं. अशोक खरात प्रकरणातील सर्व व्यवहारांची ईडी चौकशी होणार का? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. यावर बोलताना फडणवीस म्हणाले की, “खरात प्रकरणातील व्यवहारांबाबत नक्कीच ईडी चौकशी होणार आहे. त्याबाबत ईडीने या गोष्टीची माहिती घेतली आहे. ईडीनेही त्यांची कारवाई सुरू केलेली आहे. एकदा खरातच्या जमिनी कुठे-कुठे आहेत, याची माहिती समजली की नियमानुसार जे-जे करावं लागेल ते आम्ही करणार आहोत”, असं मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केलं.

“तसं झाल्यास पहिली शिवी गिरीश महाजन यांना, दुसरी शिवी मला ”, फडणवीसांचं वक्तव्य चर्चेत

पुढील वर्षी नाशिकमध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय संत समितीच्यावतीने नाशिकच्या पंचवटीत राष्ट्रीय परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. या दोन दिवसीय परिषदेत देशभरातील प्रमुख साधू, महंत उपस्थित आहेत. परिषदेच्या दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मार्गदर्शन केलं. परिषदेत साधू, महंतांकडून ज्या काही सूचना करण्यात येतील, त्याची अंमलबजावणी करण्यासाठी सरकार म्हणून आम्ही कटिबध्द आहोत, अशी ग्वाही त्यांनी दिली. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या मजेशीर स्वभावाचाही अनुभव उपस्थित साधू, महंतांना आला. कुंभमेळा मंत्री म्हणून गिरीश महाजन यांच्यावर जबाबदारी सोपवली. त्यामुळे “कुंभमेळ्याच्या तयारीत एखादी गोष्ट राहून गेल्यास पहिली शिवी गिरीश महाजन यांना आणि त्यानंतर दुसरी शिवी मला मिळेल”, असं मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हणताच उपस्थित साधू, महंतांना हसू आवरता आलं नाही.

“बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध का?” संजय राऊत यांचा सवाल

बारामतीची पोटनिवडणूक होत आहे. ही निवडणूक बिनविरोध करण्याचा महायुतीचा प्रयत्न आहे. मात्र, महाविकास आघाडी नेमकं काय निर्णय घेते? याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. या पार्श्वभूमीवर आज संजय राऊत यांनी महत्वाचं भाष्य केलं. राऊत म्हणाले की, बारामतीची जागा आम्ही लढलो नव्हतो. शरद पवारांचा पक्ष ती जागा लढला होता. त्याबाबत शरद पवार आणि उद्धव ठाकरेंची चर्चा झाली. तसंच राहुरीची जागा लढण्यासाठी आमच्याकडे तीन इच्छुक उमेदवार आहेत. बारामतीची पोटनिवडणूक आहे, त्याबाबत सुनेत्रा पवार यांनी उद्धव ठाकरेंशी चर्चा केली. चर्चा होत असतात. त्यांची युती भाजपासह आहे. त्या काही महाविकास आघाडीच्या उमेदवार नाहीत. अशावेळी त्यांनी जरी चर्चा केली असली तरीही उद्धव ठाकरे काय तो निर्णय घेतील. बारामतीबाबत कुठलाही निर्णय झालेला नाही. शिवसेना पक्षप्रमुखांनी बारामती संदर्भात निर्णय दिला नाही. पण निवडणूक लढायची नाही, बिनविरोधच निवडणूक झाली पाहिजे हा अट्टाहास चुकीचा आहे”, असं राऊत म्हणाले आहेत.

“फक्त काँक्रीट ओतणं म्हणजे विकास नाही!”, पुण्याच्या दुरवस्थेवरून आदित्य ठाकरेंची टीका

पुणे शहर आणि परिसरात गुरुवारी (२ एप्रिल) झालेल्या ढगफुटीसदृश पावसामुळे नागरिकांची मोठी तारांबळ उडाली होती. या पावसाने पुणेकरांची दैना उडवली असून शहरातील रस्ते जलमय झाल्याने जनजीवन विस्कळीत झालं होतं. यावरून आता राजकीय वातावरण तापलं असून आदित्य ठाकरे यांनी सत्ताधारी भाजपा आणि सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडलं. पुण्यातील या परिस्थितीला प्रशासकीय अपयश आणि पर्यावरणीय दुर्लक्ष कारणीभूत असल्याचा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला. सोशल मीडियाद्वारे आपली प्रतिक्रिया देताना त्यांनी ‘ट्रिपल इंजिन’ सरकारवर निशाणा साधला. “पुण्यातील पाऊस हा काही ‘क्लाउडबर्स्ट’ नव्हता, तर हे प्रशासनाचं पूर्णतः अपयश आहे. केवळ काँक्रीट ओतणं म्हणजे विकास नाही. गेल्या दशकभरापासून पुण्यात सत्ता असूनही ही अवस्था ओढवली”, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली.