Maharashtra Politics : आखाती राष्ट्रांमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेली असल्यामुळे भारतात गॅसचा तुटवडा निर्माण झाल्याचा दावा काही ठिकाणी केला जात आहे. मात्र नागरिकांनी कोणत्याही अफवांना बळी पडू नये, गॅसचा साठा पुरेसा उपलब्ध असल्याचा दावा सरकार कडून केला जात आहे. या पार्श्वभूमीवर आज मंत्री छगन भुजबळ यांनीही पोस्ट शेअर करत भाष्य केलं. तसेच मुख्यमंत्री फडणवीस यांनी नाशिकच्या कुंभमेळ्याला विरोध करणाऱ्यांना मोठा इशारा दिला. दरम्यान, यासह आज दिवसभरातील राजकीय नेत्यांची पाच महत्वाची विधाने काय आहेत? जाणून घेऊयात.
‘अडथळे आणाल तर गुन्हे दाखल करू’, मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा इशारा
मुख्यमंत्री फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली विधानभवनात नाशिक सिंहस्थ कुंभमेळा शिखर समितीची बैठक पार पडली. यावेळी नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्यासाठी करण्यात येणाऱ्या २२ हजार १८१ कोटींच्या विविध कामांना मान्यता देण्यात आली. यामध्ये पहिल्या टप्प्यातील पाच हजार १४० कोटी आणि दुसऱ्या टप्प्यातील १७ हजार ४१ कोटी रुपयांच्या कामांचा समावेश आहे. नाशिक- त्र्यंबकेश्वरमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्यात देश-विदेशातून कोट्यवधी भाविक येतील. कुंभमेळ्याच्या माध्यमातून येथे येणारा प्रत्येक भाविक भारताचे, महाराष्ट्राचे प्रतिबिंब सोबत नेणार आहे. त्यामुळे कुंभमेळ्याच्या यशस्वी आयोजनातून जगाला आकर्षण वाटणारा कुंभमेळा करावा, असे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले. तसेच कुंभमेळ्याची नाशिक शहर व ग्रामीण भागात अनेक कामे प्रगतीपथावर असून काही सुरू होण्याच्या मार्गावर आहेत. या कामांत कुणी वाईट हेतूने अथवा विलंब होण्याच्या हेतूने अडथळा आणत असेल तर त्याची गय केली जाणार नाही. त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल केले जातील, असा इशारा मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिला.
गॅस आणि इंधन पुरवठ्याबाबत छगन भुजबळांचं मोठं भाष्य
“आखाती देशातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर गॅस आणि इंधन पुरवठ्याबाबत अनेक संभ्रम आणि अफवा राज्यात पसरल्या आहेत. राज्यात घरगुती एलपीजीचा तुटवडा नसून नागरिकांनी इंधन किंवा गॅस तुटवड्याबाबत कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असं आवाहन शासनाच्यावतीने मी करत आहे. घरगुती एलपीजीची दैनंदिन मागणी ९,००० मेट्रिक टन असताना, उत्पादन वाढवून ते ११,००० मेट्रिक टनांपर्यंत नेले. मार्च महिन्यात गेल्या सहा महिन्यांच्या तुलनेत अधिक प्रमाणात सिलेंडर उपलब्ध आहेत. पेट्रोल आणि डिझेलचाही पुरेसा साठा उपलब्ध असून रिफायनरी पूर्ण क्षमतेने कार्यरत आहेत. त्यामुळे घरगुती गॅस सिलेंडरचा पुरवठा सुरळीत होत राहील, याबाबत नागरिकांनी निश्चिंत राहावं. गॅस पुरवठा साखळीवर देखरेख ठेवण्यासाठी जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांच्या नेतृत्वाखाली विशेष समित्या स्थापन केल्या आहेत. पुरवठा विभाग परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून आहे. राज्यातील गॅस आणि इंधन पुरवठा सुरळीत राहण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत”, असं छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे.
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाची हद्द निश्चित करा, मुख्यमंत्री फडणवीसांचे आदेश
बोरिवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील अतिक्रमण धारकांच्या पुनर्वसनासंदर्भात संबंधित यंत्रणांनी कायमस्वरूपी तोडगा काढावा. पुनर्वसनासाठी उपलब्ध असलेल्या जवळील जागांची पडताळणी करून पुनर्वसनासंदर्भात नियोजन करावं. ठाराविक काळात उद्यानाची हद्द निश्चित करून हद्दीवरील नागरिकांचे प्राधान्याने पुनर्वसन करावं, असे आदेश मुख्यमंत्री फडणवीसांनी आयोजित बैठकीत दिले.
अमोल मिटकरींचे DGCA वर गंभीर आरोप
दिवंगत नेते अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणावर आमदार अमोल मिटकरी यांनी संशय व्यक्त करत अनेक प्रश्न केले. या प्रकरणी अमोल मिटकरी यांनी पुन्हा चौकशी यंत्रणेवर निशाणा साधला. निदान अजित पवार यांचे विमानात बसतानाचे सीसीटीव्ही फुटेज तर महाराष्ट्रासमोर येऊ द्या, अशी अपेक्षा मिटकरी यांनी व्यक्त केली. ‘डिजीसीए’चा अंतिम अहवाल व ब्लॅक बॉक्स डेटा वाटल्यास पुढच्या वर्षी द्या, असा टोला देखील त्यांनी लगावला आहे. समाज माध्यमावर पोस्ट करत अमोल मिटकरी यांनी चौकशी यंत्रणेवर टीका केली.
पोलीस ठाण्याच्या निरीक्षकाविरुद्ध हक्कभंग, आमदार खडसेंची विधान परिषदेत सूचना
जळगाव जिल्ह्यातील सावदा (ता.रावेर) पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील यांनी लोकप्रतिनिधींशी कथितपणे उद्धट व अपमानास्पद वर्तन केल्याचा आरोप करत आमदार एकनाथ खडसे यांनी विधान परिषदेत दिलेली विशेषाधिकार भंगाची सूचना सभापतींनी स्वीकारली. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी आता विधान परिषद विशेषाधिकार समितीकडे सोपवण्यात येणार असून लवकरच या प्रकरणात अधिकृत चौकशी प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे.
