Maharashtra Politics : सध्या विधीमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनादरम्यान सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये विविध मुद्यांवरून आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. यातच आज विधानसभेत अर्थसंकल्पावरील चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीसांनी विरोधकांनी केलेल्या आरोपांना प्रत्युत्तर दिलं. यावेळी मुख्यमंत्री फडणवीसांनी शिवसेना (ठाकरे) आमदार सुनील प्रभू यांच्यावर टीका करत थेट त्यांची संपत्तीच काढली. तसेच नॉर्वे, थायलंडपेक्षाही आपली अर्थव्यवस्था मोठी असल्याचं मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितलं. दरम्यान, यासह आज दिवसभरातील राजकीय नेत्यांची पाच महत्वाची विधाने काय आहेत? जाणून घेऊयात.
“तुमची संपत्ती १४ कोटी अन् कर्ज…”, फडणवीसांचा ठाकरेंच्या आमदाराला टोला
विधानसभेत आज अर्थसंकल्पावरील चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी विरोधकांनी केलेल्या आरोपांना प्रत्युत्तर दिले. शिवसेनेचे (ठाकरे) आमदार सुनील प्रभू यांनी आपल्या भाषणात राज्यावर वाढलेल्या कर्जाचा मुद्दा पुढे केला होता. यावर उत्तर देताना फडणवीस यांनी सुनील प्रभू यांच्या संपत्तीचा दाखला दिला. फडणवीस म्हणाले, “प्रभू साहेब मी तुमचे निवडणुकीचे प्रतिज्ञापत्र तपासले. तुमच्या प्रतिज्ञापत्रात संपत्ती १४ कोटी आणि कर्ज ३.५४ लाख रुपये असल्याचे नमूद आहे. कर्जाचा विचार केल्यास तुमच्यावर २५.२८ टक्के दायित्व आहे. एवढ्या दायित्वामुळे तुम्ही कर्जबाजारी होणार का? तुम्हाला नादारी घोषित करावी लागणार का? हे शक्यच नाही. प्रभू यांना एवढ्याशा कर्जामुळे नादारी घोषित करावी लागणार नाही. त्या प्रमाणे राज्यावर १८ टक्केच कर्ज आहे. त्यामुळे प्रभू यांच्यापेक्षा महाराष्ट्राची परिस्थिती थोडी उत्तम आहे.”
‘नॉर्वे, थायलंडपेक्षाही आपली अर्थव्यवस्था मोठी’ : मुख्यमंत्री फडणवीस
“महाराष्ट्र हे राष्ट्र असतं तर आपण जगातून सर्वात मोठी तिसावी अर्थव्यवस्था असतो. पहिल्या ३५ देशांचा विचार केला तर महाराष्ट्राने ऑस्ट्रीया, थायलंड, फिलिपिन्स, नॉर्वे, व्हिएतनाम आणि बांगलादेश यांच्यापेक्षा आपली अर्थव्यवस्था मोठी झाली आहे. आपला विकासदर आपण कायम राखू शकलो तर पुढच्या दोन ते तीन वर्षात युएई आणि सिंगापूर या देशांच्या अर्थव्यवस्थानांही आपण मागे टाकू शकू. २०१३-१४ साली राज्याचा जीएसडीपी १६ लाख कोटी रुपये होता. गेल्या १० वर्षात राज्याचा जीएसडीपी १६ लाख कोटींहून ५१ लाख कोटी रुपयांवर पोहोचला आहे. १० वर्षांत तीन पट अधिक वाढ झाली आहे”, असं मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितलं.
‘नाल्यातून गॅस निर्मिती’च्या मुद्द्यावरून संजय राऊतांची पंतप्रधानांवर टीका
अमेरिका-इस्त्रायल आणि इराण यांच्यात सध्या सुरू असलेल्या युद्धाची झळ सामान्य नागरिकांना बसू लागली आहे. देशातील विविध शहरांमधील गॅस तुडवड्याच्या पार्श्वभूमीवर विरोधकांकडून सरकारला घेरले जात आहे. खासदार संजय राऊतांनी पंतप्रधान मोदी यांच्या जु्न्या विधानाचा संदर्भ देत खोचक टीका केली. राऊत म्हणाले की, “मोदी हे फार मोठे वैज्ञानिक आणि संशोधक आहेत. त्यांनी काही वर्षांपूर्वी एक शोध लावला होता की नाल्यातून गॅस निर्मिती करता येते. नाल्यामध्ये पाइप टाकायचा आणि त्यामधील गॅसवर आपल्या घरातील चुली पेटवता येतात. हा त्यांचा शोध आम्हाला आठवला आहे. आम्ही असा विचार करत आहोत की, नाल्यातून गॅस निर्मितीच्या पहिल्या प्रकल्पाचं उद्धाटन हे मिठी नदीच्या… मिठी नदीच्या किनाऱ्यावर अशा प्रकारच्या गॅस निर्मितीचा प्रकल्प मोदींच्या संकल्पनेतून निर्माण करता येईल का? त्याचं उद्घाटन करण्यासाठी मग फडणवीस आणि मुंबईच्या महापौरांनी मोदी यांनाच बोलवावं”, अशी खोचक टीका संजय राऊतांनी केली.
“गेट वेल सून देवेंद्र फडणवीस”, हर्षवर्धन सपकाळांनी फडणवीसांना डिवचलं
“कोण हर्षवर्धन सपकाळ पासून माझ्यावर वैयक्तिक खालच्या दर्जाला जाऊन केलेली ‘फडफड’, इथपर्यंतचा फडणवीसांचा प्रवास विनोदी आहे. मला फडणवीस बिनडोक म्हणाले याचे मला बिलकुल आश्चर्य वाटले नाही. कारण शेकडो वर्षापासून बुद्धी ही विशेष जात वर्गाची मक्तेदारी आहे आणि बहुजन वर्गाकडे बुद्धिमत्ता नाही, असाच अर्थ त्यातून व्यक्त होतो. बहुजनांनी आपली बुद्धिमत्ता सिद्ध करण्याचा प्रयत्न केला तर त्यांना हीन दर्जाची वागणूक देणे, हीच हजारो वर्षांपासून फडणवीस यांच्यासारख्या व्यक्तींची मानसिकता राहिली. याच विचाराने छत्रपती शिवाजी महाराज यांना राज्याभिषेक नाकारला होता, याच विचाराने बहुजन समाजाला ज्ञानापासून वंचित ठेवले गेले. मी माझ्या वक्तव्यात महत्त्वाचे मुद्दे मांडले होते. आदिवासी समाजाच्या जमिनी ओरबाडून खनिजे काढणे, शेतकऱ्यांच्या उपजाऊ जमिनी बळकावून त्यावर शक्तिपीठ महामार्गांसारखे रस्ते उभारणे, आणि अदाणी व अंबानी यांसारख्या उद्योगपतींच्या फायद्यासाठी त्याचा वापर करणे, हेच काम राज्य सरकार करत आहे. या मुद्द्यांवर उत्तर न देता देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली. खरेतर हा सर्व शेतकरी बांधवांचा अपमान आहे”, अशी टीका हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर केली.
‘हे’ महाशय गेले कुठे? महाराष्ट्राचं दुर्लक्ष होतंय का? अमोल मिटकरींचा रोख कुणाकडे?
दिवंगत नेते अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणात अनेक शंका व्यक्त केल्या जात आहेत. या प्रकरणावर आता आमदार अमोल मिटकरी यांनी संशय व्यक्त करत अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. अमोल मिटकरी यांनी नरेश अरोरा यांच्यावर निशाणा साधला. नावाचा उल्लेख न करता छायाचित्र वापरून त्यांनी हे महाशय गेले कुठे? असा प्रश्न उपस्थित केला. या सर्व प्रकरणावर महाराष्ट्राचा दुर्लक्ष होतंय का? असे मिटकरी म्हणाले. “अजितदादांच्या विमान अपघात दुर्घटनेनंतर सध्या हे महाशय कुठं आहेत? यांच्याकडे महाराष्ट्राचं दुर्लक्ष होतंय का? कारण त्यांचे विचार ऐकून आता त्यांचा शोध महाराष्ट्राने घ्यायलाच पाहिजे”, अशी पोस्ट अमोल मिटकरी यांनी केली.
