Maharashtra Politics : पुणे जिल्ह्यातील बारामती आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीची घोषणा केंद्रीय निवडणूक आयोगाने केली आहे. त्यामुळे राजकीय घडामोडींना वेग आला असून बारामती आणि राहुरीची पोटनिवडणूक बिनविरोध होणार असल्याचे संकेत मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले आहेत. तसेच मुंबईच्या महापौर रितू तावडे या त्यांच्या गाडीवरील लाल दिव्यामुळे पुन्हा एकदा वादात सापडल्या आहेत. या वादावर मुख्यमंत्री फडणवीसांनी मोठं भाष्य केलं आहे. दरम्यान, यासह आज दिवसभरातील राजकीय नेत्यांची पाच महत्वाची विधाने काय आहेत? जाणून घेऊयात.

‘निवडणुका बिनविरोध व्हाव्यात’, मुख्यमंत्री फडणवीसांचं भाष्य

केंद्रीय निवडणूक आयोगाने आज पत्रकार परिषद घेत पुणे जिल्ह्यातील बारामती आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीची घोषणा केली. ही पोटनिवडणूक २३ एप्रिलला पार पडणार आहे. मात्र, या निवडणुकीच्या पार्श्वभीमीवर बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी मोठं भाष्य केलं. बारामती आणि राहुरी या दोन्ही निवडणुका बिनविरोध व्हाव्यात असा आमचा प्रयत्न असेल. पण आमच्यावर जर निवडणूक लादली गेली तर आम्ही निवडणूक लढायला तयार आहोत, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.

‘बारामतीची पोटनिवडणूक सुनेत्रा पवार लढवणार’, सुनील तटकरेंची माहिती

अजित पवारांचं २८ जानेवारीला विमान अपघातात निधन झालं. त्यामुळे बारामती विधानसभा मतदारसंघाची जागा रिक्त आहे. आता या रिक्त जागेसाठी पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. २३ एप्रिलला ही पोटनिवडणूक पार पडणार आहे. ही पोटनिवडणूक सुनेत्रा पवार लढवणार असल्याची माहिती खासदार सुनील तटकरेंनी एबीपी माझाशी बोलताना दिली आहे.

महापौर रितू तावडे पुन्हा वादात? गाडीवरील लाल दिव्याच्या प्रकरणावर फडणवीसांचं भाष्य

मुंबई महापालिकेच्या महापौर रितू तावडे सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडल्या आहेत. त्यांच्या नव्या अधिकृत गाडीवर लावलेल्या लाल आणि निळ्या दिव्यांमुळे सध्या सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली. केंद्र सरकारने २०१७ मध्ये सामान्य सरकारी वाहनांवर लाल दिवा, नामफलक, ध्वज किंवा अधिकार दर्शवणारी चिन्हे लावण्यास बंदी घातली होती. त्यानंतर आता रितू तावडे यांच्या गाडीला लावलेले लाल-निळे दिवे पाहून अनेकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. या प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली. फडणवीस म्हणाले की, “रितू तावडे यांच्या गाडीच्या लाल दिव्याबाबत जी चर्चा होते आहे त्याची मी माहिती घेतली. लाल दिवा गाडीवर नव्हता. बोनेटच्या ठिकाणी लाल दिवा होता. त्यात महापौरांचा दोष नाही. राज्यात कुणीही लाल दिवे वापरु नयेत हा जुनाच आपला निर्णय आहे. महापौरांना त्याची कल्पना आहे. मला वाटतं की विनाकारण त्यांना टार्गेट केलं जातं आहे.त्यांना टार्गेट करणं योग्य नाही.”

“हिंदूंनी हिंदूंकडूनच वस्तू घ्याव्यात, असा कार्यक्रम आता…” मंत्री नितेश राणेंचं वक्तव्य चर्चेत

नाशिकमधील एका कार्यक्रमात बोलताना मंत्री राणे यांनी कुंभमेळ्यासाठी सुरू असलेल्या कामांचा उल्लेख करत म्हटलं की, कुंभमेळ्यात एकही जिहादी आला नाही पाहिजे. त्याला धाक वाटला पाहिजे. जिहादी प्रवृत्ती स्टॉल लावण्यासाठी आल्यास स्टॉलसकट उखडून टाका, आम्ही मंत्रालयात बसलो आहोत. जिहादी मानसिकता ठेवणाऱ्या व्यावसायिकांबरोबर व्यवहार करु नयेत. हिंदुंचा पैसा हा हिंदुसाठीच आहे. हिंदुराष्ट्रात हिंदुंविषयी बोलणार नाही तर पाकिस्तान, इस्लामाबादविषयी बोलणार का? असा सवाल नितेश राणेंनी केला. आता कुंभमेळ्याची कामे जोरात सुरू आहेत. तुमच्या मागण्या सरकारकडे देतो. मी मागे त्र्यंबकेश्वरमध्ये गेलो होतो, तिथे दुकानावर नाव वेगळे होते. आतमध्ये वेगळी व्यक्ती होती. हिंदुंनी हिंदुंकडूनच वस्तू घेतल्या पाहिजेत, असा कार्यक्रम आता देशात सुरू करणार आहोत”, असं भाष्य मंत्री नितेश राणे यांनी केलं.

‘गॅस वितरणात गैरव्यवहार खपवून घेतला जाणार नाही’, मंत्री उदय सामंत यांचा इशारा

रत्नागिरी जिल्ह्यात गॅस पुरवठा आणि वितरणाबाबत निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने आता आक्रमक भूमिका घेतली. गॅस वितरणात कोणत्याही प्रकारचा गैरव्यवहार किंवा जाणीवपूर्वक दिरंगाई सहन केली जाणार नाही. असे प्रकार आढळल्यास संबंधित कंपन्या किंवा व्यक्तींवर थेट गुन्हे दाखल करण्यात येतील, असा स्पष्ट इशारा पालकमंत्री उदय सामंत यांनी दिला.