Premium

Maharashtra Floor Test: शिंदे सरकारने विश्वासदर्शक ठराव जिंकला, अजित पवार विधानसभा विरोधी पक्षनेतेपदी

Maharashtra Floor Test: १६४ आमदारांनी एकनाथ शिंदे यांच्या सरकारला पाठिंबा जाहीर केला आहे

Floor Test in Maharashtra Today Live Updates
महाराष्ट्र फ्लोअर टेस्ट न्यूज लाइव्ह, Maharashtra Floor Test Live

Maharashtra Assembly Floor Test updates :महाराष्ट्र विधानसभेच्या विशेष अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी एकनाथ शिंदे सरकारकडून विश्वासदर्शक मांडण्यात आला. त्यानंतर १६४ आमदारांनी एकनाथ शिंदे यांच्या बाजूने मतदान केले आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला आहे. तर ठरावाच्या विरोधात ९९ मतं पडली. त्यामुळे विधानसभा अध्यक्षांनी सरकारने विश्वासदर्शक ठराव मंजूर झाल्याची घोषणा केली. रविवारी भाजपाचे उमेदवार राहुल नार्वेकर सभापती झाल्यामुळे शिंदे सरकारने पहिला अडथळा दूर केला आहे. गेले १० दिवस चाललेल्या राजकीय नाट्यानंतर राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार पडले आहे. यानंतर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची सूत्रे हाती घेतली आहेत. त्याचवेळी भाजपा नेते देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले आहेत.

YouTube Poster

दरम्यान, रविवारी संध्याकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यात बैठक झाली होती. बहुमत सिद्ध करण्याच्या रणनीतीबाबत मुंबईतील एका हॉटेलमध्ये झालेल्या या बैठकीत शिंदे गट आणि भाजपाचे आमदार उपस्थित होते. आपल्याला ४० बंडखोर शिवसेना आमदारांचा पाठिंबा असल्याचा शिंदेंचा दावा आहे. तर १६६ मतांनी सरकार बहुमत सिद्ध करेल, असा दावा फडणवीस यांनी केला होता.

Live Updates

Maharashtra Floor Test : विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक जिंकून शिंदे सरकारनं पहिला विजय मिळवला आहे. Read in English

 

21:48 (IST) 4 Jul 2022
विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी येताच अजित पवार यांनी स्पष्ट केली भूमिका

राज्य विधिमंडळाच्या दोन दिवसीय विशेष अधिवेशनाची आज सांगता झाली. हे अधिवेशन अनेक अर्थांनी खास ठरले. अधिवेशनात शिंदे गट-भाजपा सरकारने विश्वासदर्शक ठराव जिंकला. तर दुसरीकडे आज राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांची विरोधी पक्षेता म्हणून एकमताने निवड करण्यात आली. या निवडीबद्दल सत्ताधारी तसेच विरोधकांनीही समाधान व्यक्त केले. तर अजित पवार यांनी विरोधी पक्षनेता म्हणून मी माझी जबाबदारी चोख पार पाडणार आहे. आजपासून एकही विधेयक चर्चेशिवाय मंजूर होणार नाही, असे स्पष्टपणे सांगितले. वाचा सविस्तर

17:49 (IST) 4 Jul 2022
“ते खातं द्यायचं काम यांचं नव्हतं, परंतु…”; एकनाथ शिंदेंचं अजित पवारांना प्रत्युत्तर

महाराष्ट्र विधानसभेच्या विशेष अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी एकनाथ शिंदे सरकारकडून विश्वासदर्शक मांडण्यात आला. त्यानंतर १६४ आमदारांनी एकनाथ शिंदे यांच्या बाजूने मतदान केले आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला आहे. तर ठरावाच्या विरोधात ९९ मतं पडली. त्यामुळे विधानसभा अध्यक्षांनी सरकारने विश्वासदर्शक ठराव मंजूर झाल्याची घोषणा केली. यानंतर सत्ताधारी व विरोधी पक्षातील आमदरांची अभिनंदनपर भाषणं झाली व शेवटी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाषण केले. यावेळी त्यांनी विरोधी पक्षनेते अजित पवारांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारलेल्या प्रश्नाला प्रत्युत्तर दिलं. वाचा सविस्तर बातमी…

17:42 (IST) 4 Jul 2022
विधानसभा स्थगित

विधानसभेचं आजचं कामकाज संपलं आहे. राज्यपालांच्या निर्देशानुसार दोन दिवसीय अधिवेशनात विधानसभा अध्यक्ष निवडणूक पार पडली तसंच विश्वासदर्शक ठराव मांडण्यात आला. विधानसभा आता पुढील अधिवेशनापर्यंत स्थगित करण्यात आली आहे.

17:35 (IST) 4 Jul 2022
आषाढी एकदशीची पूजा आता एकनाथ शिंदेंच्या हस्ते होणार – अजित पवार

आषाढी एकदशीची पूजा उद्धव ठाकरे करणार की देवेंद्र फडणवीस अशी चर्चा होती. पण आता एकनाथ शिंदेंच्या हस्ते पूजा होणार आहे. दोन वर्ष पालखी निघाली नसल्याने वारकरी पण नाराज होते. आता तुम्हाला मान मिळाला आहे त्याबद्दलही अभिनंदन असं अजित पवारांनी सांगितलं.

17:32 (IST) 4 Jul 2022
सध्या लोकप्रिय निर्णय घेण्याकडे सगळ्यांचा कल – अजित पवार

विरोधाला विरोध करणारे आम्ही नाही. सध्या लोकप्रिय निर्णय घेण्याकडे सगळ्यांचा कल आहे. पंजाब सरकारचं आपल्यासमोर उदाहरण आहे. फुकट मिळालं की चांगलं वाटतं, पण निधीत पैसा कमी पडेल याकडे लक्ष दिलं पाहिजे असा सल्ला अजित पवारांनी दिला.

17:30 (IST) 4 Jul 2022
आपल्या लोकांकडून मन दुखावलं गेलं की जीवाला लागतं- अजित पवार

मी जवळपास २००४ पासून एकनाथ शिंदेंना आमदार म्हणून पाहिलं आहे. पण २००४ ते २०२२ पर्यंत असं भाषण मी कधीच ऐकलं नव्हतं. मी तुमच्या चेहऱ्यावरील हावभाव पाहत होतो. सोबत फडणवीसांचा चेहराही पाहत होतो. ते बास झालं, आता थांबा असं सारखं सांगत होते. पण शिंदे साहेबांची गाडी सुसाट सुटली होती आणि फडणवीसांना एखादा शब्द निघायचा अशी भीती वाटत होती. केसरकरांचा जीव पण तुटत होता. गुलाबराव पण सांगू नका सांगत होते. पण त्यांनी मन मोकळं केलं. अनेक आरोप-प्रत्यारोप झाले, बातम्या आल्या. आपल्या लोकांकडून मन दुखावलं गेलं की जीवाला लागतं असं अजित पवार म्हणाले

17:25 (IST) 4 Jul 2022
करोनामुळे कामासाठी अपेक्षित वेळ मिळाला नाही- अजित पवार

करोनामुळे पहिल्या अधिवेशनानंतर अधिवेशन झालंच नाही. मागील अडीच वर्षात मंत्र्याना मतदारसंघातील कामांसाठी अपेक्षित वेळ मिळाला नाही असं अजित पवारांनी सांगितलं. शिवराज पाटील ४२ वर्षांचे असताना अध्यक्ष झाले होते, आम्ही चुकून तुम्ही सर्वात तरुण अध्यक्ष असल्याचा उल्लेख झाला असं अजित पवार यावेळी म्हणाले.

17:22 (IST) 4 Jul 2022
एकही कायदा चर्चेशिवाय मंजूर होणार नाही – अजित पवार

एकही कायदा चर्चेशिवाय मंजूर होणार नाही असा विश्वास मी राज्यातील जनतेचा देऊ इच्छितो. यासाठी मी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी सहकार्य करण्याचं आवाहन करतो. अनेक विरोधी पक्षनेते राहिलेले नेते सभागृहात आहेत. त्यांनी सातत्याने जनतेसाठी मुद्दे उपस्थित केले. तशीच चर्चा घडवण्याचं काम आम्ही करु असं अजित पवार म्हणाले.

17:20 (IST) 4 Jul 2022
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याप्रमाणेच विरोधी पक्षनेतेपदही महत्वाचं – अजित पवार

मी अनेक वर्ष सत्ताधारी पक्षातून काम केलं आहे. १९९० मध्ये मी, जयंत पाटील, आर आर पाटील आलो. अनेक नेत्यांनी विरोधी पक्षनेतेपदाची ताकद काय असते दाखवून दिलं आहे. लोकशाहीत विधीमंडळात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, अध्यक्ष या पदाप्रमाणे विरोधी पक्षनेतेपदही महत्वाचं असतं. महाराष्ट्रात कधी कुठे काय घडेल सांगता येत नाही. सध्या दुबार पेरणीचं संकट आलं आहे. धरणातील पाणीसाठा कमी झाला आहे. ठाण्याला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणातही बिकट स्थिती आहे. कोणत्याही स्तरावरील लोकांसोबत काम करताना आम्हाला न्याय मिळाला पाहिजे अशी अपेक्षा असते. सत्ताधाऱ्यांकडून न्याय मिळाला नाही तर ते विरोधी पक्षाकडे जातात. राज्याच्या विकासात आपणही कसं योगदान देऊ शकतो याचं उदाहरण विरोधी पक्षनेत्यांनी दिलं आहे असं अजित पवार यांनी सांगितलं.

17:16 (IST) 4 Jul 2022
शरद पवारांमुळे लहानपणापासून राजकारण जवळून पाहण्याची संधी मिळाली – अजित पवार

मी १९९१ साली या दरवाजातून पहिल्यांदा आत आलो तेव्हा सभागृहाचं कामकाज सुरु होतं. मी देशात नंबर दोनच्या मतांनी निवडून आलो होतो. मी गॅलरीतून अनेकदा काम पहायचो. शरद पवारांमुळे लहानपणापासून राजकारण जवळून पाहण्याची संधी मिळाली होती. इथे आल्यानंतर इतरांकडे पाहून मी शिकलो असं अजित पवारांनी सांगितलं.

17:13 (IST) 4 Jul 2022
विधानसभा अध्यक्षांकडून अजित पवारांचं कौतुक

अजित पवारांकडे एक यशस्वी नेते म्हणून पाहिलं पाहिजे. एकदा गोव्यात मी अचानक भेटलो होतो, तेव्हा सुट्टीच्या दिवशीही सकाळी पावणे आठ वाजता बोलावलं होतं. त्यावेळीही त्यांनी फोन करुन आलो नसल्याचं विचारलं होतं. त्यांच्या या गुणांचा फायदा सभागृह चालवण्यात होईल अशी आशा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी व्यक्त केली.

17:11 (IST) 4 Jul 2022
विरोधी पक्षनेता म्हणून अजित पवार सहकार्य करतील याची खात्री- जयंत पाटील

आम्हा सर्वांना खात्री आहे की हे सरकार ज्या गोष्टी चांगल्या करेन त्याला विरोधी पक्षनेता म्हणून अजित पवार सहकार्य करतील. राज्यातील संकटावेळी अजित पवार धावून जातील, याची आम्हाला खात्री आहे. एकनाथ शिंदे यांचं सरकार चांगलं काम करेन यामध्ये दुमत नाही, असे जयंत पाटील म्हणाले.

17:09 (IST) 4 Jul 2022
अजित पवार यांच्या अनुभवाचा फायदा जनतेला निश्चित होणार- जयंत पाटील

विरोधी पक्षनेत्याच्या खुर्चीवर यापूर्वी अनेकजण बसले आहेत. महाराष्ट्राच्या विधानसभेच्या विरोधी पक्षनेत्याची खुर्ची महाराष्ट्रातील जनतेला न्याय देण्यासाठी नक्की वापरतील. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेना यांच्या वतीने अजित पवार यांनी केललं विरोधी पक्षाचं काम जनतेला न्याय देणारं ठरेल. अजित पवार यांचा स्वभाव रोखठोक आहे स्पष्ट आहे. शासनात ज्या त्रुटी आहेत त्यावर बोट ठेवण्याचं काम अजित पवार करतील. अजित पवार यांचा तीस ते ३५ वर्षांचा विधिमंडळाचा अनुभव त्यांच्या नक्की कामी येईल. या सभागृहातील उपमुख्यमंत्रीपद त्यांनी भूषवलेलं आहे. अडीच वर्षे त्यांनी अर्थखातं सांभाळलं आहे. मला खात्री आहे की अतिशय समर्थपणाने ते विरोधी पक्षाची बाजू ते मांडतील, असे जयंत पाटील म्हणाले.

17:09 (IST) 4 Jul 2022
तुम्ही कणखरपणे भूमिका घ्या, भास्कर जाधवांचं अजित पवारांना आवाहन

अजित पवार आजकाल फार शांत आणि सामंजस्याची भूमिका घेत आहेत याची चिंता वाटते. पुण्यातील देहू येथे कार्यक्रमात तुम्हाला बोलू दिलं नाही, पण त्यावर काही बोललात नाही. त्यावेळी तुम्ही संतापात खाली उतराल असं वाटलं होतं. तुम्ही कणखरपणे भूमिका घ्या असं आवाहन भास्कर जाधव यांनी केलं.

17:07 (IST) 4 Jul 2022
“करोना काळात अजित पवार एकमेव मंत्री”

करोना काळात दक्षता घेत सगळ्यांची कामं करण्यासाठी एकमेव मंत्री उपस्थित असेल तर ते अजित पवार होते हे महाराष्ट्राला मान्य करावं लागेल असं भास्कर जाधव यांनी सांगितलं.

17:06 (IST) 4 Jul 2022
अजित पवारांनी स्वच्छतेची आवड – भास्कर जाधव

अजित पवारांची कार्यपद्दती, निर्णयक्षमता याबद्दल सर्वांनाच माहिती आहे. त्यांना स्वच्छता खूप आवडते हादेखील त्यांच्यातील एक गुण आहे. एखाद्याच्या कार्यालयात चालता चालता ते धूळ तपासत आहोत. वक्तशीरपणा, प्रशासन हाताळण्यात कसोटी, स्पष्ट बोलण्याचा याबाबत स्वच्छता फार आवडते हेदेखील खरं आहे असं भास्कर जाधव म्हणाले.

17:05 (IST) 4 Jul 2022
अजित पवारांनी सांगितलेल्या विधायक सचूना निश्चितपणे अमलात आणू- देवेंद्र फडणवीस

विरोधी पक्षनेता म्हणून अजित पवार यांनी सांगितलेल्या विधायक सचूना आम्ही निश्चितपणे अमलात आणू. तुमचा जो प्रदीर्घ अनुभव आहे, तो आमच्या कामाचा असेल.

17:03 (IST) 4 Jul 2022
अजित पवार यांच्यासारखा प्रगल्भ विरोधी पक्षनेता मिळाल्याचं समाधान- देवेंद्र फडणवीस

विरोधी पक्षनेता हा आक्रमतेने, संयमाने तर कधी चातुर्याने सरकारवर अंकुश ठेवू शकतो. अजित पवार यांच्यासारखा प्रगल्भ विरोधी पक्षनेता मिळाल्यानंतर मला समाधान आहे. राजकारणात दोन्ही बाजू प्रबळ असणं गरजेचं असतं. विरोधी पक्षनेत्यांनादेखील विरोधाची मर्यादा समजली पाहिजे. विरोधाला विरोध नसून सकारात्मक आणि रचनात्मक विरोध केला पाहिजे. जिथे आवश्यकता असेल तिथे भूमिकादेखील घेता आली पाहिज. मी अनेक विरोधी पक्षनेते पाहिले आहेत की ज्यांना भूमिका घेता आलेली नाही, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

17:02 (IST) 4 Jul 2022
बाळासाहेब थोरातांकडून अजित पवारांचं अभिनंदन

मी अजित पवारांना १९९० पासून पाहत आहे. काही काळ खासदार म्हणून त्यांनी काम केलं. ते तरुणांचं आवडतं व्यक्तिमत्व होते आणि आहे. ते अत्यंत स्पष्टवक्त, शिस्तीचे आहेत. जे काही ते समोर सांगून टाकतात. जमेल तेवढ्यांना न्याय देण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. अजित पवारांना सगळ्या विभागांचा अभ्यास आहे असं बाळासाहेब थोरात म्हणाले. विरोधी पक्षनेता कसा होता हे बऱ्याच वर्षानंतरही चर्चेचा विषय असतो असंही त्यांनी सांगितलं.

16:56 (IST) 4 Jul 2022
उद्धव ठाकरेंचं शिंदे सरकारला जाहीर आव्हान; म्हणाले “हिंमत असेल तर…”

हिंमत असेल तर मध्यावधी निवडणूक घेऊन दाखवा असं आव्हान शिवेसना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिलं आहे. एकीकडे शिंदे-फडणवीस सरकारने विश्वासदर्शक ठराव जिंकला असताना उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जिल्हाप्रमुख आणि संपर्कप्रमुखांशी संवाद साधला. उद्धव ठाकरे शिवसेना भवनात पोहोचले होते. यावेळी त्यांनी भाजपाचा शिवसेनेला संपवण्याचा डाव असल्याचा आरोप केला.

सविस्तर बातमी

16:50 (IST) 4 Jul 2022
अजित पवार यांनी बारामतीचे विकास मॉडेल तयार केले- देवेंद्र फडणवीस

अजित पवार यांनी सातत्याने बारामतीचे आमदार म्हणून काम केले. त्यांनी बारामतीचे विकास मॉडेल विकसीत केले आहे. अजित पवार यांनी जेव्हा राजकारणात प्रवेश केला, तेव्हा अजित पवार यांच्यासमोर अनेक दिग्गज नेते होते. मात्र शरद पवार यांच्यानंतर राष्ट्रवादीचे सर्वमान्य नेतृत्व होण्याची किमया केली.

16:44 (IST) 4 Jul 2022
विरोधी पक्षनेतेपदी निवड झाल्यामुळे फडणवीसांनी अजित पवार यांनी केले अभिनंदन

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अधिवेशनात बोलत आहेत. राष्ट्रवादीचे आमदार अजित पवार यांची विरोधी पक्षनेता म्हणून निवड करण्यात आली. याबद्दल फडणवीस यांनी अजित पवार यांचे अभिनंदन केले.

16:23 (IST) 4 Jul 2022
विधानसभा विरोधी पक्षनेतेपदी अजित पवार

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांची विधानसभा विरोधी पक्षनेतेपदी निवड करण्यात आली आहे. सभागृहातील सदस्यांकडून त्यांचं अभिनंदन करण्यात आलं.

16:20 (IST) 4 Jul 2022
पेट्रोल डिझेल स्वस्त होणार; मुख्यमंत्री शिंदेंची पहिली घोषणा

पंतप्रधान मोदींनी इंधनावरील व्हॅट कमी करण्याचं आवाहन केलं होतं. त्यानुसार लवकरच कॅबिनेट बैठकीत पेट्लो डिझेल स्वस्त करण्यासाठी निर्णय घेणार – एकनाथ शिंदे (मुख्यमंत्री)

16:18 (IST) 4 Jul 2022
हिरकणी गाव वाचवण्यासाठी २१ कोटी रुपयांचा निधी – एकनाथ शिंदे

ज्या हिरकणीने रायगड वाचवा आणि इतिहास घडवला. ते हिरकणी गाव वाचवण्यासाठी २१ कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणा करतो – एकनाथ शिंदे (मुख्यमंत्री)

16:13 (IST) 4 Jul 2022
आता तपासून अहवाल सादर करा नाही, थेट जिल्हाधिकाऱ्यांना फोन करून आदेश – एकनाथ शिंदे

आता मी मुख्यमंत्री आहे, त्यामुळे फाईलवर तपासून अहवाल सादर करा असं चालणार नाही. आमदार पत्र घेऊन आले की थेट जिल्हाधिकाऱ्यांना फोन करून आदेश करणार – एकनाथ शिंदे (मुख्यमंत्री)

15:58 (IST) 4 Jul 2022
पुढील विधानसभा निवडणुकीत २०० आमदार निवडून आणणार – एकनाथ शिंदे

अजित पवार म्हणाले पुढच्यावेळी बंडखोर आमदार निवडून येणार नाहीत. मात्र, आम्ही शिवसेना सोडलेली नाही. भाजपासोबत आम्ही पुढील विधानसभा निवडणुकीत २०० आमदार निवडून आणू – एकनाथ शिंदे (मुख्यमंत्री)

15:39 (IST) 4 Jul 2022
अजित पवारांनी माझ्या खात्याच्या बैठका घेतल्या तरी काही बोललो नाही – एकनाथ शिंदे

अजित पवार यांनी माझ्या खात्याच्या बैठका घेतल्या तरी मी त्यांना काही बोललो नाही. त्यांनी ८०० कोटी रुपये घेतले तरी मी काही बोललो नाही. मात्र, तुम्ही समांतर नगरविकास खात्याचा प्रमुख का केला? – एकनाथ शिंदे

15:37 (IST) 4 Jul 2022
शिवसेना-भाजपा युतीसाठी ५ वेळा उद्धव ठाकरे यांच्याशी बोललो – एकनाथ शिंदे

अनेक आमदार यायचे आणि म्हणायचे आपली नैसर्गिक युती भाजपासोबत आहे. यानंतर मी ५ वेळा उद्धव ठाकरे यांच्याशी बोललो. याला दीपक केसरकर साक्षीदार आहेत. मात्र, याचा परिणाम झाला नाही – एकनाथ शिंदे

15:34 (IST) 4 Jul 2022
सुरुवातीला मला मुख्यमंत्री करण्याचं ठरलं होतं – एकनाथ शिंदे

सुरुवातीला मला मुख्यमंत्री करण्याचं ठरलं होतं. नंतर कुणीतरी सांगितलं मी नको, उद्धव ठाकरेंना करा. मी काहीही बोललो नाही. मला सत्तेची हाव नाही. मात्र, नंतर निवडून आलेल्या आमदारांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला – एकनाथ शिंदे (मुख्यमंत्री)

15:23 (IST) 4 Jul 2022
…तर जगाचा निरोप घेऊन निघून जाईन, असं आमच्या आमदारांना सांगितलं – एकनाथ शिंदे

एका बाजुला महान नेते होते, सरकार होते, यंत्रणा होती आणि दुसरीकडे माझ्यासारखा एक साधा शिवसैनिक होता. पण माझ्या भरोशावर चाळीस आमदारांनी सगळं पणाला लावलं. या सगळ्यांचा मला अभिमान आहे. मी या सगळ्यांना सांगितलंय की पुढं काय व्हायचं ते होवो, तुमचं नुकसान होतंय असं वाटलं तर मी तुमचं नुकसान होऊ देणार नाही. तर मी जगाचा निरोप घेऊन निघून जाईन – एकनाथ शिंदे (मुख्यमंत्री)

15:22 (IST) 4 Jul 2022
माझ्या खांद्यावर हात टाकून बोलले, “मला शिकवतो का? – एकनाथ शिंदे

ही छोटी मोठी घटना नाही. जे ग्रामपंचायत सदस्य, नगरपंचायत सदस्यही इकडे तिकडे हलू देत नाही. पण हे एवढं मोठं का झालं, काय घडलं, कशासाठी झालं? २०-२५ वर्ष एकनाथ शिंदेने रक्ताचं पाणी केलंय. मी १७ वर्षांचा होतो. बाळासाहेबांच्या विचाराने मी वेडा झालो आणि शिवसैनिक झालो. एका प्रकरणामध्ये मी आनंद दिघेंच्या संपर्कात आलो. वयाच्या १८ व्या वर्षी शाखाप्रमुख झालो. अनेकजण सिनियर होते. त्यांना बोललो की यांना करा, तर माझ्या खांद्यावर हात टाकून बोलले, “मला शिकवतो का?” – एकनाथ शिंदे (मुख्यमंत्री)

15:19 (IST) 4 Jul 2022
मी शहीद झालो, तरी चालेल. पण मागे हटणार नाही – एकनाथ शिंदे

सुनिल प्रभु यांना माहिती आहे माझं कशाप्रकारे खच्चीकरण झालं. शिवसेना वाचवण्यासाठी मी शहीद झालो, तरी चालेल. पण मागे हटणार नाही – एकनाथ शिंदे (मुख्यमंत्री)

15:18 (IST) 4 Jul 2022
एकही आमदार आपण मुख्यमंत्र्यांना भेटून पुढे जाऊयात असं म्हणाला नाही – एकनाथ शिंदे

मी मतदानाच्या दिवशी निघून आलो तेव्हा डिस्टर्ब होतो. मला बाळासाहेबांनी सांगितलेलं आठवलं की अन्यायाविरोधात बंड पुकारलं पाहिजे. आम्हाला अनेक फोन आले. पण मला एकही आमदार आपण मुख्यमंत्र्यांना भेटून पुढे जाऊयात असं म्हणाला नाही. हा विश्वास आहे – एकनाथ शिंदे (मुख्यमंत्री)

15:13 (IST) 4 Jul 2022
माझ्यावर विश्वास ठेऊन एवढा मोठा निर्णय घेणाऱ्या बंडखोर आमदारांचे आभार – एकनाथ शिंदे (मुख्यमंत्री)

एकनाथ शिंदे म्हणाले, “स्वत:चं मंत्रीपद दावावर लावून मी ५० आमदारांना घेऊन, समोर बसलेल्या बलाढ्य सरकारविरोधात बंड पुकारले. समोर सत्ता, यंत्रणा, एवढी मोठी माणसं होती. दुसरीकडे बाळासाहेबांचा आणि दिघे साहेबांचा सैनिक. मला अभिमान आहे या ५० लोकांचा. आपण हे मिशन सुरु केलं तेव्हा कोणी विचारलं नाही. कुठे चाललोय, कधी चाललोय, किती वेळ लागणार कोणी विचारलं नाही.”

15:07 (IST) 4 Jul 2022
Video: विधानसभेच्या दारात शिवसेनेच्या बंडखोर आमदाराला पाहताच आदित्य ठाकरे त्याला म्हणाले, “एवढे जवळचे असून…”

शिवसेनेविरोधात बंड पुकारणाऱ्या आमदारांमध्ये आज सकाळी आणखी एका आमदाराची भर पडली.  उद्धव ठाकरे गटातील आमदार संतोष बांगर हे एकनाथ शिंदे गटात सामील झाले. शिंदे सरकारने १६४ विरुद्ध ९९ च्या फरकाने आज विश्वासदर्शक ठराव जिंकला. दरम्यान विश्वासदर्शक ठरावानंतर सभागृहाबाहेर पडताना शिवसेनेचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरेंची भेट सभागृहाच्या दाराशी एका बंडखोर आमदारासोबत झाली. यावेळी दोघांमध्येही प्रसारमाध्यमांसमोरच संवाद झाला.

येथे पाहा व्हिडीओ.

15:02 (IST) 4 Jul 2022
सत्ताधाऱ्यांमधील कुणीही एकाने मी त्यांचं काम केलं नाही सांगितलं, तर मी माफी मागून बाहेर जाईन : जितेंद्र आव्हाड

जितेंद्र आव्हाड म्हणाले, “सत्ता आली काय, गेली काय याचं मलाही काहीच वाटत नाही. पण मी सत्तेत असताना असं एकही उदाहरण नाही की माझ्याकडे आले आणि मी काम केलं नाही. सत्ताधाऱ्यांमधील कुठल्याही आमदाराने उठून सांगावं की गृहनिर्माणमध्ये गेलो आणि जितेंद्र आव्हाडने त्यांचं काम केलं नाही. असं एक जरी उदाहरण दिलं तरी मी त्या सदस्याची माफी मागून बाहेर निघून जाईल.”

14:29 (IST) 4 Jul 2022
“एकनाथ शिंदेजी संघटना आणि सरकार यामधील फरक लक्षात ठेवा”

एकनाथ शिंदेजी संघटना आणि सरकार यामधील फरक लक्षात ठेवा. सर्वाना सोबत घेऊन, समाधान करत सरकार चालवावं लागणार आहे असा सल्ला हितेंद्र ठाकूर यांनी दिली आहे. आमच्यावरही थोडा अन्याय केला त्यामुळे नाराजीही आहे असंही ते म्हणाले.

14:27 (IST) 4 Jul 2022
संघटना वाढण्याचा प्रत्येकाला अधिकार – हितेंद्र ठाकूर

एकनाथ शिंदे यांनी आपली संघटना वाढवण्यासाठी अनेकांना झटके दिले आहेत. आमचाही आमदार घेतला होता. कसं जमतं माहिती नाही. फडणवीसांनादेखील ही कला अवगत आहे. पण संघटना वाढण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे असंही हितेंद्र ठाकूर म्हणाले आहेत.

14:26 (IST) 4 Jul 2022
“खरंच आहे ही मंडळी ‘ईडी’मुळेच आली आहे, फक्त ती ‘ईडी’ म्हणजे एकनाथ आणि देवेंद्र आहेत”

राज्यात भाजपा-शिंदे या नव्या सरकारवर आज शिक्कामोर्तब झाला आहे. कारण, या सरकारने आज विधीमंडळात विश्वासदर्शक ठराव जिंकला. यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभिनंदनपर भाषणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे तोंडभरून कौतुक केले. तसेच, ईडीच्या भीतीमुळे शिवसेनेच मंत्री, आमदार हे भाजपासोबत गेले असल्याचं महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून बोललं जात असल्याने, त्याला देखील फडणवीसांनी आपल्या भाषणातून प्रत्युत्तर दिलं. वाचा सविस्तर बातमी…

14:23 (IST) 4 Jul 2022
आम्ही दावणीला बांधलेले आमदार नाही – हितेंद्र ठाकूर

आम्ही काही कोणाच्या गोठ्यात बांधलेल्या गाई, दावणीला बांधलेले आमदार नाही. आमचा पक्ष वेगळा आहे. आमचे शब्द आमच्या पद्धतीने देतो. चांगल्या शब्दांत बोलता येणाऱ्या गोष्टी ज्याप्रकारे झाल्या ते वाईट आहे असं हितेंद्र ठाकूर म्हणाले आहेत.

14:19 (IST) 4 Jul 2022
उद्धव ठाकरे शिवसेना भवनात पोहोचले

एकीकडे विधानसभेत सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने असताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शिवसेना भवनात पोहोचले आहेत. शिवसेना भवनात जिल्हा प्रमुख, संपर्क प्रमुखांची बैठक होणार आहे.

14:17 (IST) 4 Jul 2022
“पुन्हा एकदा राज्यात महाविकास आघाडीचं सरकार येईल”

पुन्हा एकदा राज्यात महाविकास आघाडीचं सरकार येईल असा दावा सपाचे आमदार रईस शेख यांनी केली आहे. बाहेर लोकांमध्ये फिरुन पहा, प्रचंड नाराजी आहे असंही त्यांनी सांगितलं.

14:14 (IST) 4 Jul 2022
“नवे मुख्यमंत्री अल्पसंख्यांकांचे प्रश्न ऐकतील अशी आशा”

नवे मुख्यमंत्री अल्पसंख्यांकांचे प्रश्न ऐकतील अशी आशा आहे असं सपाचे आमदार रईस शेख यांनी म्हटलं आहे. यावेळी त्यांनी आपण तटस्थ राहिण्यामागील कारण सांगितलं. किमान समान कार्यक्रमातील मुद्द्यांवर फारकत झाल्यानं तटस्थ राहिलो असं त्यांनी सांगितलं आहे. तसंय या बंडासाठी आपणही जबाबदार असल्याचं ते म्हणाले.

14:11 (IST) 4 Jul 2022
शिवसेनेतील अजून काही जण आमच्याकडे येतील – गुलाबराव पाटील यांचा दावा

चार लोकांच्या टोळक्यानं उद्धव ठाकरेंना वहावत नेलं. माझी त्यांना विनंती आहे की, आजुबाजूचे आहेत त्यांना बाजूला करा. पट्टी बांधून तुम्हाला धृतराष्ट्राप्रमाणे सांगत आहे त्यांना दूर करा.

आमदार वारंवार एकनाथ शिंदे यांच्याकडे जात होते. कधीही त्यांनी आपण नाराज असल्याचं सांगितलं आहे का हे शोधून पाहा. शिवसेनेतील अजून काही जण आमच्याकडे येतील अशी स्थिती आहे असाही दावा त्यांनी केला.

14:09 (IST) 4 Jul 2022
“एकटे एकनाथ शिंदे शिवसेना वाचवण्यासाठी फिरत होते”

याआधी नारायण राणे, भुजबळ, राज ठाकरे गेले तेव्हा उठाव झाला, मग आता काय झालं? आम्ही सत्तेतून बाहेर जातो तरी बंडखोर आहे म्हणता. तुम्ही आम्ह्ला पुन्हा घरट्यात, मातोश्रीवर या सांगायला हवं होतं. निवडून येण्याची लायकी नाही ते आम्हाला बोलतात. आम्ही फार मोठं आव्हान घेऊन बाहेर पडलो आहोत. एकटे एकनाथ शिंदे शिवसेना वाचवण्यासाठी फिरत होते. शरद पवारांसारखी व्यक्ती तीन वेळा जळगावमध्ये आले, अजित पवार, जयंत पाटील सगळे गेले पण मग आमचं दुख काय समजून घ्या. मोदींनी ५० आमदार असलेल्या माणसाला मुख्यमंत्री करुन बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण केलं याबद्दल मी त्यांचा आभारी आहे असंही गुलाबराव पाटील म्हणाले.

14:04 (IST) 4 Jul 2022
एकनाथ शिंदे यांचं चरित्र वाचा, गुलाबराव पाटील यांचा टोला

शिवराळ भाषेत आमच्यावर टीका करण्यात आली. एकनाथ शिंदे सत्तेसाठी गेले असं बोलण्यात आलं. अहो त्यांचं चरित्र वाचा. त्यांची दोन मुलं गेली तेव्हा दिघे साहेबांना त्यांना अनाथांचा नाथ हो सांगितलं होतं. आज बाळासाहेबही त्यांना आशीर्वाद देत असतील असं गुलाबराव पाटील म्हणाले.

14:03 (IST) 4 Jul 2022
“आमचा मुख्यमंत्री असताना शिवसेना चौथ्या क्रमांकावर फेकली गेली”

फडणवीस मुख्यमंत्री असताना नगर पंचायत निवडणुकांमध्ये भाजपा पहिल्या स्थानावर होती. नी आमचा मुख्यमंत्री असताना शिवसेना चौथ्या क्रमांकावर फेकली गेली. शिवसेना रसातळाला चाललीय तिला वाचवण्यासाठी आम्ही उठाव केला. एकनाथ शिंदेंसोबत २० आमदार गेले. आम्ही रुग्णवाहिकेतून गेलो, आम्हाला उठाव करायचा होता. बाळासाहेब आमच्या मनात होते आणि राहतील. भाजपासोबत युती राहावी यासाठी आम्ही प्रयत्न केले. शिंदे तर पाच वेळा गेले. फटाक्याची वात आत्ता लागलेली नाही. आमदारांची नाराजी आम्ही सांगत होतो. कोणी फोन उचलायचा नाही. अजित पवार सकाळी सहा वाजता यायचे, त्यांचा हेवा वाटायचा असं गुलाबराव पाटील म्हणाले.

14:00 (IST) 4 Jul 2022
आम्ही काही लेचेपेचे नाही, गुलाबराव पाटलांचा इशारा

आम्हाला मंत्री केलं हे उपकार आहेत. भास्कर जाधव यांनी चिंता कऱण्याची गरज नाही. आम्ही बाळासाहेबांची शिवसेना जिवंत ठेवणार आहोत. आम्हाला गटारीचं पाणी, प्रेतं अशा धमक्या देण्यात आल्या. आम्ही काही लेचेपेचे नाही. हातात जोर असणारा माणूस येतो आणि सत्तेत सामील होतो असा इशारा गुलाबराव पाटील यांनी दिला. शिवसेना संपत असेल तर ती वाचवण्याची जबाबदारी आमची आहे असंही ते म्हणाले.

13:58 (IST) 4 Jul 2022
“४० आमदार फुटतात ती आजची आग नाही”

आम्ही शिवसेनेतच आहोत त्यामुळे निवडणुका हरण्याचा प्रश्न येत नाही असं गुलाबरावांनी अजित पवारांना उत्तर दिलं. ४० आमदार फुटतात ही आजची आग नाही. आम्हाला आमचं घर सोडण्याची, बाळासाहेबांना त्यांच्या मुलाला दु:ख देण्याची आमचीही इच्छा नाही असं ते म्हणाले. सर्व आमदार साहेबांना त्रास सांगण्यात जात होते. पण चहापेक्षा किटली गरम. आम्ही काय सहजपणे आमदार झालेलो नाहीत. भगवा हातात घेऊन इथपर्यंत आम्ही इथपर्यंत पोहोचलो आहोत असं ते म्हणाले.

अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी दोन्ही गट प्रथमच समोरासमोर आले होते.

Web Title: Maharashtra politics eknath shinde devendra fadnavis government floor test live update abn