Maharashtra Politics : अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत रोहित पवारांनी अनेक सवाल उपस्थित केले आहेत. त्या पार्श्वभूमीवर आज सुप्रिया सुळे यांनीही भाष्य करत पारदर्शक चौकशीची मागणी केली. तसेच खासदार सनील तटकरे यांनीही आज अजित पवारांच्या विमान अपघाताच्या AAIB च्या प्राथमिक चौकशी अहवालात त्रुटी असल्याचं वक्तव्य केलं. तर दुसरीकडे राज्यसभेची निवडणूक बिनविरोध का करण्यात आली? याबाबत उपमुख्यमंत्री शिंदे यांनी मोठं वक्तव्य केलं. दरम्यान, यासह आज दिवसभरातील पाच राजकीय नेत्यांची महत्वाची विधाने काय आहेत? जाणून घेऊयात.

“AAIB च्या प्राथमिक अहवालात त्रुटी”, सनील तटकरेंचं वक्तव्य

अजित पवार यांचं २८ जानेवारी रोजी विमान अपघातात निधन झालं. त्यांच्या विमान अपघाताला एक महिना होऊन गेला. काही दिवसांपूर्वी त्यांच्या विमान अपघाताबाबतचा एएआयबीचा २२ पानांचा प्राथमिक चौकशी अहवाल समोर आला. त्यामध्ये एएआयबीने विविध निष्कर्ष मांडले. मात्र, एएआयबीच्या प्राथमिक चौकशी अहवालाबाबत आता सुनील तटकरेंनी मोठं वक्तव्य केलं. तटकरे म्हणाले की,”एएआयबीच्या प्राथमिक अहवालावर आमचं कोणाचंही समाधान झालं नाही. त्या प्राथमिक अहवालात त्रुटी आहेत. या अपघाताबाबत ज्या काही शंका व्यक्त केल्या जात आहेत. त्यासहित या घटनेचा तपास परिपूर्ण पद्धतीने व्हावा आणि लवकरात लवकर तो तपास राज्याच्या आणि देशाच्या जनतेसमोर यावा. ही राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या सर्व सदस्याची भूमिका आहे”, असं सुनील तटकरे यांनी म्हटलं.

“अजित पवारांच्या अपघाती मृत्यूची पारदर्शक चौकशी व्हावी”; खासदार सुप्रिया सुळे

अजित पवार यांचा २८ जानेवारीला विमान अपघातात मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हळहळला. अजित पवारांच्या मृत्यूनंतर हा अपघात होता की घातपात? यावर प्रश्न उपस्थित झाले. रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन तीन ते चार वेळा विमान कंपनीने कसा ढिसाळपणा केला? याबाबत प्रश्न उपस्थित केले. त्यानंतर आज खासदार सुप्रिया सुळे यांनी याबाबत भाष्य केलं. सुप्रिया सुळे म्हणाल्या की, “महाराष्ट्रात अजितदादावर प्रेम करणारे लोक आहेत ते अस्वस्थ आहेत. रोहित पवार बोलत आहेत, जय पवार बोलत आहेत. लोकांमध्ये कुठेतरी अस्वस्थता आहे, जे काही घडलंय त्याची पारदर्शक चौकशी व्हावी ही मागणी आहे. रोहित पवार आणि जय पवार हे माझ्या घरातील मुले आहेत म्हणून मी हे म्हणत नाही. पण महाराष्ट्रातल्या असंख्य अजितदादा प्रेमींचीही हीच मागणी आहे की सगळ्या गोष्टी पारदर्शकपणे समोर आल्या पाहिजेत”, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

‘बँक घोटाळा करणाऱ्यांना कारागृहात जावं लागलं’, नितीन गडकरी यांचा इशारा कोणाला?

“कोणतीही बँक सुस्थितीत असेल तर त्याचे श्रेय बँकेच्या संचालक मंडळाला जाते. घोटाळ्यांमुळे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने कठोर भूमिका घेतली. त्यामुळे कर्ज घेणाऱ्यांनी ते वेळेत परत केले नाही तर संचालकांपुढे अडचणी निर्माण होतात. मी सुद्धा सहकार क्षेत्रातील आहे. बँक चालवण्यासाठी जी चळवळ आहे, त्यावर बँकेची पत नाही तर नेतृत्त्वामुळे असते. बँकेत घोटाळा झाला तर अनेक संचालकांना कारागृहात जावे लागले, त्यांच्यावर कारवाई झाली”, असे नमुद करीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी नागपूर महानगरपालिका कर्मचारी सहकारी बँकेच्या कार्यक्रमातून संचालकांना इशारा दिला.

“…म्हणून राज्यसभेची निवडणूक बिनविरोध”, उपमुख्यमंत्री शिंदेंचं मोठं वक्तव्य

राज्यसभेच्या निवडणुकीबाबत बोलताना उपमुख्यमंत्री शिंदे माध्यमांशी बोलताना म्हणाले की, “आम्ही मॅच खेळतो ती जिंकण्यासाठी, ही मॅच आम्ही खेळलो असतो तर नक्कीच जिंकलो असतो. पण शरद पवार यांच्याकडून आलेली विनंती आणि त्यांनी देशासाठी केलेलं काम याचा सर्वांनी विचार केला. त्यामुळे सर्वांचीच भावना होती की ही निवडणूक बिनविरोध व्हावी. आम्ही रोहित टिळक यांच्या नावाचा राज्यसभेसाठी विचार केला होता. पण शरद पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर आम्ही आमचा विचार बदलला आणि ही निवडणूक बिनविरोध करण्याचा निर्णय घेतला”, असं उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

शरद पवारांच्या राज्यसभेच्या निवडणुकीबाबत सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?

“शरद पवार राज्यसभेची निवडणूक लढत आहेत याचा आनंद सगळ्यांनाच आहे. मी उद्धव ठाकरेंचे आभार मानते. २००६ ला म्हणजे २० वर्षांपूर्वी मी राज्यसभेत गेले होते, तेव्हा बाळासाहेबांनी मला पाठिंबा दिला होता. आता २० वर्षांनी काँग्रेस आणि शिवसेना या पक्षांनी सामंजस्याची भूमिका घेतली. निवडणूक बिनविरोध होईल अशी चर्चा आहे. सगळे पक्ष सुसंस्कृतपणे सामोरे जात आहेत. यशवंतराव चव्हाणांची जी संस्कृती होती ती दिसून येते आहे”, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे. “बारामतीकरांचेही मी आभार मानते, कारण त्यांनी सहा दशकं शरद पवारांना साथ दिली. मी त्यांच्यापुढे नतमस्तक आहे”, असंही सुप्रिया सुळेंनी म्हटलं आहे.