Maharashtra Politics : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या २० व्या वर्धापनदिनानिमित्ताने राज ठाकरे यांनी महाराष्ट्र सैनिकांना विशेष संदेश देत एक मोठी घोषणा केली. दुसरीकडे अमेरिका-इस्रायल आणि इराणमधील युद्धाच्या पार्श्वभूमीवर येत्या काळात इंधन तुटवडा निर्माण होण्याच्या चर्चा समोर आल्या होत्या. मात्र, यावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देत महत्वाचं भाष्य केलं. दरम्यान, यासह आज दिवसभरातील राजकीय नेत्यांची पाच महत्वाची विधाने काय आहेत? जाणून घेऊयात.
“माझा स्वभाव गप्पिष्ट, मैत्रिणींच्या घोळक्यात…”, महापौर रितू तावडे काय म्हणाल्या?
मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी त्यांच्या राजकीय करिअरला सुरुवात कशी झाली यावर आज दिलखुलास गप्पा मारल्या आहेत. त्या एपीबी माझाच्या कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या. यावेळी त्यांनी अबला स्त्री, सहन करणारी स्त्री कोशातून बाहेर पडून आपल्याला हवं ते साध्य करण्याचं आवाहन त्यांनी महिलांना केलं. राजकारणात कशा आलात? या प्रश्नावर रितू तावडे म्हणाल्या की, “ही २२ वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. माझा स्वभाव गप्पिष्ट आहे. मी स्पोर्ट्समध्येही होते. राज्यस्तरावर मी खो खो खेळलेले आहे. मला खूप मैत्रिणी आहेत. मी एकटी राहू शकत नाही. मला मैत्रिणींच्या घोळक्यात बसायला आवडतं. मला नेहमी बोलायला खूप आवडतं. लग्न झालं तेव्हा मी जॉब करत होते. पण मुलं झाल्यावर जॉब करणं शक्य झालं नाही.”
रायगडावरून ‘मनसे’च्या सदस्य नोंदणीला सुरुवात होणार; राज ठाकरेंची घोषणा
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा २० वा वर्धापनदिन ९ मार्च २०२६ रोजी साजरा होत असून या निमित्ताने पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी महाराष्ट्र सैनिकांना विशेष संदेश दिला. या संदेशात त्यांनी १० मार्चपासून पक्षाची सदस्य नोंदणी मोहीम सुरू होत असल्याची घोषणा केली. राज ठाकरे यांनी फेसबुक पोस्टद्वारे सांगितलं की, ९ मार्च रोजी ते रायगड किल्ला येथे जाऊन छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करतील आणि त्यानंतर सदस्य नोंदणी मोहिमेची सुरुवात करतील. रायगड हा शिवाजी महाराजांच्या वास्तव्याचा तसेच शिवराज्याभिषेक सोहळ्याचा साक्षीदार असल्याने अशा पवित्र स्थळावरून मोहिमेला प्रारंभ करण्यात येत असल्याचे त्यांनी नमूद केले. राज ठाकरे यांनी महाराष्ट्र सैनिकांना आवाहन करताना स्पष्ट केले की, ही सदस्य नोंदणी केवळ पक्ष कार्यकर्त्यांपुरती मर्यादित नसून महाराष्ट्राला आकार द्यायची इच्छा असलेल्या प्रत्येक व्यक्तीला या चळवळीत सहभागी करून घ्यावे. सध्याच्या परिस्थितीबद्दल नाराजी असलेल्या नागरिकांनाही नवनिर्माणाच्या ध्यासाशी जोडण्याचे आवाहन त्यांनी केले.
“राजकीय पोळी भाजण्यासाठी व्हल्गर विधानं करु नये”; गिरीश महाजनांचा रोहित पवारांना टोला
जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी रोहित पवारांवर टीका केली. रोहित पवार यांनी DGCA ने दिलेला अहवाल, VSR कंपनीला मिळत असलेलं अभय, या कंपनीच्या मालकाने सीआयडी चौकशीला सामोरं जात असताना मिळालेली व्हिआयपी ट्रीटमेंट या सगळ्यावर भाष्य केलं होतं. तसंच अजित पवारांना न्याय मिळाल्याशिवाय आपण गप्प बसणार नाही असंही म्हटलं होतं. या पार्श्वभूमीवर बोलताना गिरीश महाजन म्हणाले की, “गलिच्छ राजकारण कुणाकडून सुरु आहे सगळ्यांना दिसतं आहे. पण मी पुन्हा सांगेन की अजित पवारांच्या अपघाती निधनाचं राजकारण कुणीही करु नये. उगाच काहीही बोललं जातं आहे, कुणी म्हणतंय बॉम्ब ठेवला, कुणी म्हणतंय सुसाईड बॉम्बर होता वेगवेगळे तर्क लावले जात आहेत. कुणीही अकलेचे तारे तोडत आहेत. या प्रकरणाची चौकशी व्हावी ही सगळ्यांची भावना आहे. मुख्यमंत्र्यांनाही हेच वाटतं आहे. त्यामुळे राजकीय पोळी शेकण्यासाठी कुणी व्हल्गर विधान करु नये.” असं गिरीश महाजन यांनी म्हटलं.
जय पवारांच्या पत्रकार परिषदेबाबत गिरीश महाजन काय म्हणाले?
अजित पवार यांचे पुत्र जय पवार हे लवकरच पत्रकार परिषद घेणार आहेत. जय पवार या पत्रकार परिषदेत काय बोलणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले. याबाबत विचारले असता गिरीश महाजन म्हणाले की, या अपघाताची सखोल चौकशी करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. केंद्र शासनाकडूनही गंभीर दखल या अपघाताची घेण्यात आली. कुणाला काही वाटत असेल तर त्यांनी दिल्लीला जावं. अपील करायचं असेल तर ते करावं. कुणाला अर्ज करायचा असेल तर करू शकतात. काही मागणी करायची असेल तर करू शकतात. या प्रकरणाच्या चौकशीमध्ये १०० टक्के पारदर्शकता आहे. संभ्रम असण्याची काडीमात्र शक्यता नाही”, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
घरगुती गॅस सिलिंडरचे दर ६० रुपयांनी वाढले, मुख्यमंत्री फडणवीसांनी काय म्हटलं?
घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमती ६० रुपयांनी वाढल्या आहेत. येत्या काळात इंधन तुटवडा निर्माण होईल अशी स्थिती येऊ शकते असं काही माध्यमांनी म्हटलं. याबाबत विचारलं असता देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिलं. फडणवीस म्हणाले की, “मी आपल्या सगळ्यांना सांगतो, लोकांमध्ये पॅनिक तयार करु नका. भारत सरकारने अत्यंत स्पष्टपणे भूमिका मांडली. एनर्जी सिक्युरिटीसंदर्भात मोदींनी कशी पावलं उचलली आहेत हे आपल्या समोर आलं आहे. दोन तीन दिवस झाले काही माध्यमांनी चालवून दिलं की पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा होणार, विनाकारण मोठमोठ्या रांगा पाहण्यास मिळाल्या. भारत सरकारने सांगितलं की अशी कुठलीही स्थिती निर्माण होणार नाही. त्यामुळे युद्धजन्य परिस्थिती आहे. जी परिस्थिती उद्भवेल त्याचा सामना करण्यासाठी भारत मोदींच्या नेतृत्वात सक्षमपणे उभा आहे.” असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
