Maharashtra Politics News regarding NCP merger and Sanjay Raut’s latest claim :महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या विलीनीकरणाच्या चर्चांनी जोर धरला आहे, याबाबत युगेंद्र पवार यांनी भाष्य केले आहे. तर दुसरीकडे प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यावरील आरोपांनंतर पार्थ पवारांची आलेली पोस्ट आणि संजय राऊतांनी शिंदे-अजित पवार गटाबाबत केलेला दावा यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

प्रफुल पटेल आणि सुनील तटकरेंसाठी पार्थ पवार मैदानात; पोस्ट करत म्हणाले..

गेल्या काही दिवासांपासून राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे कार्याध्यक्ष प्रफुल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या पदांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. इतकेच नाही तर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यावर पक्ष ताब्यात घेण्याच्या मुद्द्यावरून गंभीर आरोप केले होते. यादरम्यान आता अजित पवारांचे पुत्र आणि राज्यसभा खासदार पार्थ पवार सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे.

“प्रफुल पटेलजी आणि सुनील तटकरेजी यांना लक्ष्य करुन त्यांच्याविरोधात पसरवल्या जाणाऱ्या बातम्या निराधार आणि काल्पनिक आहेत. दोन्ही जेष्ठ नेत्यांची अनेक दशकांची निष्ठा आणि नेतृत्व आजही आम्हा सर्वांना मार्गदर्शक आहे. अशा ज्येष्ठ नेत्यांना काल्पनिक वादांमध्ये ओढणे अत्यंत दुर्दैवी असून, निषेधार्ह आहे”, असे पार्थ पवार त्यांच्या पोस्टमध्ये म्हणाले आहेत.

शिंदेसेनेच्या स्नेहभोजनाला ठाकरेंच्या खासदारांची हजेरी; नागेश आष्टीकर आष्टीकरांचा म्हणाले…

उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे काही खासदार शिवसेनेच्या (शिंदे) स्नेहभोजनाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. यावरून पुन्हा एकदा ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चा सुरू झाल्या आहेत. या स्नेहभोजनाच्या कार्यक्रमाला शिवसेना (ठाकरे) पक्षाचे खासदार नागेश आष्टीकर आणि खासदार संजय देशमुख यांनी हजेरी लावल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. मात्र, यानंतर खासदार नागेश आष्टीकर यांनी माध्यमांशी संवाद साधत स्नेहभोजनाच्या कार्यक्रमाला आपण का उपस्थित राहिलो? यांचं स्पष्टीकरण दिलं.

“आम्ही एका सभागृहात काम करतो. त्यामुळे मंत्री प्रतापराव जाधव यांच्या अॅनिव्हर्सरीचा कार्यक्रम असल्याने त्यांनी आम्हा सर्वांना जेवणासाठी या अशी विनंती केली होती. आमच्याकडेही वेळ होता, त्यामुळे गेलो होतो. पण मला त्यात काही गैर वाटत नाही. बाकी काही राजकीय चर्चा झालेली नाही. मी फक्त १० मिनिटे त्या ठिकाणी होतो. त्यामुळे मी त्या ठिकाणी फक्त गेलो आणि त्यांना शुभेच्छा दिल्या”, असं स्पष्टीकरण खासदार आष्टीकर यांनी दिलं आहे.

“भोंदूबाबा खरातला भर चौकात फाशी द्या”, नवनीत राणा आक्रमक

नाशिक जिल्ह्यातील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाची राज्यात मोठी चर्चा सुरू आहे. खरातची सध्या एसआयटीमार्फत चौकशी सुरू असून दररोज धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. यादरम्यान भाजपच्या नेत्या माजी खासदार नवनीत राणा यांनी प्रथमच या प्रकरणी भाष्य करताना भोंदूबाबा अशोक खरात याला भर चौकात फाशी दिली पाहिजे, अशी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

राणा म्हणाल्या की, नाशिकमधील प्रकार हा अनेकांची मने दुखावणारा आहे. आम्ही भक्तिभावाने देवाची पूजा-अर्चना करतो, पण यात जर कुणी भोंदूबाबा त्याचा गैरफायदा घेत असेल, तर ते संतापजनक आहे. या प्रकरणात जे व्हिडिओ समाज माध्यमांवर प्रसारीत केले जात आहेत, त्यातून महिलांचे चारित्र्य हनन केले जात आहे, हे दुर्देवी आहे. मला तर असे म्हणायचे आहे, की भोंदूबाबा अशोक खरात याला भरचौकात फाशी द्यायला हवी, यापेक्षा कमी शिक्षा नको. या बलात्कारी व्यक्तीला अशी शिक्षा व्हायला हवी, की जे कुणी स्वयंघोषित भोंदूबाबा आहेत, त्यांच्यावर वचक बसली पाहिजे. या भोंदूबाबाला कठोरात कठोर शिक्षा व्हायला पाहिजे.

राष्ट्रवादी पक्षाच्या विलीनीकरणाबाबत युगेंद्र पवार यांचे वक्तव्य, म्हणाले, “माझी इच्छा आहे की…”

दोन्ही राष्ट्रवादी पक्षांच्या विलीनीकरणाची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरू आहे. यादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरदपवार गट) युवा नेते युगेंद्र पवार यांनी याबद्दलची इच्छा बोलून दाखवली आहे. एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत याबद्दल बोलताना युगेंद्र पवार म्हणाले की, “विलीनीकरण होणार होतं. दादांचे जवळचे कार्यकर्ते आहेत त्यांनी देखील हे मान्य केलं आहे. माझं वैयक्तिक मत मांडू शकतो, माझी इच्छा आहे की पवार कुटुंबाने एकत्र राहिलं पाहिजे, एकत्र आलं पाहिजे. आणि राष्ट्रवादी काँग्रेस परिवारानेदेखील एकत्र राहिलं पाहिजे,” असे युगेंद्र पवार म्हणाले आहेत.

राऊतांचा शिवसेना (शिंदे) आणि राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षांबद्दल खळबळजनक दावा; नेमकं काय म्हणाले?

भविष्यात एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्या पक्षाला भविष्यात भाजपात विलीन व्हावेच लागेल, असा दावा शिवसेना (ठाकरे) नेते संजय राऊत यांनी केला आहे. “प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे हे अजितदादांचे सहकारी होते, नव्या रचनेमध्ये सुनेत्राताई पवारांचे ते सहकारी असतीलच असे नाही. मी खात्रीने सांगतो, भविष्यात हा पक्ष २५ ते ३० आमदारांसह भाजपामध्ये विलीन होईल. त्याचं नेतृत्व कोणाकडे असेल हे मी आत्ता सांगत नाही. त्याचबरोबर शिंदे गटाचेही तितकेच आमदार भाजपामध्ये विलीन होतील. दोन्ही पक्षाचे २५-३० आमदार भाजपात विलीन होण्याच्या मानसिकतेत आहेत. फक्त त्यांना काही काळ ‘वेट अँड वॉच’ थांबण्यास सांगण्यात आले आहे,” असे संजय राऊत म्हणाले.