Maharashtra Politics Top 5 News : राज्यात सध्या विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात विविध मुद्द्यांवरून विरोधक आणि सत्ताधारी समोरासमोर आल्याचे पहायाला मिळत आहे. यादरम्यान काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी एका बड्या तांदूळ व्यापाऱ्याने अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या नावाने राईस मिलर्सकडून कोट्यवधींची वसुली केल्याचा खळबळजनक आरोप केला आहे. तर दुसरीकडे रोहित पवार यांनी अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेत ब्लॅक बॉक्स सुरक्षित असतानाही तो जळ्याल्याचं का सांगितलं असा प्रश्न विचारला आहे. चला जाणून घेऊया आजची दिवसभरातील ५ महत्त्वाची वक्तव्य…
1) एसटी महामंडळात १७ हजार ७४२ चालक-वाहकांची कंत्राटी भरती! परिवहन मंत्र्यांची मोठी घोषणा!
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात (एसटी) तब्बल १७ हजार ७४२ चालक व वाहक कर्मचाऱ्यांची कंत्राटी पद्धतीने भरती करण्यात येणार आहे. राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. ही भरती एसटी महामंडळात लवकरच दाखल होणाऱ्या ८ हजार ३०० नव्या बसेससाठी करण्यात येणार आहे.
महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान विधानपरिषदेत बोलताना सरनाईक यांनी ही घोषणा केली. ते म्हणाले की, नव्या बसेसची खरेदी केल्यानंतर त्या चालवण्यासाठी आणि सेवा सुरळीत ठेवण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध असणे गरजेचे आहे. त्यामुळे तातडीने कंत्राटी भरती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. … वाचा सविस्तर वृत्त
2) अजितदादांच्या विमान अपघातातील ब्लॅक बॉक्स सुरक्षित असतानाही जळाल्याचं का सांगितलं? रोहित पवारांचा सवाल
अजित पवार यांचे २८ जानेवारी रोजी झालेल्या विमान अपघातात निधन झाले. ही घटना घडल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार आणि अजित पवार यांचे पुतणे रोहित पवार यांनी या प्रकरणी घातपाताचा संशय व्यक्त केला आहे. दरम्यान रोहित पवार यांनी आणखी एक पोस्ट लिहून अजितदादांच्या विमानाचा ब्लॅक बॉक्स सुरक्षित असतानाही तो जळाल्याचं का सांगितलं? असा सवाल केला आहे.
“अजितदादांच्या विमान अपघाताच्या संवेदनशील विषयावर केंद्रीय नागरी उड्डाणमंत्र्यांनी दिलेलं थातुरमातूर आणि वेळ मारून नेणारं उत्तर संपूर्ण देशाने बघितलं. पारदर्शक आणि आंतरराष्ट्रीय निकषानुसार तपास सुरू असल्याचं सांगणार्या मंत्र्यांनी बारामती दुर्घटनेतील ब्लॅकबॉक्स सुरक्षित असतानाही black box जळाल्याचं का सांगितलं? आणि अमेरिकन एजन्सी अहमदाबाद अपघाताबद्दल माहिती मागत असतानाही माहिती का दिली जात नाही? याची उत्तरं द्यावीत,” असे रोहित पवार म्हणाले आहेत.
“VSR कंपनी सोबत आर्थिक संबंध असणाऱ्या VSR च्या मालकाच्या मुलाच्या लग्नात पाहुणचार करून आलेल्या आणि मिठाला जागणाऱ्या केंद्रीय नागरी उड्डाणमंत्र्याकडून अपेक्षा तरी कशी करणार? मात्र काँग्रेससह INDIA आघाडीतील मित्रपक्ष हा विषय प्रभावीपणे मांडतीलच, असा विश्वास आहे!” असेही ते म्हणाले आहेत.
3) “ऑपरेशन सिंदूरच्या वेळीही राजकारण आणि आताही…”; पंतप्रधान मोदींच्या भेटीनंतर काय म्हणाले एकनाथ शिंदे?
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावर आहेत. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. यानंतर माध्यमांशी बोलताना शिंदेंनी विरोधकांवर टीका केली. विरोधी पक्ष, सत्ताधारी या सगळ्यांनी एकसंघ राहिलं पाहिजे. पंतप्रधानांना पाठिंबा दिला पाहिजे. पण दुर्दैवाने युद्धजन्य परिस्थितीत विरोधक राजकारण करत आहेत. अशा प्रसंगात राजकारण करता कामा नये. गॅसचा तुटवडा, इंधन तुटवडा आहे असं सांगत आहेत. त्यामुळे साठेबाजांना संधी मिळते हे ते लक्षात घेत नाहीत. ऑपरेशन सिंदूरच्या वेळी विरोधक असंच वागले. पाकिस्तानात हेडलाइन व्हाव्यात म्हणून काही लोक बोलतात हे काही योग्य नाही असंही एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. इंधनाचा बेकायदेशीर स्टॉक कुणीही करु नये. सिलिंडरचा तुटवडा भासू देणार नाही हे केंद्राने स्पष्ट केलं आहे, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.
4) भुजबळांच्या नावाने कोट्यवधींची वसुली? नाना पटोलेंचा भर सभागृहात गंभीर आरोप
गडचिरोली जिल्ह्यातील देसाईगंज येथील एका बड्या तांदूळ व्यापाऱ्याने अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या नावाने राईस मिलर्सकडून कोट्यवधींची वसुली केल्याचा खळबळजनक आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार नाना पटोले यांनी मंगळवारी विधानसभेत केला… वाचा सविस्तर वृत्त
5) “सहा वेळा राज्याचं उपमुख्यमंत्रीपद सांभाळलेल्या…”, नार्वेकरांची भेट घेतल्यानंतर रोहित पवारांची पोस्ट
अजित पवार यांच्या विमान अपघातावर विधिमंडळात चर्चा व्हावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवर करत आहेत. या मागणसाठी आज रोहित पवारांनी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेतली. सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांनी याबद्दल माहिती दिली आहे. “सहा वेळा राज्याचं उपमुख्यमंत्रीपद सांभाळलेल्या आणि ११ वेळा राज्याचं बजेट मांडलेल्या अजितदादांचा विमान अपघातात अकाली मृत्यू होऊनही या बाबीवर विधिमंडळात साधी चर्चाही होत नसेल तर हे अत्यंत दुर्दैवी आहे. त्यामुळंच विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेऊन अजितदादांच्या विमान अपघाताचा विषय विधीमंडळात चर्चेला घेऊन विस्तृत चर्चा करण्याची विनंती त्यांना केली आणि तसं निवेदनही दिलं. अपेक्षा आहे की, अजितदादांचं योगदान आणि त्यांचा झालेला संशयास्पद अपघात या गोष्टी बघता अध्यक्ष महोदय चर्चेला परवानगी देतील,” असे रोहित पवार म्हणाले आहेत.
