Maharashtra Politics : राज्याच्या राजकारणात सध्या अनेक घडामोडी घडताना पाहायला मिळत आहेत. शिवेसना ठाकरे गटाचे खासदार फुटणार असल्याचा दावा शिवसेना (शिंदे) पक्षाचे नेते संजय शिरसाट यांनी केला आहे. त्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे. दुसरीकडे मंत्री झिरवाळ यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाल्यामुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. मंत्री झिरवाळ यांच्या व्हिडीओवरून आता आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी मंत्री झिरवाळ यांच्या व्हायरल व्हिडीओबाबत बोलताना एक मोठं वक्तव्य केलं असून या प्रकरणात एका माजी मंत्र्याचा हात असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. दरम्यान, यासह आज दिवसभरातील राजकीय नेत्यांची पाच महत्वाची विधाने काय आहेत? जाणून घेऊयात.
ठाकरेंचे खासदार फुटणार असल्याचा शिंदे सेनेच्या मंत्र्यांचा दावा
शिवसेना (शिंदे) पक्षाचे नेते संजय शिरसाट यांनी आज माध्यमांशी बोलताना एक मोठा दावा केला आहे. संजय शिरसाट म्हणाले की, “शिवसेना ठाकरे गटात अंतर्गत धूसफूसीच्या अनेक घटना समोर येत आहेत. राज्यसभेची उमेदवारी प्रियंका चतुर्वेदी यांना का दिली नाही, याची कारणं काय आहेत? यावर आम्ही बोलणार नाहीत. तसेच संजय राऊत यांनी राज्यसभेसाठी शरद पवारांचं नाव का सुचवलं? याचेही वेगळे कारणं आहेत. मात्र, ठाकरे गटातील अंतर्गत जी भांडणं सुरू आहेत, ते टोकाला गेले आहेत आणि याचा लवकरच स्फोट होईल. खासदारांना भेटून त्यांच्याशी चर्चा करणं हा एक भाग आहे. पण मागच्यावेळी जो उठाव झाला होता, त्या उठावाचंही हेच कारणं होतं. मंत्र्यांना न भेटणं, आमदारांना न भेटणं, पदाधिकाऱ्यांना न भेटणं हा त्यांचा जो स्वभाव आहे, त्या स्वभावाला कंटाळूनच काही लोकांनी उठाव केला. आताही त्याच हालचाली केंद्रात खासदारांच्या सुरू आहेत. त्या अनुषंगाने त्यांनी बैठक घेतली असावी. पण लवकरच हे खासदार कोणाच्यातरी गटात विलीन होतील अशी शंका उपस्थित होत आहे”, असं मंत्री संजय शिरसाट यांनी म्हटलं.
झिरवाळांच्या व्हायरल व्हिडीओमागे माजी मंत्र्याचा हात? वडेट्टीवारांचा मोठा दावा
काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी मंत्री झिरवाळांच्या व्हायरल व्हिडीओबाबत बोलताना एक मोठा दावा केला. मंत्री झिरवाळांच्या व्हायरल व्हिडीओमागे एका माजी मंत्र्याचा हात असल्याचा गंभीर आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला. वडेट्टीवार म्हणाले की,”जे नको आहेत ते टार्गेट होत आहेत. प्रत्येकाला जागा रिकामी करून घ्यायची आहे. कारण स्पर्धा खूप आहे. एका मंत्र्याची विकेट गेली की दुसरा मंत्री टपूनच बसलेला आहे. त्यामुळे दुसऱ्याची विकेट काढण्यासाठी लगेच तिसरा लाईनमध्ये बसलेला आहे. या प्रकरणात एक मोठं नाव समोर येत आहे. नरहरी झिरवाळांची ही जागा खाली करून घेण्यासाठी जो माजी मंत्री आहे, तोच हे सगळं करत आहे. याचं कारण जागा खाली झाली तर त्यांची एन्ट्री होईल”, असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं.
“माझ्यावरही अघोरी पूजेचा प्रयत्न”, ठाकरेंच्या माजी खासदाराचा धक्कादायक दावा
अशोक खरात प्रकरणामुळे राज्यातील भोंदूगिरी समोर आली आहे. अनेक जण अशा भोंदूबाबांकडे जाऊन आपलं राजकीय भविष्य जाणून घेण्याचा प्रयत्न करतात. असं असतानाच ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनीही आता एक धक्कादायक दावा केला. चंद्रकांत खैरे म्हणाले की, “माझ्यावरही अघोरी पूजा झाली होती. मी धार्मिक आणि देवभक्त आहे, शक्ती माझ्याकडे आहे. माझ्यावर ज्याने अघोरी विद्या केली तो माणूस मरण पावला. तो माणूस मेला. इथेही देवेंद्र फडणवीसांना घालवण्यासाठी अघोरी कृत्य केलं. राजकीय लोकांनी बाबा लोकांकडे जाऊ नये”, असं चंद्रकांत खैरे म्हणाले.
“रॅलीतील तो व्हिडीओ कोणी व्हायरल केला?” सुषमा अंधारेंनी शीतल म्हात्रेंना डिवचलं
“क्रूरकर्मा खरातला दिली गेलेली पाण्याची जोडणी ही मातोश्रीच्या मॅडमच्या आग्रहाखातर देण्यात आली होती म्हणे. यही तो नही “ताज” का राज? उबाठाला हा प्रश्न विचारलाच पाहिजे… ‘ताज का राज’ फुटला तर यांच्या तोंडचं पाणी पळेल’”, अशी टीका शिवसेना शिंदे गटाच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी केली होती. त्यांच्या या टीकेला शिवसेना ठाकरे गटाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिलं. सुषमा अंधारे म्हणाल्या की, “राजकारणात एक शुचिता पाळावी लागते. युद्धाचे आणि राजकारणाचे काही नियम असतात. या नियमानुसार योद्धाच्या कुटुंबियांवर हल्ले करायचे नसतात. पण म्हात्रेसारख्या लोकांना त्याचं महत्त्व कळणार नाही. आम्ही इतक्या वर्षात लता ताईंबद्दल कधीच वाईट शब्द वापरले नाहीत किंवा वापरणार नाही. पण म्हात्रे लिमिट क्रॉस करत असतील तर त्यांना त्यांची जागा दाखवावी लागेल. म्हात्रेंनी या सर्वांवर बोलण्यापेक्षा म्हात्रेंचा रॅलीतील व्हिडीओ कोणी व्हायरल केला? हे त्यांनी सांगावं. राज सुर्वे नावाच्या व्यक्तीच्या अकाऊंटवर हा ओरिजिनल व्हिडीओ व्हायरल करण्यात आला होता. मात्र, शीतल म्हात्रे म्हणाल्या की माझा व्हिडीओ फेक आहे. मग त्यांनी ओरिजिनिल व्हिडिओ दाखवा. राज सुर्वे कोण आहे हेही सांगा. बात निकलेगी तो दूर तलक जाएगी”, असा थेट इशाराच सुषमा अंधारे यांनी दिला.
पेट्रोल टंचाईवर मुख्यमंत्री फडणवीसांचं मोठं भाष्य
राज्यातील अनेक शहरात इंधन संपणार असल्याच्या अफवा पसरल्यामुळे पेट्रोलपंपावर भल्या मोठ्या रांगा लागल्या आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, “भारत सरकारने वारंवार सांगितले आहे की, सिलिंडर आणि पेट्रोल डिझेलचा मुबलक साठा सरकारकडे आहे. त्यामुळे जनतेने घाबरून जाण्याचे काही कारण नाही. पेट्रोल पंपांवर होणारी गर्दी चुकीची आहे. जनतेमध्ये चुकीच्या संदेश पसरवला जात आहे. पुरवठा आणि मागणी याचा ताळमेळ बिघडल्यामुळे काही ठिकाणी अडचण निर्माण झाली. कारण लोकांनी भीतीपोटी पेट्रोलचा मोठ्या प्रमाणावर साठा केलेला आहे. मात्र जनतेने साठा करण्याची काहीही गरज नाही. केंद्र सरकारकडे पेट्रोल आणि डिझेलचा मुबलक साठा असून आपल्यावर कुठलिहीची अडचण येणार नाही”, असे आवाहन आहे मुख्यमंत्र्यांनी केले.
