लक्षद्वीप येथील नवीन प्रशासक प्रफुल पटेल यांच्या निर्णयांमुळे असंतोष निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी लक्षद्वीप प्रकरणात लक्ष घालण्याची विनंती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्राद्वारे केली. या पत्रावरून भाजपाने शरद पवार यांच्यावर टीका केली आहे. बार मालकांसंदर्भात लिहिलेल्या पत्राचा हवाला भाजपाने दिला असून, “शेतकऱ्यांची आणि पशुधनाची चिंता व्यक्त करणारे पत्र ते कधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहितील?,” असं म्हणत भाजपाने पवार यांना काही सवाल केले आहेत.
लक्षद्वीप येथील नवीन प्रशासक प्रफुल पटेल यांच्या निर्णयांमुळे वाद निर्माण झाला आहे. गोमांसावर बंदी घालण्याची प्रस्ताव मांडल्याने लक्षद्विपमध्ये वातावरण तापलं आहे. त्यासंदर्भात पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हस्तक्षेप करण्याची मागणी करणारे पत्र लिहिलं होतं. या पत्रावरून महाराष्ट्र भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ट्विट करून पवारांवर टीका केली आहे. त्यांनी मुख्यमंत्र्यांना शरद पवार कधी पत्र लिहिणार असा सवालही केला आहे.
लक्षद्वीप प्रकरणी शरद पवार यांचे पंतप्रधान मोदी यांना पत्र
“पहिले पत्र बार मालकांसाठी तर दुसरे पत्र लक्षद्वीपमध्ये गोवंश हत्या बंदी करू नका म्हणून… लॅाकडाऊनमध्ये नुकसान झाले म्हणून बारमालकांना मदत केली पाहिजे असे पत्र लिहिणारे शरद पवार आता थेट लक्षद्वीप बेटावर गोमांसावर बंदी येऊ नये, यासाठी थेट पंतप्रधानांना पत्र लिहितात. महाराष्ट्रात कोकणात वादळ व अन्य भागात अवकाळी पावसाने नुकसान झाले, पण शेतकऱ्यांची आणि पशुधनाची चिंता व्यक्त करणारे पत्र ते कधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहितील? मराठा समाजाचे आरक्षण टिकवण्यात राज्य सरकार कमी का पडले हे विचारणारे पत्र कधी लिहीणार? १२ बलुतेदारांना मदत मिळाली नाही, त्याची विचारणा करणारे पत्र राज्य सरकारला पवार साहेब कधी लिहीणार?,” असे प्रश्न उपाध्ये यांनी उपस्थित केले आहेत.
पहिले पत्र बार मालकांसाठी तर दुसरे पत्र लक्षद्वीपमध्ये गोवंश हत्या बंदी करू नका म्हणून
लॅाकडाऊन मध्ये नुकसान झाले म्हणून बारमालकांना मदत केली पाहिजे असे पत्र लिहिणारे @PawarSpeaks आता थेट
लक्षद्वीप बेटावर गोमांसावर बंदी येऊ नये यासाठी थेट पंतप्रधानांना पत्र लिहितात ..2— Keshav Upadhye (@keshavupadhye) May 27, 2021
मोदींना लिहिलेल्या पत्रात पवार काय म्हणाले?
स्थानिक लोकांशी समन्वय साधून काम करणाऱ्या प्रशासकाची तेथे नियुक्ती केली जावी. स्थानिक मच्छिमारांची किनारपट्टीवरील साहित्यसामुग्री कसलीही नोटीस न बजावता उद्ध्वस्त करणे, अंगणवाड्या बंद करून लोकांना बेरोजगार करणे, तेथे दारूबंदी असताना नव्याने त्याबाबतची परवानगी देणे, स्थानिक डेअऱ्या बंद करून त्यांच्या खासगीकरणाची प्रक्रि या सुरू करणे अशा विविध ११ मुद्द्यांकडे पवार यांनी पंतप्रधान मोदी यांचं लक्ष वेधलं आहे.