महाराष्ट्राच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील दोन्ही गटांच्या ज्येष्ठ नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मध्यरात्री ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी भेट घेतल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार नेमकी कोणती नवी खेळी खेळणार, याबाबत आता तर्क-वितर्कांना वेग आला असून, सत्ताधारी आणि विरोधक दोन्ही बाजूंनी आगामी राजकीय भविष्याबाबत चाचपणी सुरू झाल्याचे चित्र आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, तर दुसरीकडे अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल यांनी काल रात्री अचानक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या तिन्ही बड्या नेत्यांच्या एकत्रित उपस्थितीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या समीकरणांची नांदी तर नाही ना? अशी चर्चा रंगू लागली आहे.

‘वर्षा’ बंगल्यावर सव्वा तास खलबतं

विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जयंत पाटील, सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत ‘वर्षा’ बंगल्यावर जवळपास सव्वा तास खलबतं झाली. विशेष म्हणजे, मुख्यमंत्र्यांच्या भेटीपूर्वी या तिन्ही नेत्यांमध्ये एक स्वतंत्र बैठक झाल्याचीही माहिती समोर येत आहे. सुरुवातीला अजित पवार गटाचे तटकरे आणि पटेल वर्षावर दाखल झाले, आणि त्यांच्या पाठोपाठ जयंत पाटीलही तिथे पोहोचल्याने या बैठकीबाबत गूढ वाढले आहे.

बैठकीबाबत जयंत पाटलांनी दिली पहिली प्रतिक्रिया

या मध्यरात्रीच्या भेटीनंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडताच जयंत पाटील यांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी तटकरे आणि पटेल यांच्यासोबत कोणत्याही प्रकारची राजकीय बैठक झाली नसल्याचा दावा केला.

“माझा आणि प्रफुल पटेल किंवा सुनील तटकरे यांच्या भेटीचा काहीही संबंध नाही. इस्लामपूर नगरपालिकेच्या नगराध्यक्षांना अपात्र ठरवल्याप्रकरणी मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यासाठी रात्री साडेदहा वाजता ‘वर्षा’वर गेलो होतो. मुख्यमंत्र्यांशी केवळ ५ मिनिटे चर्चा करून मी बाहेर पडलो. तिथे तटकरे आणि पटेल उपस्थित आहेत, याची मला कोणतीही कल्पना नव्हती.” – जयंत पाटील, प्रदेशाध्यक्ष (राष्ट्रवादी काँग्रेस – शरदचंद्र पवार पक्ष)

सिल्व्हर ओक ते वर्षा बंगला: नेमकं घडलं काय?

‘द इंडियन एक्सप्रेस’च्या वृत्तानुसार, या भेटीपूर्वी एक मोठी घडामोड घडली होती. जयंत पाटील यांनी सर्वप्रथम दक्षिण मुंबईतील ‘सिल्व्हर ओक’ या निवासस्थानी जाऊन शरद पवार यांची भेट घेतली होती. शरद पवारांसोबत चर्चा केल्यानंतर जयंत पाटील थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी रवाना झाले.

या गुप्त बैठकीत नेमकी कोणत्या विषयावर चर्चा झाली, याबाबत मुख्यमंत्री कार्यालय किंवा दोन्ही बाजूंच्या नेत्यांकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. धक्कादायक बाब म्हणजे, पक्षातील इतर प्रमुख नेत्यांनाही या बैठकीच्या अजेंड्यापासून दूर ठेवण्यात आल्याचे समजते.

शरद पवार गटासमोर मोठं संकट? आमदार महायुतीच्या वाटेवर?

जुलै २०२३ मध्ये अजित पवारांनी बंड केल्यानंतर शरद पवार यांच्या पक्षासमोर निर्माण झालेले हे सर्वात मोठे धोरणात्मक संकट मानले जात आहे. सूत्रांच्या दाव्यानुसार, शरद पवार यांच्या पक्षातील १० पैकी किमान ५ आमदार भाजपच्या नेतृत्वाखालील महायुती किंवा एनडीए मध्ये सामील होण्यास उत्सुक आहेत. विरोधकांमध्ये राहिल्यामुळे मतदारसंघात विकासकामांसाठी निधी मिळवणे आणि प्रशासकीय मंजुरी मिळवणे कठीण जात असल्याचा सूर या आमदारांचा आहे.

जयंत पाटील यांनी नुकतीच आमदारांची ही भावना शरद पवारांसोबत मांडली होती. पक्षातील एक मोठा गट भाजपसोबत जाण्यास अनुकूल असल्याचे त्यांनी संकेत दिले होते. मात्र, या संपूर्ण घडामोडींवर शरद पवार यांनी अजूनही मौन बाळगले आहे.

दिल्लीतील गणिते आणि शरद पवारांचे महत्त्व

सध्या विधानसभेत शरद पवार गटाकडे अवघे १० आमदार आणि लोकसभेत ८ खासदार आहेत. संख्याबळ कमी असले तरी दिल्लीतील राजकीय समीकरणांसाठी शरद पवार गटाचे महत्त्व वाढले आहे. केंद्र सरकार आगामी काळात मतदारसंघांची पुनर्रचना यांसारखी महत्त्वाची विधेयके आणण्याच्या तयारीत आहे. अशा वेळी संसदेत आपले पारडे जड ठेवण्यासाठी भाजपला शरद पवारांच्या साथीची गरज भासू शकते, अशी चर्चा राजकीय विश्लेषकांमध्ये आहे.

अजित पवार गटातही अस्वस्थता; पार्थ पवारांच्या हस्तक्षेपावरून नाराजी?

हा राजकीय भूकंप केवळ शरद पवार गटापुरता मर्यादित नाही. शरद पवार गटाने काँग्रेसमध्ये विलीन होण्यापासून ते थेट एनडीएला पाठिंबा देण्यापर्यंतच्या पर्यायांवर विचार सुरू केल्याने अजित पवार गटाचे टेन्शन वाढले आहे. यात अजित पवार यांच्या गटाला पुन्हा सोबत घेण्याचा कोणताही प्रयत्न नसल्याने, सत्ताधारी राष्ट्रवादीत (अजित पवार गट) आपल्या राजकीय अस्तित्वाबद्दल कमालीची अस्वस्थता आहे.

अशातच, पक्षाचे माजी राष्ट्रीय सरचिटणीस सच्चिदानंद सिंह यांनी सुनेत्रा पवार यांच्या पक्षाध्यक्षपदाच्या निवडीला कायदेशीर नोटीस पाठवून आव्हान दिले आहे. अंतर्गत सूत्रांनुसार, राज्यसभा खासदार पार्थ पवार यांचा पक्षाच्या संघटनात्मक बाबींमध्ये वाढता हस्तक्षेप ही या नाराजीमागचे मुख्य कारण असल्याचे बोलले जात आहे.

गेल्या दोन आठवड्यांत शरद पवार गटाचे काँग्रेसमध्ये विलीनीकरण होणार असल्याच्या चर्चांना काँग्रेसमधूनच विरोध झाला होता. अब थेट देवेंद्र फडणवीसांच्या भेटीगाठींमुळे हा गट महायुतीच्या जवळ जाणार की शरद पवार पुन्हा एकदा कोणती ‘गुगली’ टाकून राजकारणाची दिशा बदलणार? याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.