Maharashtra Politics : बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या अनुषंगाने अनेक राजकीय घडामोडी सुरू आहेत. या पार्श्वभूमीवरच बोलताना आज शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चा ते बारामतीची पोटनिवडणूक यावर भूमिका मांडली आहे. तसेच खासदार पार्थ पवार यांनी बारामतीच्या पोटनिवडणुकीवरून काँग्रेसला मोठा इशारा दिला आहे. दरम्यान, यासह आज दिवसभरातील राजकीय नेत्यांची पाच महत्वाची विधाने काय आहेत? जाणून घेऊयात.
‘काँग्रेसला उमेदवार देण्याचा अधिकार’, शरद पवारांचं मोठं वक्तव्य
बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी आज दिल्लीत पत्रकार परिषदेत बोलताना मोठं भाष्य केलं. शरद पवार म्हणाले की, “काँग्रेस एक राजकीय पक्ष आहे. त्यामुळे निर्णय घेण्याचा त्यांना अधिकार आहे. त्यामुळे त्याबाबत जास्त चर्चा करण्याची गरज नाही. बारामती पोटनिवडणूक बिनविरोध होऊद्या अशी मागणी करण्याचंही काही कारण नाही. लोकशाहीमध्ये निवडणूक लढवायची असेल तर समोर कोणीतरी उमेदवार असेल हे मान्य करून निवडणूक लढवावी लागत असते. बारामतीच्या बिनविरोध पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसशी बोलण्याची काही गरज नाही”, असं शरद पवार यांनी म्हटलं.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? शरद पवारांनी मौन सोडलं
राष्ट्रवादी काँग्रेसचे विलीनीकरण होणार असल्याच्या चर्चा मागील काही दिवसांपासून आहेत. यावर बोलताना शरद पवार म्हणाले की, “राजकारणात लोकांचं काम करण्यासाठी यावं लागतं. अजित पवार हे लोकांचं काम करण्यासाठी सक्रिय होते. अजित पवारांबद्दल नागरिकांमध्ये आदर होता. दुर्दैवाने त्यांचं अपघाती निधन झालं. कुटुंब म्हणून आम्हाला त्याचं दुःख आहे. पवार कुटुंबावर संकट आलेलं आहे. मी कुटुंबप्रमुख आहे. त्यामुळे कुटुंबप्रमुख म्हणून माझ्यावर जबाबदारी आहे. विलीनीकरणाबाबत जयंत पाटील आणि अजित पवार चर्चा करत होते. परंतु, अजित पवारांच्या मृत्यूनंतर ही चर्चा थांबली. आमच्या पक्थात आता याविषयी चर्चा नाही. विलीनीकरणासंदर्भात अजित पवारांबरोबर जयंत पाटलांच्या पाच-सहा बैठका झाल्या होत्या. बैठक झाल्यानंतर दोघांपैकी एक येऊन मला ब्रिफिंग करत होते.”
‘काँग्रेसला भविष्यात काय त्रास होईल हे दिसेल’, खासदार पार्थ पवारांचा इशारा
बारामती पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बोलताना खासदार पार्थ पवार यांनी काँग्रेसला सूचक इशारा दिला. पार्थ पवार म्हणाले की, “काँग्रेसच्या राष्ट्रीय नेतृत्वाशी बोलण्याची गरज मला नाही वाटत. कारण सर्वांना माहिती आहे ते काय करत आहेत? सगळे मोठे लोक आहेत, त्यामुळे काय चाललंय हे सर्वांना समजतं. त्यांनी जो विचार केला असेल तो विचार त्यांना करूद्या. त्यांना (काँग्रेसला) नंतर महाराष्ट्रात काय त्रास होणार हे त्यांना दिसेल. कारण असं आहे की लोक विसरत नाहीत. अजितदादा यांच्याबाबत लोकांच्या मनात प्रेम आहे. अशा वेळी एवढ्या मोठ्या पक्षाने असा निर्णय घेणं हे अतिशय चुकीचं आहे. मला वाटतं की आपण कोणाला थांबवू शकत नाहीत. त्यामुळे जशी वेळ येते तसं सामोरं जावं लागत असतं. आम्ही देखील त्या पद्धतीने समोरं जाऊ. आम्ही कोणालाही फोन करणार नाही. जे काय नशिबात असेल ते होईल. पण मला याचं वाईट वाटतं की महाराष्ट्रात काँग्रेसचा डाऊनफॉल सुरू आहे.”
“मी ६ वेळा उपमुख्यमंत्री राहिलेल्या अजितदादांची पत्नी”, बारामतीत सुनेत्रा पवार भावूक
बारामती पोटनिवडणुकीसाठी अर्ज भरण्याआधी बारामतीमध्ये झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मेळाव्यात सुनेत्रा पवार यांनी भाषण केलं. यावेळी सुनेत्रा पवार भावूक झाल्या. दोन महिन्यांआधी अजितदादांना गमावलं. अजितदादा आपल्यात नाही, असं आजही वाटत नाही. मला स्वप्नातही वाटलं नव्हतं की बारामतीची पोटनिवडणुक होईल. अजितदादांनी शेवटचा श्वासही बारामतीत घेतला. चारवेळा मुख्यमंत्री राहिलेल्या साहेबांची सून म्हणून सहावेळा उपमुख्यमंत्री राहिलेल्या अजितदादांची पत्नी म्हणून मला राज्य सांभाळायाची ताकद मिळेल, असंही सुनेत्रा पवार म्हणाल्या. अजितदादांची जागा कुणीच घेऊ शकत नाही. पण त्यांचा विचार पुढे घेऊन जाते. जय पवार आणि पार्थ पवार हे माझं कुटुंब नाही. तुम्ही सगळे माझं कुटुंब आहात. एकालाही वाऱ्यावर सोडणार नाही. अजितदादांचा जनता दरबार सुरू राहील. बारामतीचा विकास कायम सुरू राहणार आहे,अशी ग्वाही सुनेत्रा पवारांनी दिली.
“वहिनीसाहेब, तुम्ही थेट शेवटच्या सभेलाच या”; सुनील तटकरेंची भावनिक साद
बारामती येथे आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या मेळाव्यात सुनेत्रा पवार यांच्या विजयाचा विश्वास व्यक्त करण्यात आला. राष्ट्रवादीच्या मेळाव्यात बोलताना सुनील तटकरे म्हणाले की, सर्वच राजकीय पक्षांना मी आवाहन केलं आहे की, निवडणूक बिनविरोध व्हावी. काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींशी संपर्क करण्याचा प्रयत्न प्रफुल पटेल आणि मी देखील केला. त्यांच्या मनात असेल नसेल तरी आपण प्रयत्नांची पराकाष्ठा करूया. अर्ज मागे घेण्याच्या तारखेपर्यंत आपण सर्वांना संपर्क करण्याचा प्रयत्न करूया. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी अजित पवार बारामती येथे एक शेवटची सभा घ्यायचे, याची आठवण सुनिल तटकरेंनी यावेळी काढली. ते म्हणाले की, “दादा अर्ज भरण्यासाठी बारामतीत यायचे, उरलेले सगळे दिवस महाराष्ट्रातील पक्षाच्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी प्रयत्नांचा पराकाष्ठा करायचे. निवडणुक जर यदाकदाचित लादलीच गेली तर, वहिनीसाहेब आपण आज अर्ज भरा आणि जशी दादा शेवटची सभा घ्यायचे तसे शेवटच्या सभेलाच आपण या”
