Maharashtra Politics : अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत रोहित पवार अनेक प्रश्न उपस्थित करत आहेत. मुंबई आणि बारामतीमधील पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न रोहित पवारांनी केला. मात्र, पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला नाही. यावरून रोहित पवारांनी राज्य सरकारवर टीका केली. याच अनुषंगाने रोहित पवारांनी आज राज ठाकरेंची भेट घेतली. यानंतर राज ठाकरे यांनीही राज्य सरकारला दोन महत्वाचे प्रश्न विचारले. दुसरीकडे सुनेत्रा पवारांची राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदी निवड झाली असून पार्थ पवारांना राज्यसभेची उमेदवारी जाहीर झाली. यावरूनही अनेकांच्या प्रतिक्रिया समोर येत आहेत. तसेच मराठी भाषा गौरव दिनानिमित्ताने खासदार सुप्रिया सुळेंनी पोस्ट शेअर करत सरकारवर टीका केली. यासह आज दिवसभरातील पाच राजकीय नेत्यांची महत्वाची विधाने काय आहेत? जाणून घेऊयात.
अजित पवारांच्या विमान अपघात प्रकरणावर राज ठाकरेंचं मोठं भाष्य
रोहित पवारांच्या भेटीनंतर राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना अजित पवारांच्या अपघाताबाबत काही प्रश्न उपस्थित केले. राज ठाकरे म्हणाले की, “अजित पवारांच्या अपघात प्रकरणात काही काळंबेरं आहे का? असा संशय निर्माण होतोय. कारण सरकार एफआयआर का दाखल करून घेत देत नाहीये? एफआयआरला सरकार का घाबरतंय? अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत सरकार संशय निर्माण करत आहे. अजित पवार यांच्या विमान अपघातातील विमानाच्या ब्लॅक बॉक्सचं काय झालं? अद्याप कळालं नाही. सरकार अशा प्रकारे संशयाची भूतं नाचवत आहे. मात्र, माझा फक्त एक प्रश्न आहे की एफआयआर नोंदवून का घेतला जात नाही आणि तो एफआयआर नोंदवला जाऊ नये यासाठी सरकार का प्रयत्न करतंय? याची उत्तरे सरकारने द्यावी”, असं राज ठाकरे यांनी म्हटलं.
“जनता सरकारला सोडणार नाही”, राज ठाकरेंच्या भेटीनंतर रोहित पवार आक्रमक
अजित पवारांच्या विमान अपघातानंतर रोहित पवार प्रश्न उपस्थित करत आहेत. मुंबई आणि बारामती येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेण्यास नकार दिला. यानंतर रोहित पवारांनी राज ठाकरेंची भेट घेतली. या भेटनंतर रोहित पवारांनी सरकारवर टीका केली. रोहित पवार म्हणाले की, “केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळांनी सांगितलं होतं की, एक महिन्याच्या आत आम्ही अपघातासंबंधीचा अहवाल प्रसिद्ध करू. अपघाताला आज एक महिना होत आहे. आज आणि उद्या आम्ही अहवाल येतो की नाही? याची वाट पाहणार आहोत. जर थातूरमातूर अहवाल दिला तर महाराष्ट्राची जनता यांना सोडणार नाही”, असा इशारा रोहित पवार यांनी दिला.
“मी शब्दाशब्दाला ‘का बे’, ‘साल्या’ असं बोलायचो, पण…”, फडणवीसांच्या वक्तव्याने हशा
मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने आज विधानभवनात विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमानिमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली भूमिका मांडली. विधानसभेचं कामकाज सुरू होण्याआधी सकाळी विधानभवनात ‘जावे विनोदाच्या गावा’ या नावाच्या कार्यक्रमात विविध प्रकारची विनोदी शैलीतील सादरीकरणे पार पडली. यावेळी बोलताना फडणवीसांनी त्यांच्या शैलीत केलेल्या कोट्यांमुळे चांगलाच हशा पिकला. फडणवीस म्हणाले की, “आपली मराठी भाषा दर ५-७ किलोमीटरवर बदलते. मी मुंबईत आलो तेव्हा सुरुवातीच्या काळात मला फार अडचणी होत्या. कारण शब्दाशब्दाला ‘का बे’, ‘साल्या’ असं ‘सांस्कृतिक’ मराठी मी बोलायचो. पण इथे आल्यावर मला लक्षात आलं की ही संस्कृती मुंबईला पटण्यासारखी नाही. पुण्यात तर आपल्याला बहिष्कृतच केलं जाईल असं मला वाटलं. त्यामुळे मी हळूहळू स्वत:ला चांगलं मराठी कसं बोलता येईल या दिशेनं नेलं. प्रत्येक भागातल्या मराठीचा आपला गोडवा आपल्याला कायम ठेवायचा आहे”, असं मुख्यमंत्री म्हणाले.
“मराठी माध्यमाच्या २५५ शाळा बंद पडल्या”, मराठी गौरव दिनी सुप्रिया सुळेंची पोस्ट
“ज्ञानपीठ विजेते साहित्यिक कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त आज आपण ‘मराठी भाषा गौरव दिन’ साजरा करीत आहोत. केंद्र सरकारने मराठीला ‘अभिजात भाषा’ दर्जा बहाल केला, ही निश्चितच आनंदाची बाब. दुसरीकडे मात्र राज्यातील मराठी माध्यमाच्या सुमारे २५५ शाळा बंद पडल्याची माहिती स्वतः मंत्री महोदयांनी विधिमंडळात दिली. पालकांचा कल इंग्रजी माध्यमाकडे वाढत असल्याने या शाळांवर ही स्थिती ओढावली. थोडक्यात मराठी भाषेतून आपल्या मुलांना शिक्षण घ्यावे की नको याबाबत पालक साशंक दिसतात. आपल्या मातृभाषेच्या बाबतीत निर्माण झालेली ही परिस्थिती अतिशय चिंताजनक आहे. म्हणूनच मराठी शाळांची गुणवत्ता, शैक्षणिक दर्जा याबाबत नव्या दृष्टिकोनातून विचार करुन मराठी शाळा अधिक सक्षम करण्याची गरज अधोरेखित होत आहे. जर मराठी शाळाच राहिल्या नाहीत तर आपण भविष्यात मराठी भाषा गौरव दिन काय साजरा करणार?”, असं सुप्रिया सुळेंनी म्हटलं आहे.
‘केजरीवाल दोषी नसतील म्हणून निर्दोष मुक्तता’: अण्णा हजारे
दिल्लीतील कथित मद्य घोटाळा प्रकरणात माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. यामुळे केजरीवाल आणि सिसोदिया यांना मोठा दिलासा मिळाला. दरम्यान, अरविंद केजरीवाल यांची निर्दोष मुक्तता झाल्यानंतर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी मोजक्या शब्दांत प्रतिक्रिया दिली. अण्णा हजारे म्हणाले की, “अरविंद केजरीवाल दोषी नसतील म्हणून निर्दोष मुक्तता केली. न्यायव्यवस्था सर्वोच्च आहे, न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचा आदर करायला हवा.”
