Maharashtra Politics: “बाळासाहेब ठाकरे यांच्या अटकेसाठी छगन भुजबळ यांचा दबाव होता”, असा के. पी. रघुवंशी यांच्या पुस्तकात करण्यात आलेला दावा भुजबळांनी खोडून काढला आहे. अटकेसाठी दबाव नसल्याचे स्पष्ट करताना पोलिसांनीच त्यांच्याकडे फाईल दिल्याचे सांगितले. भाजप नेते रावसाहेबर दानवे यांनी उद्धव ठाकरे आणि राहुल गांधी यांच्यावर टीका करताना दोघांचाही रंग हिरवा असल्याचे म्हटले. उद्धव ठाकरे यांनी विचारधारा सोडल्याने त्यांना लोकांनी नाकारले असेही दानवे म्हणाले. तसेच, जरांगे पाटील यांनी त्यांना रोज धमक्या येत असल्याचा खळबळजनक आरोप केला आहे. जाणून घेऊया राज्यातील आजची पाच मोठी राजकीय विधाने.

अजित पवार अपघात; एआयबीच्या अहवालावर छगन भुजबळांची शंका

“अपघात होण्यापूर्वी विमान झाडावर आदळले नाही”, असे म्हणत छगन भुजबळ यांनी एआयबीच्या अहवालावर शंका उपस्थित केली. या अहवालात विमान झाडाला धडकल्याचे म्हटले आहे. ‘सीसीटीव्ही मध्ये किंवा याठिकाणी उपस्थित असलेल्या नागरिकांना देखील विमान झाडाला धडकल्याचे दिसले नाही’, असे भुजबळ म्हणाले. याशिवाय बाळासाहेब ठाकरेंच्या अटकेसाठी दबाव टाकला नसल्याचेही भुजबळांनी स्पष्ट करत के. पी. रघुवंशी यांच्या पुस्तकातील दावा खोडून काढला. पोलिसांनीच माझ्याकडे फाईल पाठवल्याचेही भुजबळ माध्यमांशी बोलताना म्हणाले. 

राहुल गांधी – उद्धव ठाकरेंमध्ये फरक नाही, दोघेही हिरवेच – रावसाहेब दानवे

राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे यांच्या रंगात फार फरक उरला नाही, दोघेही हिरवेच, अशा शब्दात भाजपनेते रावसाहेब दानवे यांनी टीका केली. यांच्याकडे भगवा रंग उरला नाही त्यामुळे लोकांनीही त्यांना नाकारले असेही दानवे म्हणाले. उद्धव ठाकरे हिंदुत्वाचा आव आणतात असा टोला दानवेंनी लगावला. भाजपा आणि शिवसेनेची विचारधारा एकच होती, म्हणून एकत्र होतो. पण, उद्धव ठाकरेंनी विचारधारा सोडली म्हणून लोकांनी त्यांना नाकारले, असे दानवे म्हणाले. 

“बिबट नाही सांभाळता येत; वाघाच्या कुठे नादी लागता…”, शिंदेंचा वनमंत्री नाईकांना टोला

‘बिबट नाही सांभाळता येत वाघाच्या कुठे नादी लगता तुम्ही…’, अशा शब्दात श्रीकांत शिंदे यांनी गणेश नाईक यांच्यावरच टीका केली. राज्यातील वनविभागात नेमका काय प्रकार सुरू आहे याबाबत आपल्या कानावर आलं असून, त्यावर आपण फार काही बोलत नाही. मात्र, वनखात्याला पैसे कमी पडत असल्यामुळे आता सागाची झाड तोडायची म्हणतात. त्यातुन पैसे घ्यायचे म्हणतात. याची माहिती मिळवणे गरजेचे असल्याचे शिंदे म्हणाले. नवी मुंबई महापालिका जिंकली म्हणून काहीजण फुशारक्या मारत आहेत त्यांनी निसटता विजय मिळवला हे लक्षात ठेवावं, ‘हम हम है. बाकी सब पानी कम है’ अशा शब्दांत त्यांनी नाईकांना आव्हान दिलं.

मला आणि माझ्या कुटुंबाला कधी मारतील माहिती नाही? मनोज जरांगेंचा खळबळजनक आरोप

मला आणि माझ्या कुटुंबाला कधी मारतील हे माहिती नाही? असा खळबळजनक आरोप मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. तसेच, समोर ये धमक्या देऊ नकोस, असे म्हणत जरांगे पाटील यांनी गोविंद फड यांना प्रत्युत्तर दिले आहे. धनंजय मुंडे यांच्या केसाला जरी धक्का लागल्यास खेळ खल्लास असा इशारा फड यांनी दिला होता. जीव असेपर्यंत मराठा समाजासाठी लढणार असल्याचेही जरांगे पाटील यावेळी म्हणाले. मी मरणाला घाबरत नाही, असेही पाटील म्हणाले.

विरोधात बसू पण, शिवसेनेत फूट पडू देणार नाही; प्रताप सरनाईक

गरज पडल्यास विरोधात बसू पण, शिवसेनेत फूड पडू देणार नाही, अशी भूमिका मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केली. धारशिव जिल्हा परिषद आणि पंचायत समितीतील सत्ता स्थापनेवर समोर येणाऱ्या विविध वृत्तांबाबत सरनाईक यांनी भूमिका स्पष्ट केली. काही लोकांकडून दिशाभूल करणाऱ्या बातम्या पसरवल्या जात असल्याचे सरनाईक म्हणाले. सत्ता महत्वाची असली तरी पक्षात फूट पडू देणार नाही, प्रसंगी विरोधात बसू असे सरनाईक म्हणाले.