Maharashtra Politics Top 5 Statements: बारामतीची पोटनिवडणूक लढण्याबाबत काँग्रेस ठाम असल्याचे वक्तव्य प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केले आहे. तर, ही पोटनिवडणूक बिनविरोध करण्याची विनंती महाविकास आघाडीला करते, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या. दुसरीकडे अंजली दमानिया आणि सुषमा अंधारे यांनी अशोक खरातच्या कॉल डिलेल्स बाहेर काढल्या आहेत. यात रुपाली चाकणकर, एकनाथ शिंदे यांच्यासह कोणाला किती फोन करण्यात आले याची आकडेवारी देत विविध आरोप केले आहेत. यासह प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष व माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्यावरोधात हत्येचा कट रचल्याच्या आरोपाखाली गुन्हा नोंद करण्यात आला आहे. यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जाणून घेऊया राज्यात आजच्या दिवसातील पाच महत्वाची राजकीय विधाने.

काँग्रेस बारामतीची पोटनिवडणूक लढणार – हर्षवर्धन सपकाळ

अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध करण्याचे आवाहन भाजप व मित्रपक्षांकडून केले जात असले तरी काँग्रेसने बारामतीसह राहुरीची निवडणूक लढणार असल्याचे जाहीर केले आहे. “बारामती आणि राहुरी या दोन्ही ठिकाणांवरुन आमच्याकडे उमेदवारी अर्ज प्राप्त झाले आहेत. बारामतीमधून सहा अर्ज तर राहुरीतून चार अर्ज आले आहेत. सर्व उमेदवारांशी ऑनलाईन पद्धतीने मुलाखती पार पडल्या. दोन्ही ठिकाणीचे कार्यकर्ते निवडणूक लढण्यासाठी उत्सुक आहेत. त्या अनुषंगाने येत्या दोन दिवसांत निर्णय घेतला जाईल. राष्ट्रवादी (शरद पवार) निवडणूक लढण्यास तयार नसेल तर काँग्रेस तयार आहे. ही काँग्रेसची भूमिका असून, आम्ही त्यावर ठाम आहोत”, असे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले. दरम्यान, बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करावी अशी विनंती महाविकास आघाडीला असेल, असे खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या.

खरातचे रुपाली चाकणकरांना १७७ कॉल; दमानिया, अंधारे यांचा आरोप

“रुपाली चाकणकर यांचे एकूण १७७ कॉल अशोक खरातला झाले आहेत. तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे तब्बल १७ कॉल्स अशोक खरतला झाले होते. या १७ कॉल्सपैकी १० इनकमिंग आणि ७ आऊटगोईंग कॉल होते. या कॉलमध्ये सर्वाधिक वेळ २१ मिनिटे त्यांच्या संभाषण झालं. चंद्रकांत पाटील यांचे खरातला ८ कॉल, तर सुनील तटकरे यांचे ८ कॉल झाले आहेत आणि आशिष शेलार यांचाही एक कॉल आहे,” असा आरोप अंजली दमानिया यांनी केला आहे. सुषमा अंधारे यांनी देखील याबाबत फेसबुक पोस्ट केली आहे. खरातचा सर्वाधिक रूपाली चाकणकर यांच्यासोबत झाला आहे. ३३ हजार पेक्षा जास्त सेकंद चाकणकर यांच्यासोबत बोलणं झालं”, असं सुषमा अंधारे यांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटलंय.

हत्येचा कट रचणे हा आमचा धंदा नाही – बच्चू कडू

भाजपचे आमदार प्रवीण तायडे यांचे चुलत बंधू अभिजीत तायडे यांनी प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष व माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्यावरोधात तक्रार दाखल केली आहे. हत्येचा कट रचल्याच्या आरोपाखाली कडू यांच्याविरोधात चांदूर बाजार येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. यावर बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “आम्ही रक्त देणारे आहोत कोणाच जीव घेणारे नाही. हत्येचा कट रचणे हा आमचा धंदा नाही”, अशा शब्दात प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी आरोपांचे खंडन केले. “मला बदनाम करण्याचा हा प्रयत्न असून कोणाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न झाला असेल तर आम्ही स्वत:हून अटक होऊ”, असे बच्चू कडू म्हणाले.

खरात सुटायला नको अशी राज्यातील जनतेची इच्छा – मंत्री संजय शिरसाट

“भोंदूबाबा अशोक खरात कोणत्याही प्रकारे सुटायला नको अशी राज्यातील जनतेची इच्छा आहे. तसेच, त्याला सहकार्य करणाऱ्यांवरही कारवाई व्हावी अशी मागणी होतेय”, असे न्याय व विशेष सहाय्य मंत्री संजय शिरसाट म्हणाले. अंजयी दमानिया खरातच्या फोन कॉल्सच्या आरोपाबाबत विचारले असता त्यांनी कोणाकडे काही माहिती असल्यास ती पोलिसांना द्यावी, यामुळे तपासात सहकार्य होईल, असे वक्तव्य केले. कोणाच्या आरोपांना माझा काही आक्षेप नाही, असेही त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. “खरात प्रकरणाचा वेगाने सुरु आहे. एसआयटी, सीआयडी, पोलिस यंत्रणा याचा तपास करत आहे. याप्रकरणात दोषी असणाऱ्यांना नक्की शिक्षा होईल अशी ग्वाही स्वत: मुख्यमंत्र्यांनी दिली आहे”, असे मंत्री शिरसाट म्हणाले.

लगेच आशिष शेलार, चंद्रकांत पाटील यांना दोषी ठरवता येत नाही – असे दरेकर

अंजली दमानिया यांनी केलेल्या कॉल रेकॉर्डबाबत बोलताना प्रवीण दरेकर यांनी त्यांच्या दाव्यातील सत्यतेबाबत प्रश्न उपस्थित केला. “कॉल रेकॉर्ड, सीडीआर पोलिसांकडे असतात त्यामुळे त्यांनी कशाच्या आधारे हा दावा केला याबाबत प्रश्न आहे. सतत एखाद्याशी बोलणं झालं असेल तर समजू शकतो पण, १-२ फोन झाले असतील तर लगेच शेलार असतील किंवा चंद्रकांत पाटील यांना दोषी ठरवता येत नाही”, असे दरेकर म्हणाले. “अशोक खरात प्रकरणाचा सध्या तपास सुरु आहे. या प्रकरणाचे धागेदोरे जिथपर्यंत जातील तिथपर्यंत तपास केला जाईल”, असे आमदार प्रविण दरेकर म्हणाले.