Maharashtra Politics Top 5 Statements: रोहित पवार यांनी राष्ट्रवादी पक्षात फूट पाडण्यासाठी, पक्षाला बदनाम करण्यासाठी एका एजन्सीला पाच कोटी रुपयांचे पॅकेज दिल्याचा आरोप अजित पवार गटाचे नेते सूरज चव्हाण यांनी केला आहे. रोहित पवार सेलवरुन जनतेची दिशाभूल करत आहेत, असेही चव्हाण म्हणाले. अशोक खरातच्या मुलीच्या लग्नात गेलेल्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. तर, खरातच्या ईशान्येश्वर मंदिराला भाजपाचे मंत्री जयकुमार रावल यांनी त्याला पर्यटनाचा दर्जा दिल्याचा आरोप अंधारे यांनी केला आहे. तसेच या प्रकरणात मंत्री रावल यांची चौकशी व्हावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे. जाणून घेऊया महाराष्ट्रात दिवसभरात गाजलेली पाच विधाने.
राष्ट्रवादीत फूट पाडण्यासाठी रोहित पवारांनी पाच कोटी दिले – सूरज चव्हाण
“आमदार रोहित पवार यांनी राष्ट्रवादी पक्षात फूट पाडण्यासाठी, पक्षाला बदनाम करण्यासाठी एका एजन्सीला पाच कोटी रुपयांचे पॅकेज दिले आहे”, असा आरोप नेते सूरज चव्हाण यांनी केला. पक्ष स्थापन झाल्यापासून फ्रंटलचे पाच विभाग आहेत आणि सेल वाढवता येतात. यात फादर बॉडी, महिला काँग्रेस, युवक राष्ट्रवादी काँग्रेस, विद्यार्थी आणि सेवा दल असे पाच विभाग असल्याचे चव्हाण यांनी मुंबईत पत्रकार परिषदेत माहिती दिली. “ओबीसी सेल, सामाजिक न्याय आणि अल्पसंख्याक सेल फ्रंटलमधून वगळण्यात आल्याचा दावा करण्यात आला पण, ते विभाग फ्रंटलमध्ये कधीच नव्हते तर सेल म्हणून कार्यरत होते”, असेही चव्हाण यांनी स्पष्ट केले. रोहित पवार सेलवरुन जनतेची दिशाभूल करत आहेत, असा आरोपही चव्हाण यांनी केला. “पवारांनी आमचा पक्ष आणि नेत्यांवर लक्ष ठेवण्यासाठी स्वत:च्या पक्षाकडे लक्ष द्यावे. तसेच, यापुढे पक्षावर आरोप केल्यास जशास तसे उत्तर दिले जाईल”, असा इशाराही चव्हाण यांनी दिला.
एका चुकीच्या बाईमुळे अख्या राजकारणाला काळा डाग बसवला – रुपाली ठोंबरे पाटील
रुपाली चाकणकरांना समन्स बजावले असेल तर त्यांना हजर राहवेच लागेल तिथे तोरा चालत नाही. कुठून त्यांना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी बसवून आयोगाचे वाटोळे करुन घेतले की काय? अशी भावना मनात येते, असे रुपाली ठोंबरे पाटील म्हणाल्या. रुपाली चाकणकर यांच्या पतीविरोधात रायगडमध्ये जमिनी गैरव्यवहार संबधित एका भाजप पदाधिकाऱ्याने तक्रार दाखल केली आहे. याबाबत बोलताना ठोंबरे पाटील यांनी याबाबत चाकणकर यांचे पती नीलेश चाकणकर यांचीही चौकशी होईल, असे मत मांडले. रुपाली चाकणकर यांच्या चुकीमुळे महिला आयोगाची बदनामी झाली. राज्य सरकार आणि पक्षाचीही बदनामी झाली. एका चुकीच्या बाईमुळे अख्या राजकारणाला काळा डाग बसवला, अशी टीका रुपाली ठोंबरे पाटील यांनी केली.
खरात प्रकरणाची न्यायालयाच्या माध्यमातून चौकशी करावी – विजय वडेट्टीवार
अशोक खरातच्या मुलीच्या लग्नात गेलेल्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. खरातला एक सुरात समर्थन देण्यासाठी ते लग्नात गेले होते, असेही वडेट्टीवार म्हणाले. खरातच्या मुलीच्या लग्नपत्रिकेत प्रमुख पाहुण्यांच्या यादीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री चंद्रकांतदादा पाटील, मंत्री आशिष शेलार, महिला आयोगाच्या तत्कालीन अध्यक्षा रुपाली चाकणकर, ठाकरे गटाचे नेते मिलिंद नार्वेकर आणि माजी शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या नावांचा उल्लेख आहे. व़डेट्टीवार यांनी खरात प्रकरणाची सीबीआय अथवा न्यायालयाच्या माध्यमातून चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली. एसआयटी मार्फेत ही योग्य पद्धतीने चौकशी होणार नाही, अशी शंकाही त्यांनी उपस्थित केली.
भाजपाचे जयकुमार रावल यांचीही चौकशी करा – सुषमा अंधारे
अशोक खरात प्रकरण राज्यभरात गाजत असताना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी मंगळवारी मुंबईत जाहीर पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेतून भाजपासह शिवसेना शिंदे गटातील काही नेत्यांवर टीकेची झोड उठवली. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना अशोक खरातच्या शिवनिका संस्थानच्या संस्थेसाठी पाण्याची मंजुरी देण्यात आली होती, त्यावरून भाजपासह शिंदे गटातील नेत्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती. त्यावरून अंधारे यांनी भाजपाला सडेतोड उत्तर दिले. खरातच्या ईशान्येश्वर मंदिराला सरकारने कोणत्या निकषावर पर्यटन दर्जा दिला? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. संबंधित मंदिर हे नुकतेच तयार झाले असून भाजपाचे मंत्री जयकुमार रावल यांनी त्याला पर्यटनाचा दर्जा दिल्याचा आरोप अंधारे यांनी केला. तसेच या प्रकरणात मंत्री रावल यांची चौकशी व्हावी, अशी मागणीही त्यांनी केली.
खरातने अजित पवारांच्या फोटोवर फुल्या मारल्या होत्या – रोहित पवार
अशोक खरातने अजित पवार यांच्या फोटोवर फुल्या मारल्या होत्या, असा खळबळजनक दावा रोहित पवार यांनी केला आहे. भोंदू अशोक खरात याच्याकडे फोटोवर फुल्या मारण्याची पद्धत होती. त्यानुसार अजितदादा यांच्यासह महाराष्ट्रातल्या एका अत्यंत बड्या नेत्याच्या फोटोवर फुल्या मारण्यात आल्याचं समजतंय, असा खळबळजनक दावा आमदार रोहित पवार यांनी केला आहे. या भोंदू खरातने कुणाच्या सांगण्यावरून फोटोवर फुल्या मारण्याचा जादूटोणा केला? ज्यांच्या सांगण्यावरून जादूटोणा केला त्यांचा हेतू काय होता? हेही समोर येणं गरजेचं आहे, असे पवारांनी म्हटलंय. हे प्रकरण जेवढं भयावह आहे तेवढंच महाराष्ट्राच्या भविष्यालाही घातक आहे. त्यामुळं या भोंदूबाबाच्या माध्यमातून जादूटोणा करणाऱ्या अंधभक्तांचे खरे चेहरे समोर यायलाच हवेत, अशी पोस्ट रोहित पवारांनी एक्सवर केली आहे.
