Maharashtra Politics Daily Updates: अजित पवार विमान अपघात प्रकरणात महाराष्ट्रात एफआयआरही होत नसेल तर महाराष्ट्राचं दुर्दैव आहे, अशा शब्दात राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी नाराजी व्यक्त केली. तर, “महाराणी ताराराणी जैन होत्या”, असे वक्तव्य करणाऱ्या जैन मुनी आचार्य नयन पद्मसागर यांचा समाचार घेताना संजय राऊत यांनी शिवरायांचे राज्य इतके नपुसंक का झाले आहे? असा शब्दात संताप व्यक्त केला. ताराराणीचे असे धर्मांतर सुरू असताना मरहट्टे म्हणून मिरवणारे सत्ताधारी गप्प बसले आहेत, का? कशासाठी? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. यासह राज्यात आज दिवसभरात कोणती पाच महत्वाची विधाने गाजली हे जाणून घेऊयात.

अजितदादा प्रकरणात FIR होत नसेल तर महाराष्ट्राचं दुर्दैव – शिंदे

“अशोक खरातने अजित पवार यांच्या फोटोवर फुल्या मारल्याची माहिती समोर आली होती. अजित पवार विमान अपघात प्रकरणात महाराष्ट्रात एफआयआरही होत नसेल तर महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. मुख्यमंत्री फडणवीस म्हणातात एसआयटीची चौकशी सुरु आहे. पण, काय कारवाई झाली? ब्लॅक बॉक्सचं काय झाल? याची माहिती दिली जात नाही. त्यामुळे रोहित पवार यांनी केलेल्या आरोपांमध्ये काही तथ्य आहे का? याचा तपास करणे आवश्यक आहे”, असे राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे म्हणाले. अशोक खरात प्रकरणाचा तपास उत्तम अधिकारी करत आहेत, अशी माहिती आहे. त्यामुळे याबाबत तपास करुन सत्य समोर आणतील, असा विश्वास शिंदेंनी व्यक्त केला.

शिवरायांचे राज्य इतके नपुसंक का झाले आहे? संजय राऊत

जैन मुनी आचार्य नयन पद्मसागर यांनी “महाराणी ताराराणी जैन होत्या”, असे वक्तव्य केल्याने महाराष्ट्रात राजकीय आणि सामाजिक वर्तुळात वादंग निर्माण झाला. यावरुन शिवसेना नेते (उबाठा) संजय राऊत यांनी कठोर शब्दात निषेध नोंदवला. शिवरायांचे राज्य इतके नपुसंक का झाले आहे? असा शब्दात त्यांनी संताप व्यक्त केला. “काय सुरू आहे महाराष्ट्रात? एक जैन मुनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समोर सांगतात की महाराणी ताराराणी जैन धर्मीय होत्या! औरंगजेबाशी झुंज देणाऱ्या वीरांगना ताराराणींचे धर्मांतर करण्याचा अधिकार याना दिला कोणी?,” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. “ताराराणी शिवरायांचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या कन्या होत्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या धाकल्या सुनबाई म्हणजे छत्रपती राजाराम महाराजांच्या धर्मपत्नी होत्या! ताराराणीचे असे धर्मांतर सुरू असताना मरहट्टे म्हणून मिरवणारे सत्ताधारी गप्प बसले आहेत, का? कशासाठी? उद्या हे सांगतील आमच्या मुंबई महाराष्ट्रासाठी मेलेले १०६ हुतात्मे सुद्धा जैन होते! यावर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री टाळ्या वाजवतील!”, असे राऊत यांनी एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले.

घशाची समस्या दूर झाली, गुरुदेवांच्या आशीर्वादामुळं चमत्कार – मुंबईच्या महापौर

राज्यात भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण गाजत असताना मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. गुरुदेवांच्या आशीर्वादामुळे माझ्या घशाची समस्या दूर झाल्याचा अजब दावा रितू तावडे यांनी केला. बोरिवलीत महावीर जयंतीच्या कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले. यावरुन टीका झाल्यानंतर तावडे यांनी पत्रकार परिषद घेऊन स्पष्टीकरण दिले. “माझ्या विधानाचा विपर्यास करण्यात आला, हा विषय अंधश्रद्धेचा नसून माझ्या वैयक्तिक श्रद्धेचा आहे. संजय राऊत यांच्या जिभेला हाड नाही, ते कोणत्याही विषयावर तथ्यहीन बोलत असतात”, अशा शब्दात तावडे यांनी संताप व्यक्त केला. ओमच्या उच्चारामुळे माझा आवाज व्यवस्थित झाला असेही त्यांनी पुढे स्पष्ट केले. पण, ओमचा उल्लेख करण्यास विसरल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

खरात प्रकरण राज्यातील राजकीय नेत्यांसाठी धडा – आदिती तटकरे

राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी अशोक खरात प्रकरणावर भाष्य करताना हे प्रकरण घृणास्पद आणि निंदनीय असल्याचे मत व्यक्त केले. “या प्रकरणात कोणीही त्याची बाजू घेण्याचा किंवा समर्थन करण्याचा प्रश्नच नाही. खरात प्रकरण राज्यातील राजकीय नेत्यांसाठी एक धडा आहे”, असेही त्या म्हणाल्या. तसेच या प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भूमिका आहे तीच माझी भूमिका असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. खरात प्रकरणावर भूमिका घेत नसल्याचे सांगताना असे म्हणणे चुकीचे असल्याचे तटकरे म्हणाल्या. “अशोक खरातबाबत माहिती असती तर कोणताही नेता त्याला भेटायला गेला नसता”, असेही तटकरे म्हणाल्या.

रुपाली चाकणकर यांची चौकशी होणे गरजेची – सुषमा अंधारे

अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर यांची चौकशी होणे गरजेची आहे, अशी मागणी शिवसेना उबाठा गटाच्या नेत्या सुषमा अंधारे म्हणाल्या. चाकणकर यांचे महिला राज्य आयोगाच्या अध्यक्ष आणि राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्षपदावरुन राजीनामा झाला आहे पण, त्यांची चौकशी अद्याप झाली नसल्याचे त्यांनी म्हटले. खरातच्या पत्नीच्या नावावर अनेक आर्थिक व्यवहार असल्याचा आरोपही अंधारे यांनी यावेळी केला. भांडे या अधिकाऱ्याचे निलंबन आणि चौकशी होण्याची गरज असल्याचेही अंधारे म्हणाल्या.