“राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी ही राज्यासाठी महाविनाश आघाडी ठरली असून, लुटा आणि वाटून खा एवढाच त्यांचा एक कलमी किमान-समान कार्यक्रम आहे. परंतु, भाजपा या आघाडीचे लुटीचे स्वप्न पूर्ण होऊ देणार नाही”, असा इशारा भाजपाचे महाराष्ट्राचे प्रभारी सी.टी. रवि यांनी दिला. भाजपा प्रदेश कार्यकारिणी बैठकीच्या उद्घाटन सत्रात ते बोलत होते.

कार्यक्रमात बोलताना रवि म्हणाले, “महाविकास आघाडी सरकारच्या काळात राज्यात भ्रष्टाचार साथीसारखा वाढत आहे, हे दुर्दैव आहे. राज्यात भ्रष्टाचाराचे तांडव चालू आहे. मंत्र्यांची अनेक प्रकरणे उघड झाली. दोन जणांना राजीनामा द्यावा लागला. महाराष्ट्राला लुटणे एवढे एकच काम चालू आहे. ही आघाडी राज्याला विनाशाकडे नेत आहे. त्यांचा लुटा आणि वाटून खा एवढा एकच किमान समान कार्यक्रम आहे,” अशी टीका त्यांनी केली.

हेही वाचा- “सत्ता किती काळ टिकेल, याचा भरवसा नसल्याने ठाकरे सरकारचा सगळा भर कमाईवर”

“छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेणाऱ्या शिवसेनेने हिंदुत्वविरोधी काँग्रेसशी हातमिळवणी केली आहे. शिवसेना आपले ध्येय विसरली असून, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न उद्ध्वस्त केले आहे. भाजपाने युतीमध्ये निवडणूक जिंकली तरी भाजपाला विरोधी पक्षात बसावे लागले. तथापि, भाजपाला जनतेच्या मनात स्थान आहे. पंढरपूर विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीत जनतेमधील असंतोष दिसला आणि लोकांनी भाजपाला विजयी केले. लोकांच्या सरकारवरील नाराजीचे आक्रोशात रुपांतर होत आहे,” असा दावा त्यांनी केला.

हेही वाचा- …तरी महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री गप्प; पंकजा मुंडेंनी सुनावलं

“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारचा जनतेला आधार आहे. मोदीजींच्या नेतृत्वाखाली भारत करोनावर विजय मिळवेल. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या नेतृत्वात पक्षाचा ‘सेवा ही संघटन’ उपक्रम चालू आहे. भाजपाच्या कार्यकर्त्यांनी गेले पंधरा महिने करोनाच्या साथीत सातत्याने लोकांची सेवा केली आहे,” असंही ते यावेळी म्हणाले.