अलिबाग – सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांना दोन वर्षात शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) उत्तीर्ण होणे बंधनकारक केल्यानंतर राज्यात शिक्षक संवर्गातून पदोन्नतीने पदे भरण्याच्या प्रक्रियेत शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण असणे अनिवार्य करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. यात इतर संवर्गाप्रमाणे सेवाज्येष्ठ शिक्षकांनाही गुणांमध्ये सवलत द्यावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक परिषदेने केली आहे.
महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभागाच्या वतीने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष नंदकुमार बेडसे यांची शिक्षक परिषदेचे राज्याध्यक्ष राजेश सुर्वे यांच्या नेतृत्वाखाली घेतली भेट घेण्यात आली. या भेटीत झालेल्या चर्चेत सेवाज्येष्ठ शिक्षकांच्या सवलतीचा मुद्दा अधोरेखित केला. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी शिक्षण संस्थातील शिक्षक भरतीसाठी पवित्र प्रणालीमार्फत शिक्षक पात्रता परीक्षा सीटीईटी टीईटी घेण्यात येते. ही परीक्षा उत्तीर्ण होण्याकरिता अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती, विमुक्त व भटक्या जमाती व इतर मागासवर्ग व दिव्यांग यांच्यासाठी पाच टक्के गुणाची सवलत म्हणजेच उत्तीर्ण होण्यासाठी ५५ टक्के गुण असणे आवश्यक आहे तसेच माजी सैनिक, शहीद सैनिकाच्या पत्नी व त्यांचे कुटुंबीय यांना 15 टक्के गुणांची सवलत देण्यात येते .
याप्रमाणेच राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी शिक्षण संस्था मधील ज्या शिक्षकांची सेवा १५ वर्षे व त्यापेक्षा जास्त सेवा झालेली आहे अशा सेवा जेष्ठ शिक्षकांच्या वयाचा, मानसिकतेचा, अभ्यासक्रमाचा विचार करून उत्तीर्ण होण्यास १५ टक्के गुणाची सवलत देण्यात यावी म्हणजे सीटीईटी, टीईटी परीक्षा उत्तीर्ण होण्यास किमान ४५ टक्के गुण करण्यात यावी अशी सवलत दिल्यास कार्यरत शिक्षकांना ही परीक्षा उत्तीर्ण करू शकतील, अशी मागणी यावेळी करण्यात आली. या संदर्भात महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष नंदकुमार बेडसे यांनी सकारात्मक भूमिका घेतली असून उचित कार्यवाही करण्यात येईल असे आश्वासन दिल्याचे राजेश सुर्वे यांनी सांगितले.
शिष्टमंडळामध्ये महाराष्ट्र राज्य पदवीधर शिक्षक संघटनेचे राज्याध्यक्ष मनोज मराठे, अलिबाग शिक्षक पतपेढीचे विद्यमान चेअरमन निलेश साळवी शिक्षक परिषदेचे मुरुड तालुका उपाध्यक्ष हेमकांत गोयजी यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

