मुंबई: राज्यातील कारागृहांत २६ हजारांवर कैदी विविध गुन्ह्यांत शिक्षा भोगत आहेत. त्याच कैद्यांच्या हाती कुदळ, फावडा यासारखी अवजारे देऊन त्यांच्या हातून शेती फुलवली जात आहे. नाशिक रोड, येरवडा, पैठण, विसापूर अशा विविध ३१ कारागृहांतील या कैद्यांनी ५९६ हेक्टर क्षेत्र लागवडीखाली आणले असून भात, ज्वारी, बाजरी, भुईमूग, सोयाबीनबरोबरच कांदा, मूळा, पालक, टोमॅटोचीही शेती या तुरुंगांमध्ये बहरली आहे. या कैद्यांनी वातावरणाच्या आव्हानांनाही तोंड दिले असून २०२५-२६ साली पावसाने केलेल्या नुकसानींनंतरही ५.४६ कोटींचे उत्पादन शेतीतून मिळाले आहे.

राज्यातील ३१ कारागृंहांत शेती केली जाते. शेतीसाठी एकूण ५९६.५९ हेक्टर क्षेत्र उपलब्ध असून ३३०.८८ हेक्टर क्षेत्रावर वांगी, कोबी, मिरची, फ्लॉवर, कांदा, वाटाणा, पालक, टोमॅटो, बटाटा, मेथी, राजगिरा, मुळा यांसारख्या पिकांबरोबरच हरभार, तूर यासारखी कडधान्ये तसेच गहू, भात, ज्वारी, बाजरी यासारखी अन्नधान्य पिके आणि भूईमूग, मोहरी, सोयाबीन यांसारखी गळीतधान्य पिकवली जातात. उर्वरित १८२.६५ हेक्टर क्षेत्रावर वनीकरण व फळपिकांची लागवड करण्यात आलेली आहे.

शेतीबरोबरच कैद्यांकडून सामाजिक वनीकरणही केले जात आहे. २०२५-२६मध्ये या कैद्यांच्या हातून १ लाख ८० हजार २६५ वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. पैठण खुल्या कारागृहात १५८.७७ हेक्टर क्षेत्र, येरवडा खुल्या कारागृहातील १०३ हेक्टर तर विसापूर खुल्या कारागृहातील ४४.२६ हेक्टर क्षेत्रात शेती केली जात आहे.

सेंद्रीय शेती

तुरुंगांमध्ये जैविक शेतीला (सेंद्रीय) प्राधान्य देण्यात आले असून अधिकाधिक भर हा जैविक खतांवरच दिला जात आहे. या पद्धतीमुळे रासायनिक खतांचा वापर २० टक्क्यांखाली आला असून ८० टक्के शेती ही जैविक शेती आहे. यातून या कैद्यांनी अन्य शेतकऱ्यांसाठीही एक उदाहरण घालून दिले आहे.

प्रयोगशील शेतीला प्रधान्य

येरवडा तुरुंगात ‘दहा ड्रम थेअरी’च्या माध्यमातून वांगी, कोबी, मिरची, फ्लॉवर, कांदा, पालक, टोमॅटो, बटाटा, मेथी, मुळा इत्यादी भाजीपाल्याची लागवड करण्यात आली आहे. संपूर्णत: सेंद्रीय शेतीवर भर दिला जात असल्यामुळे रासायनिक खतांपेक्षा हा भाजीपाला अधिकाळ टिकाऊ ठरला आहे. त्याचप्रमाणे नाशिक रोड येथील खुल्या कारागृहात खरीप हंगामात महाबीजच्या माध्यमातून १२ हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन बीजोत्पादन करण्यात आले. यातून कारागृहाला ११ लाख रुपये उत्पन्न अपेक्षित आहे. त्यचाप्रमाणे गव्हाचेही बिजोत्पादन करण्यात आले असून यातून ९ लाख रुपये उत्पन्न अपेक्षित आहे. याच बीजाची तपासणीही २ हेक्टर क्षेत्रात करण्यात आली असून भर उन्हाळ्यात सोयाबीनची लागवड करण्यात आली. यातून २.२० लाख रुपये उत्पन्न मिळणार आहे.

वर्ष – उत्पन्न

२०२३-२४ – ४.५५ कोटी

२०२४-२५ – ५.५३ कोटी

२०२५ – २६ – ५.४६ कोटी (पावसाच्या नुकसानीनंतरही)

कैद्यांच्या मेहनतीला यांत्रिकीकरणाचे बळ

कैद्यांकडून केल्या जाणाऱ्या या मेहनतीला यांत्रिकीकरणाचीही जोड दिली जाणार आहे. यासांठी सरकारकडून ४० लाखांची शेतीची उपकरणे खरेदी केली जाणार आहेत. यामध्ये ३ ट्रॅक्टर, ७ रोटाव्हेटर, ६ कल्टिव्हेटर, २ सीडींग मशीन, ४ रिव्हर्सिबल प्लग ही उपकरणे घेतली जाणार असून यामुळे कारागृहांतील शेतीचे आधुनिकीकरण होणार आहे.

कारागृहांमध्ये राबविण्यात येणारी शेती ही केवळ उत्पादनापुरती मर्यादित नसून ती बंद्यांच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वपूर्ण साधन आहे. विविध पिकांची लागवड, आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा वापर तसेच कुक्कुटपालन, शेळीपालन, मत्स्यपालन, दुग्धव्यवसाय आणि सेंद्रिय खत निर्मिती यांसारख्या शेतीपूरक व्यवसायामुळे बंद्यांना प्रत्यक्ष कामाच्या माध्यमातून कौशल्याधारित प्रशिक्षण मिळते. यामुळे मुक्ततेनंतर या कौशल्यांचा उपयोग करून बंदी व्यक्ती शेती किंवा संबंधित व्यवसायात स्वत:च्या उपजीविकेचा मार्ग निवडू शकते. – राधिका रस्तोगी, प्रधान सचिव, गृहविभाग