मुंबई : राज्यातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी उपलब्ध झालेल्या एक हजार ४४० डॉक्टरांची येत्या काही दिवसांत नियुक्ती करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे आणखी ६०० डॉक्टरांच्या भरतीसाठी जाहिरात काढण्यात येत असून सुमारे २५० दंतचिकित्सकही लवकरच आरोग्य सेवेत दाखल होतील, अशी माहिती आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली.
सार्वजनिक आरोग्य विभागाच्या महिला आरोग्य समिती, जन आरोग्य समिती आणि रुग्णकल्याण समितीच्या सदस्यांशी आरोग्यमंत्र्यांनी ऑनलाइन ‘जन आरोग्य संवाद’ साधला. या माध्यमातून आतापर्यंत सहा लाखांहून अधिक नागरिकांशी संवाद साधण्यात आला आहे. आगामी काळात आणखी चार लाख नागरिकांशी संवाद साधण्यात येणार असून त्यांच्या आरोग्यविषयक समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
या संवादादरम्यान रुग्णालयांमध्ये डॉक्टर वेळेवर उपस्थित राहतात का, रुग्णांशी त्यांचा योग्य संवाद होतो का, आवश्यक आरोग्य सुविधा उपलब्ध आहेत का, तसेच आरोग्य समित्यांच्या बैठका नियमित होतात का, याची थेट माहिती घेण्यात आली. कागदावरील आकडेवारीपेक्षा प्रत्यक्ष रुग्णालयातील सेवा आणि नागरिकांचा अनुभव महत्त्वाचा असल्याचे आबिटकर यांनी सांगितले.
आरोग्य सेवांबाबतच्या तक्रारी नागरिकांना थेट प्रशासनापर्यंत पोहोचविता याव्यात, यासाठी लवकरच स्वतंत्र ऑनलाइन पोर्टल सुरू करण्यात येणार आहे. तक्रारींचे प्रभावीपणे निराकरण करण्यासाठी यंत्रणा उभारण्यात येणार आहे. स्थानिक बचत गटांच्या माध्यमातून रुग्णांना सकस व पौष्टिक आहार उपलब्ध करून देण्याची व्यवस्थाही करण्यात येणार आहे. माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आरोग्य विभागासाठी स्वतंत्र डिजिटल प्लॅटफॉर्म आणि अनुपस्थित डॉक्टरांच्या कामकाजाचा नियमित आढावा घेण्याची सूचना केली. या सूचनांची आबिटकर यांनी दखल घेतली आहे.‘निरोगी महाराष्ट्र-सुदृढ महाराष्ट्र’ या संकल्पनेत नागरिकांचा सहभाग वाढवून दर्जेदार आरोग्य सेवा देण्याचा विभागाचा प्रयत्न राहील, असे आबिटकर यांनी सांगितले.
