मुंबई : राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल, गरजू तसेच गंभीर आणि खर्चिक आजारांनी ग्रस्त रुग्णांना वैद्यकीय उपचारांसाठी आर्थिक मदत उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने सरकारने ‘महाराष्ट्र पब्लिक रिलीफ सोसायटी’ स्थापन करण्यास मान्यता दिली आहे. मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाच्या माध्यमातून कार्यरत असलेल्या मदतव्यवस्थेला आता कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (सीएसआर) निधीची जोड मिळणार आहे. नैसर्गिक आपत्तीग्रस्तांना मदत, सामुदायिक आरोग्य शिबिरे आणि वैद्यकीय संशोधनासाठीही या सोसायटीच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे.
मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली गेल्या एप्रिल रोजी झालेल्या मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाच्या बैठकीत रुग्णांच्या उपचारांसाठी सीएसआरच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून देण्याबाबत संकल्पपत्र तयार करण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार तयार करण्यात आलेल्या संकल्पपत्राला मान्यता मिळाल्यानंतर सोसायटीच्या स्थापनेचा प्रस्ताव विधी व न्याय विभागाच्या मान्यतेसाठी पाठविण्यात आला होता. त्यानंतर आता या सोसायटीच्या स्थापनेस आणि कार्यान्वित करण्यास सरकारने मंजुरी दिली आहे. या माध्यमातून हृदयरोग, कर्करोग, मूत्रपिंड निकामी होणे, मेंदू आणि मणक्याचे विकार यांसारख्या गंभीर आजारांवरील शस्त्रक्रिया आणि उपचारांसाठी अंशतः आर्थिक मदत दिली जाणार आहे. विद्यमान शासकीय योजनांचा किंवा खासगी विम्याचा लाभ मिळत नसलेल्या गरजू रुग्णांनाही आर्थिक, वैद्यकीय आणि इतर आवश्यक स्वरूपात सहाय्य करण्याची तरतूद करण्यात आली आहे. अपघातात मृत्यू किंवा जखमी झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांनाही, विद्यमान योजनांमध्ये समावेश नसलेल्या प्रकरणांत निकषांनुसार मदत दिली जाऊ शकते.
नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या नागरिकांना आर्थिक तसेच वस्तुरूपात मदत, दंगलग्रस्तांच्या कुटुंबीयांना सहाय्य, नक्षलवादी हल्ल्यांत मृत्यू किंवा जखमी झालेल्यांच्या अवलंबितांना मदत आणि दिव्यांगांसाठी कार्यरत संस्थांना संस्थात्मक सहाय्य देण्याचाही सोसायटीच्या उद्दिष्टांमध्ये समावेश आहे. याशिवाय गरजू नागरिकांना अन्न, वस्त्र आणि जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्याबरोबरच सामुदायिक आरोग्य शिबिरे आणि आरोग्यविषयक जनजागृती उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
मुख्यमंत्री अध्यक्ष; वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश
या सोसायटीचे मुख्य कार्यालय मंत्रालयातील मुख्यमंत्री सचिवालयाच्या सहाव्या मजल्यावर राहणार आहे. मुख्यमंत्री हे सोसायटीचे अध्यक्ष असतील. मुख्य सचिव, सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव अथवा प्रधान सचिव अथवा सचिव, मुख्यमंत्री यांचे सचिव, सार्वजनिक आरोग्य विभाग आणि वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव, वित्त विभागाने शिफारस केलेले संयुक्त किंवा उपसचिव तसेच मुख्यमंत्री सचिवालयातील लेखा व लेखापरीक्षण विभागाचे उपसंचालक अथवा सहाय्यक संचालक यांचा कार्यकारी मंडळात समावेश असेल. याशिवाय मुख्यमंत्र्यांच्या शिफारशीनुसार आणखी दोन सदस्यांचा समावेश केला जाणार आहे.
