अहिल्यानगर : राज्याच्या जलसंपदा विभागामार्फत १५ ते ३० एप्रिल या कालावधीत राज्यभर ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलव्यवस्थापन कृती पंधरवडा-२०२६’ साजरा करण्यात येणार आहे. जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे यांनी ही माहिती दिली.

सिंचन व बिगरसिंचनाची कामे वेळेत पूर्ण करणे, विभागाच्या कामकाजाचा आढावा जनतेसमोर ठेवणे व उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचा सत्कार करणे हा यामागील मुख्य उद्देश आहे. या पंधरवड्याची सुरुवात व समारोप प्रत्येक जिल्हास्तरावर संबंधित जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे.

या पंधरवड्यादरम्यान कालवा स्वच्छता मोहीम, पाणथळ जमीन मुक्त करण्यासाठी चर योजना, आधुनिक सिंचन पद्धतीद्वारे बंदिस्त नलिका प्रणालीत रूपांतर, पाणीपट्टी वसुली व शेतकऱ्यांच्या पाणी बिलांच्या तक्रारींचे निवारण यांवर विशेष भर दिला जाणार आहे. तसेच नदीतून गाळ काढणे, पाणी वापर संस्थांचे सक्षमीकरण, घरगुती, औद्योगिक व व्यावसायिक पाणी वापराचे जललेखापरीक्षण, धरण व लाभक्षेत्रातील अनधिकृत बांधकामे हटविणे व जलसंपदा विभागाच्या मालमत्तेची स्थळ निश्चिती करण्याची कामे प्राधान्याने केली जातील. जागतिक महिला शेतकरी वर्ष असल्याने कार्यक्रमांमध्ये महिलांचा जास्तीत जास्त सहभाग नोंदवण्याचे प्रयत्न केला जाणार आहे.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्म त्रिशताब्दी वर्षानिमित्त २५ ते २९ एप्रिल दरम्यान गोदावरी-नर्मदा जल दिंडीचे आयोजन केले जाणार आहे. पंधरवड्यात दररोज विविध घटकांसाठी विशेष मोहिमा, उपक्रम व जलसंपदा अदालत आयोजित केली जाईल. यामध्ये अधिकारी प्रशिक्षण, जल पुनर्भरण, शेतकरी संवाद, भूसंपादन अडचणी निराकरण, कालवा संयुक्त पाहणी, नदी प्रदूषण नियंत्रण, कृषी विभागासोबत पीक पद्धतीबाबत कार्यशाळा, महसूल विभागाच्या मदतीने जमिनीचा सातबारा उतारा अद्ययावत करणे व आपत्ती व्यवस्थापन मार्गदर्शन अशा विविध विषयांवर भर दिला जाईल. शेतकरी व गरजू नागरिकांच्या शंकांचे निरसन करून त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी प्रत्येक अभियंता कार्यालयात मदत कक्ष सुरू करण्यात येणार आहे. तसेच शासकीय योजनांची माहिती देणाऱ्या लघु चित्रफिती तयार करून तज्ज्ञांची व्याख्याने व माहितीपत्रकांद्वारे व्यापक प्रसिद्धी केली जाईल.

कार्यक्रमांच्या आयोजनासाठी जलसंपदा विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्वतः उपस्थित राहून संनियंत्रण करावे व यात इतर प्रशासकीय विभागांचे अधिकारी, स्वयंसेवी संस्था, जलतज्ज्ञ व सर्व लोकप्रतिनिधींना आमंत्रित करावे, अशाही सूचना देण्यात आल्या आहेत.