मुंबई : तुम्ही राज्यातील राष्ट्रीय महामार्गांवरून वारंवार प्रवास करता का? मग ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. महामार्गावरील खड्डे, निकृष्ट रस्ते आणि पुलांच्या दुरवस्थेबाबत प्रवाशांकडून येणाऱ्या तक्रारींची दखल घेत राज्य सरकारने आता एक मोठा आणि महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) बांधलेल्या या रस्त्यांच्या गुणवत्तेवर आता थेट राज्याचा सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD) आपली नजर ठेवणार आहे.
विभागाअंतर्गत कार्यरत असलेल्या दक्षता व गुणनियंत्रण मंडळाकडून या कामांची वरचेवर तपासणी केली जाईल. या तपासणीत दुरूस्तीची गरज असल्याचे आढळून आल्यास प्राधिकरणाकडे पाठपुरावा करून ही कामे करवून घेतली जातील. तसेच, तातडीची गरज भासल्यास विभागामार्फतच ही कामे मार्गी लावली जातील.
आतापर्यत राष्ट्रीय महामार्गांची कामे मंडळाच्या कक्षेबाहेर होती. मात्र महामार्गांच्या कामाबाबत सातत्याने येणाऱ्या तक्रारींमुळे राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे. ‘महामार्ग प्राधिकरणाची राज्यात काही मोजक्या ठिकाणीच कार्यालये आहेत. त्यामुळे रस्त्यांविषयी तक्रारी असल्यास त्याचे वेळीच निराकरण होत नाही. अनेकदा त्यावरून विधिमंडळ अधिवेशनात प्रश्न उपस्थित केले जातात. हे महामार्ग आपल्या अखत्यारित नसतानाही या प्रश्नांना सामोरे जावे लागते. त्यामुळे, या महामार्गांची तपासणी करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला,’ असे सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री शिवेंद्रसिंह भोसले यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले. आम्ही कामांची तपासणी करू. कामाच्या गुणवत्तेत त्रुटी आढळून आल्यास महामार्ग प्राधिकरणाशी संपर्क साधून ती मार्गी लावली जाईल. तसेच, गरज भासल्यास आपल्या विभागाच्या माध्यमातून ही कामे पूर्ण करू, अशी माहिती भोसले यांनी दिली.
तक्रारींनंतर तपासणीचा निर्णय
रस्ते बांधल्यानंतर काही महिन्यांतच खड्डे पडणे, डांबरीकरण पावसात वाहून जाणे अशा प्रकारच्या तक्रारी येत असतात. त्यातच नांदेडमधील विष्णुपुरी येथील राष्ट्रीय महामार्गावरील उड्डाणपुलाची संरक्षक भिंत आणि भराव मुसळधार पावसात कोसळल्याने गंभीर परिस्थिती निर्माण झाली होती. हे काम सार्वजनिक बांधकाम विभागाने केले. मुंबई-गोवा महामार्गाचा प्रश्न तर कोकणवासीयांकरिता कायमच ऐरणीवर असतो. या महामार्गाचे काम कित्येक वर्षे रखडलेले आहे. ज्या ठिकाणी कामे झाली आहेत, त्या ठिकाणी सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून आवश्यक असलेल्या सोयी आंतरराष्ट्रीय मानकांनुसार नसल्याने प्रवाशांबरोबरच स्थानिकांकडून मोठ्या प्रमाणावर तक्रारी येत आहेत. त्या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय महामार्गांच्या कामांनाही नियमित गुणवत्ता तपासणीच्या कक्षेत आणण्याचा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे. मात्र, या तपासणीत दोष आढळल्यानंतर संबंधित कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांवर कोणती कारवाई केली जाणार, याकडे आता लक्ष लागले आहे.
मंडळाचे काम काय?
आतापर्यंत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारितील रस्ते, पूल, इमारती, दुरुस्तीची कामे, आमदार-खासदार निधीतील कामे, रोजगार हमी योजना आणि जिल्हा परिषद कामांची तपासणीच दक्षता व गुणनियंत्रण मंडळाकडून होते. राष्ट्रीय महामार्गांची कामे मंडळाच्या कक्षेबाहेर होती.
