अलिबाग : भूमिअभिलेख विभागाच्या संकेतस्थळाच्या अपग्रेडेशनमुळे सातबारा पोर्टल गेल्या काही दिवसांपासून ठप्प असून ‘सर्व्हर डाउन’ आणि ‘एरर’च्या सततच्या समस्यांमुळे ऑनलाइन सेवा पूर्णपणे कोलमडल्या आहेत. खरीप हंगाम अगदी तोंडावर आला असताना ही परिस्थिती निर्माण झाल्याने रायगड जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या अडचणीत सापडले आहेत. पीककर्जासाठी आवश्यक असलेला सातबारा उतारा वेळेत उपलब्ध होत नसल्याने कर्ज प्रक्रियेलाच मोठा अडथळा निर्माण झाला आहे.

भूमिअभिलेख विभागाकडून संकेतस्थळाच्या अपग्रेडेशनचे काम सुरू असल्याचे सांगण्यात येत असले तरी हे काम अपेक्षेपेक्षा जास्त काळ चालल्याने सेवा अद्याप पूर्ववत झालेल्या नाहीत. परिणामी सातबारा उतारा, आठ-अ उतारा, फेरफार नोंदी, म्युटेशन प्रक्रिया यांसह जमीन अभिलेखाशी संबंधित सर्व ऑनलाइन सेवा ठप्प झाल्या आहेत. संकेतस्थळ उघडण्यात अडथळे येणे, ‘सर्व्हर डाउन’ व ‘एरर’चे संदेश सतत दिसणे, दस्तऐवज डाउनलोड न होणे तसेच अर्ज प्रक्रिया पूर्ण न होणे अशा तांत्रिक अडचणींचा सामना शेतकरी व नागरिकांना करावा लागत आहे.

खरीप हंगामासाठी पीककर्ज घेणे अत्यंत महत्त्वाचे असते. बँकांकडे कर्जासाठी अर्ज करताना सातबारा उतारा सादर करणे बंधनकारक असल्याने सध्या अनेक शेतकरी कागदपत्रांच्या प्रतीक्षेत अडकून पडले आहेत. काहींनी कर्जासाठी अर्ज करण्याची तयारी पूर्ण केली असली तरी आवश्यक कागदपत्रे उपलब्ध नसल्याने प्रक्रिया पुढे सरकत नाही. त्यामुळे पेरणीचे नियोजन आणि शेतीच्या कामांवर याचा थेट परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

ऑनलाइन सेवा बंद झाल्यामुळे शेतकरी सेतू व महा ई-सेवा केंद्रांकडे धाव घेत आहेत. मात्र, तेथेही ‘सर्व्हर डाउन’च्या समस्येमुळे कामे होत नसल्याने शेतकऱ्यांना वारंवार हेलपाटे मारावे लागत आहेत. वेळ आणि पैशाचा अतिरिक्त खर्च सहन करत असूनही अपेक्षित काम होत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. तहसील कार्यालयांमध्येही अनेक कामे रखडली असून, सातबारा अभावी फेरफार व इतर महसुली प्रक्रिया थांबल्या आहेत. अनेकांना कागदपत्रांशिवाय परत जावे लागत असल्याने प्रशासनाबद्दल नाराजी वाढताना दिसत आहे.

ग्रामीण भागातील तलाठयांचे सर्व्‍हर व्‍यवस्थित सुरू असल्‍याचे सांगितले जाते परंतु फिरतीच्‍या कामावर असल्‍याने अनेकदा तलाठी कार्यालयात नसतात. त्‍यामुळे शेतकरी महा ई सेवा केंद्रालाच प्राधान्‍य देतात. परंतु तेथील सेवा ठप्‍प झाली आहे. खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर ही समस्या तातडीने सोडविणे गरजेचे असून, सातबारा पोर्टल लवकरात लवकर सुरू करून पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून जोर धरू लागली आहे. प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष न दिल्यास पीककर्ज वितरण आणि शेती नियोजनावर मोठा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

मागील काही दिवसांपासून संकेतस्‍थळाला सर्व्‍हर डाऊन, एररच्‍या समस्‍या येत आहेत. त्‍यामुळे सातबारा किंवा इतर महत्‍वाची कागदपत्रे मिळत नाहीत. शेतकरी आमच्‍या महा ई सेवा केंद्रावर फेऱ्या मारत आहेत.

  • कल्‍पेश पवार, महाईसेवा केंद्र चालक