Maharashtra Rain Update : महाराष्ट्रात चार दिवस मुसळधारांची शक्यता; गणेशोत्सवातही पाऊस सक्रिय

राज्यात सोमवारपासून पुढील चार दिवस पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे

Maharashtra Rain Update, Maharashtra Weather Alert,

पावसाला पोषक वातावरण निर्माण झाल्यानंतर राज्याच्या बहुतांश भागांत पावसाने पुन्हा जोर धरला आहे. गेल्या २४ तासांत झालेल्या पावसाने मराठवाडय़ाला तडाखा दिला आहे. हिंगोलीत पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने दोघांचा मृत्यू झाला. बीड जिल्ह्य़ात काही ठिकाणी पिके वाहून गेली आहेत. दरम्यान, राज्यात सोमवारपासून पुढील चार दिवस पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. हवामान विभागाने सांगली सोलापूर वगळता उर्वरित महाराष्ट्रात अतिमुसळधार पावसाचा इशारा दिलेला आहे. कोकण, मराठवाड्यातील काही जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर मुंबई, ठाणे, पुण्यासह संपूर्ण राज्यासाठी यलो अलर्ट देण्यात आला आहे.

बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात ६ ते ९ सप्टेंबर पर्यंत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. रविवारी कोकण विभागात मुंबई-ठाण्यासह सर्वत्र कमी-अधिक प्रमाणात पाऊस सुरु होता. मध्य महाराष्ट्रातील काही भागांत मुसळधार पाऊस झाला. विदर्भातही काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली होती. हवामान विभागाच्या अंदाजानुसार कोकण, मध्य महाराष्ट्रात चार दिवस पावसाचा जोर राहणार आहे. या दरम्यान काही भागांत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.

राज्यात सध्या पावसाला अनुकूल स्थिती आहे. कोकण विभागात गेल्या तीन ते चार दिवसांपासून कमी-अधिक प्रमाणात पाऊस सुरू आहे. मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातही पाऊस झाला आहे. सध्या मराठवाडा आणि लगतच्या भागांमध्ये वाऱ्यांची चक्रीय स्थिती असल्याने गेल्या २४ तासांत या भागात काही ठिकाणी जोरदार पावसाची नोंद झाली आहे. बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत. या क्षेत्रामुळेही राज्यात पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे. राज्यात बहुतांश ठिकाणी पुढील तीन ते चार दिवस पाऊस होणार आहे. ६ आणि ७ सप्टेंबरला काही ठिकाणी मुसळधार पाऊस ते अतिवृष्टी होण्याचा इशारा देण्यात आला आहे. गणेशोत्सवाच्या काळातही पाऊस सक्रिय राहण्याची शक्यता आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Maharashtra rain update monsoon update daily weather forecast mumbai thane aurangabad rain update maharashtra abn