Maharashtra Rain Update: पाऊसधार सोमवारीही सुरुच; दुपारी १२ पर्यंत राज्यात अनेक ठिकाणी कोसळणार मुसळधार

गालच्या उपसागरातील कमी दाबाच्या पट्ट्याची तीव्रता वाढणार आहे. या सर्वांचा परिणाम महाराष्ट्रावर होण्याची शक्यता आहे.

Maharashtra Rain Update
रात्रभर मुंबई ठाण्यासहीत उपनगरांमध्ये पाऊसधार… (फोटो ट्विटरवरुन साभार)

मुंबईसहीत ठाणे आणि उपनगरांमध्ये रात्रभर पाऊसधार सुरु होती.  पोषक वातावरणामुळे राज्यात पुढील दोन दिवस सर्वदूर कमी-अधिक प्रमाणात पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाट क्षेत्रांमध्ये पावसाचा जोर कायम राहणार आहे. राज्याच्या काही भागांत १३ सप्टेंबरला मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. १३ सप्टेंबर रोजी पहाटे सहा ते दुपारी १२ दरम्यान मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आलीय.  रविवारी कोकण आणि पश्चिाम महाराष्ट्रातील घाट क्षेत्रांमध्ये तसेच विदर्भ आणि मराठवाड्यात काही भागांत रविवारी पावसाने हजेरी लावल्याचं पहायला मिळालं.

भारतीय हवामान विभागाचे उप महासंचालक (पश्चिम विभाग) कृष्णानंद होसाळीकर यांनी ट्विटरवरुन दिलेल्या माहितीनुसार १३ सप्टेंबर रोजी पहाटे सहा वाजता टीपण्यात आलेल्या सॅटेलाइट इमेजनुसार दक्षिण गुजरातबरोबरच उत्तर कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रामधील काही भागांवर ढगांची चादर दिसून येत आहे. तसेच विदर्भामध्येही मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. मुंबई आणि ठाण्यामध्ये हलक्या सरी कोसळतील असा अंदाज असल्याचं होसाळीकर यांनी म्हटलं आहे.

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. त्याचप्रमाणे गुजरातच्या परिसरातही कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. मोसमी पावसाची आस असलेला हा पट्टा गुजरातपासून बंगालच्या उपसागरापर्यंत विस्तारला आहे. बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या पट्ट्याची तीव्रता वाढणार आहे. या सर्वांचा परिणाम महाराष्ट्रावर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे १३ सप्टेंबरला राज्याच्या सर्वच भागांत कमी-अधिक प्रमाणात पाऊस होण्याची शक्यता आहे. मुंबईतील अनेक भागांमध्ये रात्रभर पाऊस पडत होता. त्यामुळे अनेक ठिकाणी वाहतूककोंडी पहायला मिळाली.

अतिवृष्टी होण्याची शक्यता

रविवारी कोकण विभागात अनेक ठिकाणी पाऊस झाला, मुंबई, रत्नागिरीतही हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची नोंद झाली. मध्य महाराष्ट्रातील पुणे, कोल्हापूर, महाबळेश्वर, नाशिक भागांत पावसाची नोंद झाली. मराठवाड्यातील औरंगाबाद, विदर्भातील अमरावती, चंद्रपूर, नागपूर, वर्धा आदी भागांत हलका पाऊस झाला. गेल्या चोवीस तासांत माथेरान, महाबळेश्वर, लोणावळा, ताम्हिणी आदी घाटमाथ्यावरील भागांमध्ये १०० ते १७० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. कोकण विभागात आणखी तीन, तर मध्य महाराष्ट्रात दोन दिवस काही ठिकाणी मुसळधार, तर तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. मराठवाडा, विदर्भात  दोन दिवस अनेक ठिकाणी पाऊस असेल.

एकूण किती पावसाची नोंद झाली

पश्चिाम किनारपट्टीवर पुढील ३ ते ४ दिवस जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे. परिणामी मुंबईसह कोकणात मुसळधार ते अति मुसळदार पाऊस पडेल. सोमवारी पालघर, ठाणे, रत्नागिरी येथे तुरळक ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडेल. रायगड येथे तुरळक ठिकाणी तीव्र मुसळधार पावसाची तर मुंबईत मुसळधार पावसाची शक्यता आहे. रविवारी सकाळी ८.३० वाजेपर्यंत सांताक्रूझ येथे २७८९.८ मिमी आणि कुलाबा येथे २१४९.५ मिमी एकूण पावसाची नोंद झाली.

कोणत्या जिल्ह्यात पावसाची शक्यता?

रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांत १४ ते १५ सप्टेंबरपर्यंत काही भागांत मुसळधार पावसाची शक्यता आहे. पुणे, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यांतील घाट विभागांत १४ सप्टेंबरपर्यंत मुसळधार पावसाचा अंदाज आहे. नंदुरबार, नाशिक, जळगाव जिल्ह्यांत मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल. १३ सप्टेंबरला जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड जिल्ह्यांत पावसाची शक्यता आहे. या दिवशी विदर्भातील सर्वच जिल्ह्यांत काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Maharashtra rain update monsoon update daily weather forecast mumbai thane light to mod rains in last 6 hrs scsg