Maharashtra Rain Updates: मुंबई, ठाणे, पुणे, रायगड, नागपूरसह विविध ठिकाणी मुसळधार पाऊस सुरू असून काही जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मुंबई, ठाणे, पुणे, रायगड जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवनावर मोठा परिणाम झाल्याचं पाहायला मिळत आहे. मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं असून अनेक ठिकाणी नद्या, ओढे दुथडी भरून वाहू लागले आहेत. त्यामुळे धरणांच्या पाणीपातळीत देखील समाधानकारक वाढ होत आहे.
मुसळधार पावसामुळे मुंबईकरांचे हाल
मुंबई, ठाण्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा चाकरमाण्यांना फटका बसत आहे. मुसळधार पावसामुळे मुंबईतील लोकल सेवेवर देखील परिणाम होत असून तिन्ही मार्गावरील लोकलसेवा उशीराने सुरू आहेत. त्यामुळे मुंबईच्या दिशेने कामासाठी येणाऱ्या चाकरमान्यांना फटका बसत आहे. काही रेल्वे मार्गावरील गाड्या उशिराने धावत आहेत. त्यामुळे काही रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची गर्दी झाल्याचं पाहायला मिळत आहे. मुंबई आणि आसपासच्या परिसरात मंगळवारपासून सुरू झालेल्या पावसाचा जोर गुरूवारीही कायम राहिला आहे. सांताक्रूझ, अंधेरी, पवई, विक्रोळी परिसरातही पावसाने जोरदार हजेरी लावली आहे.
ठाणे, कल्याण-डोंबिवलीमध्ये देखील पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. काही ठिकाणी रस्त्यांवर झाडे पडल्यामुळे वाहतुकीवर परिणाम होत आहे. त्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचंही पाहायला मिळत आहे. पावसामुळे अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणीच पाणी झालं आहे. तसेच शिळफाटा-मुंब्रा मार्गावर कंबरेभर पाणी साचल्याने रस्त्यालगत उभी असलेली वाहने अक्षरश: बुडाली, तर काही वाहने बंद पडल्याचं चित्र पाहायला मिळालं आहे.
मुंबई, ठाणे, रायगड, पालघर जिल्ह्यांना रेड अलर्ट
पावसाने आता संपूर्ण महाराष्ट्र व्यापला असून बहुतांश भागांत जोरदार पाऊस पडत आहे, तर काही ठिकाणी पावसाची संततधार सुरू आहे. भारतीय हवामान विभागाने अनेक ठिकाणी पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तसेच मुंबई, ठाणे, रायगड, पालघर या जिल्ह्यांना आज रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. या बरोबरच मुंबईला पुढील चार दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
पुणे : शहरात देखील मुसळधार पावसामुळे अनेक भागांमध्ये पाणी साचलं आहे. पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ होत आहे. पुण्यातील हडपसर, सिंहगड रस्ता, कोथरूड, नांदेड सिटी, जंगली महाराज रोड, वारजे अशा विविध परिसरात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे.
विदर्भातही ऑरेंज अलर्ट
आता राज्यातील बहुतांश भागांत जोरदार पाऊस पडत आहे आणि पावसाने संपूर्ण महाराष्ट्र व्यापला आहे. आज भारतीय हवामान विभागाने चंद्रपूर, भंडारा, वर्धा, नागपूर, अमरावती आणि अकोला या जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
मुंबईच्या समुद्रात लाटा उसळण्याची शक्यता
मुंबईत दुसऱ्या दिवशीही मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. आज सकाळपासूनही मुंबईत मुसळधार पाऊस सुरू आहे. मुंबईच्या समुद्रात आज दुपारी १ वाजून ४५ मिनिटाच्या दरम्यान उंच-उंच लाटा उसळण्याची शक्यता असून मुंबईच्या समुद्रात मोठी भरती येण्याची शक्यता आहे.
मुंबईतील चर्चगेट परिसरात झाड कोसळलं, ३ वाहनांचं नुकसान
मुंबईत सकाळपासूनच मुसळधार पाऊस सुरू असून मुंबईला पुढील चार दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला. मुसळधार पावसाचा चाकरमाण्यांना फटका बसत आहे. मुंबईतील चर्चगेट परिसरात एक झाड कोसळलं असून ३ वाहनांचं मोठं नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे.
हिंदमाता, किंग्ज सर्कल परिसरात पाणीच पाणी
मुंबईला पुढील चार दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मुंबईतील हिंदमाता, आणि किंग्ज सर्कलसह आदी परिसरात पाणीच पाणी साचलं आहे.
