New Rajya Sabha members take oath: राज्यसभेत महाराष्ट्रातील दिग्गज नेत्यांसह एकूण १९ नवनिर्वाचित खासदारांनी ६ एप्रिल २०२६ रोजी राज्यसभा सदस्यत्वाची खासदारकीची शपथ घेतली. या नवनिर्वाचित सदस्यांना राज्यसभा अध्यक्ष सी.पी. राधाकृष्णन यांनी शपथ दिली. महाराष्ट्रामध्ये राज्यसभेच्या ७ जागांसाठी निवडणूक झाली होती. या सातही जागांवरील सर्व सात उमेदवार बिनविरोध निवडून आले होते. यामध्ये सत्ताधारी महायुती आघाडीचे सहा आणि विरोधी महाविकास आघाडीच्या एका उमेदवाराचा समावेश होता.

सलग तिसऱ्यांदा राज्यसभेवर शरद पवार आणि रामदास आठवले

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि केंद्रीय मंत्री, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (A) अध्यक्ष रामदास आठवले हे देखील सलग तिसऱ्यांदा (3rd Time) राज्यसभेवर नियुक्त झाले आहेत. महाविकास आघाडीकडून शरद पवार यांची बिनविरोध निवड झाली. भाजपकडून केंद्रीय मंत्री रामदास आठवले, विनोद तावडे, रामराव वडकुते, माया इवनाते यांची बिनविरोध निवड झाली. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या ज्योती वाघमारे आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांची बिनविरोध निवड झाली.

१० राज्यांमधील ३७ जागा भरण्यासाठी होणाऱ्या राज्यसभेच्या निवडणुकीसाठी १६ मार्च रोजी मतदान झाले आणि त्याच दिवशी सायंकाळी ५ वाजता मतमोजणी पार पडली. महाराष्ट्र, ओडिशा, तामिळनाडू, पश्चिम बंगाल, आसाम, बिहार, छत्तीसगड, हरियाणा, हिमाचल प्रदेश आणि तेलंगणा येथून निवडून आलेल्या ३७ सदस्यांचा कार्यकाळ एप्रिल महिन्यात संपेल, त्यामुळे नवीन सदस्यांच्या निवडणुकीसाठी जागा रिक्त होतील.

डॉ. ज्योती वाघमारेंनी घेतली मराठमोळ्या अंदाजात शपथ

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्यासह रामराव वडकुते (भाजप), माया इवनाते (भाजप), डॉ. ज्योती वाघमारे (शिवसेना) यांनी मराठमोळ्या अंदाजात राज्यसभा खासदार म्हणून शपथ घेतली. या शपथविधी सोहळ्यात नवनिर्वाचित खासदार ज्योती वाघमारे यांनी सर्व महाराष्ट्राचे लक्ष वेधले . त्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या वेशभूषेत शपथ घेण्यासाठी पोहोचल्या होत्या. त्यांच्या या वेशभूषेमुळे महाराष्ट्राच्या पुरोगामी विचारांचे दर्शन देशाला मिळाले. याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

राज्यसभा अध्यक्ष सी.पी. राधाकृष्णन यांनी त्यांना शपथ दिली, ज्यामुळे उच्च सभागृहातील त्यांची नवी टर्म अधिकृतपणे सुरू झाली आहे. संसदेचे अधिवेशन सध्या सुरू असून ते १६ एप्रिल २०२६ पर्यंत वाढवण्यात आले आहे. त्यामुळे उर्वरित सर्व सदस्यांचे शपथविधी याच कालावधीत टप्प्याटप्प्याने पूर्ण होतील.