राज्यात दिवसेंदिवस करोना संसर्ग झपाट्याने वाढत आहे. मात्र असे असले तरी करोनामुक्त होणाऱ्यांची संख्या देखील आता हळूहळू वाढत असल्याचे समोर येत आहे. आज दिवसभरात राज्यात ६७ हजार ७५२ रूग्ण करोनातून बरे झाले आहेत. तर, ६६ हजार ३५८ नवीन करोनाबाधित वाढले असून, ८९५ रूग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे.

राज्यातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण(रिकव्हरी रेट) ८३.२१ टक्के आहे. तर, राज्यात आजपर्यंत ३६,६९,५४८ रूग्ण करोनातून बरे होऊन घरी परतले आहेत.

प्रयोगशाळेत तपासण्यात आलेल्या २,६२,५४,७३७ नमुन्यांपैकी आजपर्यंत ४४,१०,८५ नमूने (१६.८० टक्के) करोना पॉझिटिव्ह आढळले आहेत.
सध्या राज्यात ४२, ६४,९३६ जण गृहविलगीकरणात आहेत. तर ३० हजार १४६ जण संस्थात्मक विलगीकरणात आहेत. राज्यात ६,७२,४३४ अॅक्टिव्ह केसेस आहेत.

महाराष्ट्राने लसीकरणात ओलांडला दीड कोटींचा टप्पा ; आरोग्यमंत्री टोपेंनी केलं ट्विट

राज्यात एकीकडे दिवसेंदिवस करोनाचा संसर्ग वाढत असताना, दुसरीकडे राज्यात सुरू असलेल्या लसीकरण मोहीमेने देखील गती घेतल्याचे दिसत आहे. काल राज्याने पाच लाखांहून अधिक नागरिकांचे लसीकरण करत विक्रमाची नोंद केली होती. तर, आजच्या लसीकरणामुळे आता महाराष्ट्राने लसीकरणात दीड कोटींचा टप्पा देखील ओलांडला आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी या पार्श्वभूमीवर ट्विट करून माहिती दिली आहे. एवढ्या मोठ्यासंख्येने लसीकरण करणारे महाराष्ट्र हे देशातील एकमेव राज्य ठरले आहे, असं टोपेंनी सांगितलं आहे.

भारत बायटेक महाराष्ट्राला देणार ६०० रुपये दराने ८५ लाख लशी!

महाराष्ट्रात येत्या १ मे पासून १८ ते ४४ वयोगटातील लोकांच्या लसीकरणाचा व्यापक कार्यक्रम राबविण्यात येणार असला तरी यासाठी पुरेशा प्रमाणात लस उपलब्ध होणे हे एक मोठे आव्हान आहे. आरोग्य विभागाने यासाठी भारत बायोटेक व सीरम इन्स्टिट्यूटला तातडीने लस पुरवठा करण्यासाठी पत्र लिहिले होते. यातील हैदराबादस्थित भारत बायोटेक कंपनीने ६०० रुपये दराने ८५ लाख लसीच्या डोसेसचा पुरवठा करण्याची तयारी दाखवली आहे तर सीरमने अद्याप उत्तर दिलेले नाही.