राज्यात करोना संसर्गाची दुसरी लाट ओसरत असल्याचे बोलले जात असले, तरी देखील अद्यापही दररोज मोठ्यासंख्येने करोनाबाधित आढळून येत आहेत. शिवाय, मागील काही दिवसांमध्ये सातत्याने रोज आढळणाऱ्या करोनाबाधितांची संख्या ही करोनामुक्त झालेल्यांपेक्षा कमी दिसून येत होती. ती आता पुन्हा एकदा जास्त दिसून येत आहे. याचबरोबर करोनाबाधितांच्या मृत्यू संख्येतही रोज भर पडतच आहे. मागील २४ तासात राज्यात ८ हजार ५३५ नवीन करोनाबाधित आढळून आले असून, ६ हजार १३ रूग्ण करोनातून बरे झाले आहेत. तर, १५६ करोनाबाधित रूग्णांचा आज राज्यात मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. यामुळे राज्यात करोनाचा धोका अद्यापही कायमच असल्याचे दिसून येत असून, सर्वांनीच करोना प्रतिबंधात्मक नियमांचे काटेकोरपणे पालन करणे गरजेचे आहे. राज्यातील एकूण बाधितांची संख्या ६१,५७, ७९९ झाली आहे.

दरम्यान, राज्यात आजपर्यंत ५९,१२,४७९ रूग्ण करोनातून बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९६.०२ टक्के आहे. याचबरोबर, राज्यात करोनामुळे १,२५,८७८ रूग्ण दगावले असून, राज्याचा मृत्यू दर २.०४ टक्के आहे. राज्यातील अॅक्टिव्ह केसेसची संख्या १,१६,१६५ आहे.

करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आजपर्यंत राज्यात ४,४०,१०,५५० नमुन्यांची तपासणी केली गेली असून, यापैकी ६१,५७,७९९ नमूने (१३.९९ टक्के) पॉझिटिव्ह आढळले आहेत. सध्या राज्यात ५,९६,२७९ जण गृहविलगीकरणात आहेत, तर ४ हजार ६७२ जण संस्थात्मक विलगीकरणात आहेत.

राज्यातील जनजीवन पूर्वपदावर येत असतानाच दुसरी लाट उलटण्याचा आणि तिसरी लाट येण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे राज्यात लागू करण्यात आलेली जिल्हानिहाय पाच टप्प्यांतील निर्बंध प्रणाली रद्द करून सरसकट निर्बंध लागू करण्यात आले आहेत. यामुळे सर्वसामान्यांना त्रासाला सामोरं जावं लागत असून, हे निर्बंध हटवण्याची मागणी केली जात आहे. सर्वसामान्यांकडून होत असलेल्या या मागणीकडे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं लक्ष वेधलं आहे.

निर्बंध पूर्णतः हटवा, नाहीतर कडक लॉकडाउन लावा; आरोग्यमंत्र्यांची मुख्यमंत्र्यांना विनंती

“करोनाचा प्रसार रोखण्यासाठी लागू करण्यात आलेले निर्बंध पूर्णतः काढून जनतेला दिलासा द्यावा किंवा कडक लॉकडाउन करावा, अशी विनंती मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केली आहे,”अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.