राज्यात आज मोठ्या संख्येने करोनाबाधिता आढळून आले आहेत. तर, करोनामुक्त झालेल्यांची संख्या ही नवीन आढळून आलेल्या करोनाबाधितांच्या तुलनेत बरीच कमी असल्याचेही समोर आले आहे. खरंतर मागील काही दिवसांमध्ये सातत्याने दररोज आढळणाऱ्या करोनाबाधितांपेक्षा करोनामुक्त होणाऱ्यांची संख्या जास्त आढळून येत होती. परंतु आता पुन्हा एकदा करोनाबाधितांची संख्या जास्त दिसत आहे. आज दिवसभरात राज्यात ९ हजार ३३६ नवीन करोनाबाधित आढळून आले असून, ३ हजार ३७८ रूग्ण करोनातून बरे झाले आहेत. याशिवाय, राज्यात आज १२३ करोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाल्याची देखील नोंद झाली आहे.

दरम्यान, राज्यात आजपर्यंत एकूण ५८,४८,६९३ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९५.९१ टक्के एवढे झाले आहे. तर, राज्यात आजपर्यंत १,२३,०३० करोनाबाधितांचा मृत्यू झालेला असून, सध्या राज्यातील मृत्यूदर २.०१ टक्के एवढा आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ४,२५,४२,९४३ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६०,९८,१७७ (१४.३३ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ६,३८,००४ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत, तर ४ हजार १९८ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज रोजी एकूण १,२३,२२५ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.